-->
सनातनी अतिरेक

सनातनी अतिरेक

शनिवार दि. 08 डिसेंबर 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
सनातनी अतिरेक
सनातन संस्थेचे पितळ अखेर उघडे पडले आहे. नालासोपार्‍यातील एका घरात अवैध पद्धतीने स्फोटकांचा साठा बाळगल्याप्रकरणी दहशवाद विरोधी पथकाने (एटीएस) सहा हजार पानांचे आरोपपत्र कोर्टात सादर केले. मुंबई, पुण्यासह देशभरात अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ल्यासारखे स्फोट घडविण्याचा सनातन संस्थेचा कट होता. एटीएसने पहिल्यादाच सनातन संस्थेचा थेट आरोपपत्रात उल्लेख केल्याने सनातन संस्था ही बाहेरुन जे काही दाखविते तसे केवळ धार्मिक काम करीत नाही तर अतिरेकी कारवाया देखील येथे केल्या जातात हे सिध्द होते. सध्या हिंदुधर्माचा पुरस्कार करणारे सरकार सत्तेत असताना हे आरोपपत्र सादर केल्याने सनातन आणखीनच अडचणीत आली आहे. अटक झालेले आरोपी हे सनातन संस्था, आणि त्यांची सहयोगी संस्था हिंदू जागृती तसेच या सारख्या इतर संघटनांचे सदस्य आहेत. आरोपी तथाकथीत हिंदू राष्ट्राची स्थापना करण्याच्या प्रयत्नात होते. मराठी पुस्तक क्षात्र धर्म यात हिंदू राष्ट्राची व्याख्या सांगितली आहे. या पुस्तकाने आरोपी प्रेरित झाले आहेत. विशेष या पुस्तकाचे प्रकाशन सनातन संस्थेने केले होते, असे एटीएसने आरोपपत्रात म्हटले आहे. तथाकथित हिंदू धर्म, रुढी - परंपराविरोधात बोलणे, लिहिणार्‍यांना टार्गेट करण्यासाठी पिस्तूल, बॉम्बचा वापर करून स्फोट घडविण्याचा कट या टोळक्याने रचला होता. तसेच सामन्य जनतेमध्ये भीती निर्माण करण्याचाही या टोळक्याचा हेतू होता. डिसेंबर, 2017 मध्ये पुण्यात आयोजित वेस्टर्न म्युझिक कॉन्सर्ट सनबर्न फेस्टिव्हल सनातनचे टार्गेट होते, असे चौकशीत समोर आले आहे. सात ऑगस्टला पुणे, सातारा, सोलापूर आणि नालासोपार्‍यात राहाणारा एक गट मुंबई आणि पुण्यात दहशतवादी हल्ले करणार होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. अतिरेकी मुस्लिम संघटना व या हिंदुत्ववादी संघटना यांच्या काहीच फरक राहिलेला नाही, हे देखील यावरुन स्पष्ट दिसते. धर्माच्या बुरख्याखाली अनेक तरुणांची माथी भडकावून त्यांची दिशाभूल करुन त्यांच्याकडून हत्या करवून घ्यायच्या हे तंत्र त्यांनी अवलंबिले होते. या प्रकरणाची जशी चौकशी होईल तसे अनेक बुरखे यातून टराटरा फाडले जाणार आहेत. खरे तर हे अगोदरच उघड व्हायला पाहिजे होते, परंतु कर्नाटकच्या ए.टी.एस.ने गौरी लंकेश यांच्या खुन्यांचा छडा लावल्यावर त्यातून हिंदुत्ववाद्यांची ही हत्यारी साखळी आता उघड होत आहे. राज्यात त्यांना पोषक सरकार असल्यामुळे हा बुरखा लपविला गेला होता. मात्र कर्नाटकच्या सरकारने जोर लावल्यावर आता हे सर्व उघड झाले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या दीर्घकालीन कटाचा भाग होती आणि या कटाची व्याप्ती कॉ. गोविंद पानसरे, प्रा. एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्यांपर्यंत पोचली आहे, या निष्कर्षापर्यंत केंद्र आणि राज्यस्तरीय तपास संस्था आल्या आहेत. अत्यंत नियोजनपूर्वक आणि भविष्यातील त्याचे सर्व परिणाम लक्षात घेऊन दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि लंकेश यांच्या हत्या झाल्या आहेत, यावरही तपास संस्थांचे अधिकारी ठाम आहेत. दुर्जनांचा नाश करायचा, धर्मसंरक्षणासाठी निधी संकलन करायचे आणि शस्त्रसाठा जमा करून संघर्ष करायचा, हा या सार्‍या हत्यांमागील उद्देश असल्याचे तपासात पुढे येत आहे. कट्टर उजव्या विचारसरणीचे, सनातनी प्रवृत्तीचे घटक त्यासाठी एकत्र आल्याचेही उघड होत आहे. हिंदू जनजागृती समितीचा राज्य समन्वयक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सनातन संस्थेशी संबंधित सारंग अकोलकर, समितीचा अमोल काळे, सचिन अंदुरे आदींची नावे तपासांत यापूर्वीच पुढे आली होती. डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, प्रा. कलबुर्गी, गौरी लंकेश या पुरोगामी विचारांच्या व्यक्तिंच्या हत्या करुन त्यांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न होता. परंतु व्यक्तींना मारुन विचार संपत नसतो, तर उलट तो विचार अधिक वेगाने पसरतो. विचाराची लढाई ही विचारानेच झाली पाहिजे. विचारानेच विचारांचा पराभव करता येतो हे वास्तव धर्माची झालर डोळ्यावर घेतलेल्यांना वास्तव संपविणार नाही. जगातील हे वास्तव आहे. धर्मरक्षणासाठी या हत्या केल्या असे कबुलीजबाब यात पकडलेल्या आरोपींनी दिले आहेत. आता प्रश्‍न उपस्थित होतो की, या विचारवंतांना मारुन कोणते धर्म रक्षण केले? अशा प्रकारे धर्माचे रक्षण करता येते का? यावरुन या तरुणांचे ब्रेन वॉशिंग कशा प्रकारे केले जाते याचा अंदाज येतो. खरा हिंदू धर्म यांना शिकवलाच जात नाही असेच यावरुन दिसते. कारण कोणत्याच धर्मात अशाप्रकारे मानव हत्येचे समर्थन करण्यात आलेले नाही. अगदी अतिरेकी कारवाया सध्या जोरात असलेल्या मुस्लिम धर्मातही असा संदेश दिलेला नाही. राज्यात गेल्या पाच वर्षात जालेल्या पुरोगाम्यांच्या हत्यासत्रामागे सनातन संस्था किंवा हिंदुत्ववादी संघटना आहेत हे काही छुपे राहिलेले नाही. सनातन संस्था अजूनही हात झटकण्याचा प्रयत्न करीत आहे. मुळातच हिंदुत्ववादी संघटनांच्या साधकांच्या घरी अशी प्रकारे हत्यारेच कशासाठी सापडतात? साधकांच्या घरी हंदू धर्माची पुस्तके सापडली तर आपण समजू शकतो. परंतु हत्यारे कशाला? याचे उत्तर त्यांच्याकडून घेण्याची आवश्यकता आहे. मुस्लीम अतिरेकी संघटना अतिरेकी कारवाया करतात म्हणून त्यांना उत्तर देण्यासाठी व आपल्या धर्माचे रक्षण करण्यासाठी आपणही अतिरेकी बनले पाहिजे असे अजिबात नाही. यातून हिंदुधर्माचे संरक्षण नाही तर बदनामीच जास्त होत आहे. हिंदू धर्म हा सहिष्णू आहे, हे वास्तव सर्वात प्रथम लक्षात घेतले पाहिजे. आपल्या देशाला अशा प्रकारचा अतिरेकी हिंदुत्ववाद परवडणारा नाही. यातून आपला देशाचे एकसंघत्व धोक्यात येऊ शकते. हा सनातनी अतिरेक संपविण्यासाठी मोठी वैचारिक लढाई लढावी लागणार आहे. 
--------------------------------------------------------------------

0 Response to "सनातनी अतिरेक"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel