-->
तळकोकणातील धुमशान

तळकोकणातील धुमशान

रविवार दि. 09 डिसेंबर 2018 च्या अंकासाठी चिंतन - 
-----------------------------------------------
तळकोकणातील धुमशान
माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सोमवारी राणेंच्या कणकवली येथील बंगल्यावर बंद दरवाजाआड चर्चा झाली आणि तळकोकणात पुन्हा राजकीय धुमशान सुरु झाल्याची चाहूल लागली. या दोन बडया नेत्यांमधील चर्चेमुळे कोकणच्या प्रामुख्याने तळकोकणाच्या राजकारणात नव्या समीकरणांची जुळवाजुळव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या भेटीमुळे राणेंचे राजकीय महत्त्वही अधोरेखीत झाले असून त्यांना भाजपविरोधी महाआघाडीत आणण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही. ही सदिच्छा भेट होती व त्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असे अपेक्षित उत्तर या नेत्यांना देणे आपण समजू शकतो. ज्यावेळी मातब्बर राजकीय नेते एकत्र येतात तेव्हा राजकारण वगळून चर्चा अशक्य असते ही काळ्या दगडावरची रेघ असते. काँग्रेसशी काडीमोड घेत महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाची स्थापना करणारे राणे हे सध्या भाजपच्या कोटयातून राज्यसभा खासदार आहेत. असे असतानाही आपली व आपल्या नव्या पक्षाची स्वतंत्र प्रतिमा तयार करण्याचा राणे यांचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे शत्रू नंबर वन असलेल्या शिवसेनेवर हल्लाबोल चढवतानाच भाजपवरही टीकेची संधी ते सोडताना दिसत नाहीत. त्यामुळे राणेंच्या राजकारणाचे जहाज नेमके कोणत्या दिशेने जाते आहे, त्याचा अंदाज येत नाही. या पार्श्‍वभूमीवर नारायण राणेंच्या घरी पवारांनी आपला मोर्चा वळवून तळकोकणात काही नवीन शिजतेय याची कल्पना दिला. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी देश पातळीवर भाजपविरोधी महाआघाडी तयार करण्यासाठी शरद पवार यांनी पुढकार घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या व मराठा आरक्षणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणा़र्‍या नारायण राणे यांच्यासारख्या नेत्याचा महाआघाडीत समावेश झाल्यास केवळ कोकणातच नव्हे तर मुंबई व राज्यातील अन्य काही भागांमध्येही त्याचा मोठा फायदा महाआघाडीला होऊ शकतो हे ओळखून पवार यांनी राणेंसाठी गळ टाकल्याचे बोलले जाते. शिवसेनेतील यशाची एक एक कमान 35 वर्षे चढल्यानंतर नव्या नेतृत्वासोबतच्या मतभेदांमुळे घेतलेली सोडचिट्ठी, त्यानंतर काँग्रेस प्रवेश, गत विनधानसभा निवडणुकीतील पराभव, लोकसभा निवडणुकीत मुलाचा झालेला दारुण पराभव व वांद्रे पोटनिवडणुकीतील पराभव यामुळे काही काळ राणेंच्या वर्चस्वाला उतरती कळा लागल्याची चिन्हे दिसत होती. मात्र अजूनही सिंधुदुर्गातील बहुतेक सत्ता केंद्रे राणेंच्याच ताब्यात आहेत. राज्यात युती झाल्यास(सध्या तरी तशीच शक्यता जास्त वाटते) सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडेच राहणार आहे. या पार्श्‍वभूमीवर राणेंचा स्वाभिमान पक्ष भाजपची साथ सोडून महाआघाडीत सामील होऊ शकतो. मग अशा वेळी राणे आपल्या चिरंजीवाला खासदार करण्यासाठी स्वाभिमानच्या तिकीटावर उभे करुन आघाडीचा पाठिंबा मिळवू शकतात. असे चर्चिले जाते की,राणेंनी कॉँग्रेसची दारे ठोठावली होती. परंतु त्याला कॉँग्रेस नेतृत्वाने फारसा प्रतिसाद दिला नसल्याने राणे साहेबांनी पवारांशी जमविण्याचा घाट घातला असावा. 
पवारांच्या साथीने ताकद दाखवण्याची सुवर्णसंधीच त्यांच्यासमोर आहे. कोकणातील नव्या राजकीय समीकरणांची मांडणी म्हणून पवार-राणे भेटीकडे पाहिले जात आहे.
नारायण राणेंची राजकीय कारकिर्द शिवसेनेपासून सुरु झाली. त्यांनी शिवसेनेत काम करायला सुरुवात केली त्यावेळी बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतला नव्हता. त्यावेळी शिवसेना केवळ मराठी माणसांसाठी झटणारी एक संघटना होती. त्याकाळी शिवसेनेचा राजकारणापेक्षा समाजकारणावर जास्त भर होता. मात्र 90च्या पुढे त्यांनी हिंदुत्वाची झुल पांघरली आणि राणेंसारखे शिवसेनेचे अनेक नेते त्यावेळी हिंदुत्वाचा गजर करु लागले. अर्थात शिवसेनेचे हिंदुत्व हे जेवणात लोणचे जसे खातात त्याप्रमाणे होते. आजही ते हिंदुत्वाचा मोठा आव आणीत असले तरीही त्यांना मराठी माणसांची संघटना असेच संबोधिले जाते. आता शिवसेनेने मराठी माणसांच्या भल्यासाठी काय केले हा एक संशोधनाचा विषय ठरेल. असो. 35 वर्षाच्या शिवसेनेतील व सरकारमधील विविध पदे उपभोगल्यावर नारायणरावांनी पक्षसंघटनेचा त्याग करुन कॉग्रेसमध्ये प्रवेश केला. शिवसेनेतील दुसर्‍या पिढीशी त्यांचे काही जुळत नव्हते. त्यामुळे त्यांनी आता आपल्याला शिवसेनेत किंमत उरणार नाही हे वेळीच ओळखून पक्षाचा त्याग केला. त्यानंतर त्यांना कॉग्रेसने सन्मानाने पक्षात घेतले. त्यांना मंत्रिमंडळात दुसरे स्थान दिले. एका मुलाला खासदार व दुसर्‍याला आमदार केले. असे असले तरीही त्यांचे विरोधात बसल्यावर कॉग्रेस नेत्यांशी सूर काही जुळेनात. परिणामी त्यांनी भाजपात प्रवेश करण्यासाठी प्रदीर्घ काळ फिल्डिंग लावली. शेवटी भाजपाने त्यांना आयत्या वेळी टांगच दिली व त्यांना पक्ष स्थापनेचा सल्ला दिला. राणेंचे त्यावेळी एक वर्तुळ पूर्ण झाले असे म्हणण्याचे कारण एकच की, सुरुवातीला हिंदुत्ववादी पक्षात त्यानंतर कॉग्रेससारख्या सर्वधर्मसमभाव मानणार्‍या पक्षात एक तपाहून जास्त काळ व त्यानंतर पुन्हा हिंदुत्ववादी पक्षाशी चुंबाचुंबी. त्यांचे अशा प्रकारे राजकीय वर्तुळ पूर्ण झाले. त्यांच्या भाजपा प्रवेशाला अनेकांचा विरोध होता. खुद्द मुख्यमंत्र्यांनाच राणे पक्षात नको होते, हे काही लपून राहिलेले नाही. मात्र केंद्रीय नेतृत्व नेतृत्वास प्रामुख्याने अमित शहा यांना राणेंनी पक्षात प्रवेश करावा असे वाटत होते. भाजपाची पितृसंघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राणेंच्या प्रवेशाला सुरुवातीला विरोध होता. मात्र नंतर त्यांचा विरोध मावळला असे सांगण्यात येते. संघ अशा राजकीय बाबतीत उघडपणे कधीही वाच्यता करीत नाही, मात्र पडद्याआड कारवाया करीत असतो. त्यामुळे त्यांची राणेंच्या संदर्भात भूमिका कोणती हे कधीच स्पष्ट झाले नाही. मात्र राणेंचा प्रवेश लांबला व अखेरीस रद्द झाला त्यावरुन संघाचाही त्यांना विरोध होता हे स्पष्टच होते. नारायण राणे यांचे पुत्र अध्यक्ष असलेल्या स्वाभिमानी संघटनेचे पक्षात रुपांतर करण्यात आले. स्वाभिमानी ही संघटना राणेंनी कॉँग्रेस पक्षात असल्यापासून समांतर सुरु ठेवली होती. खरे तर अशा प्रकारची समांतर संघटना कॉँग्रेस पक्षात खपवून घेतली जात नाही. असे असले तरीही राणेंकडे याबाबत कॉँग्रेस पक्षाने उदारमतवादी दृष्टीकोन ठेवून दुर्लक्ष केले होते. राणेंच्या या स्वाभिमानी पक्षाचे अस्तित्व राज्यवापी असणार अशी घोषणा केली असली तरीही अर्थातच याचे कार्यक्षेत्र कोकणापूरतेच म्हणजे बहुतांशी सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरतेच मर्यादीत राहिले. आपल्या राज्यात अशा प्रकारे वन मॅन आर्मी असणारे पक्ष काही कमी नाहीत. सदाभाऊ खोत, राजू शेट्टी, विनायक मेटे, महादेव जानकर, बच्चू कडू, रामदास आठवले व राज ठाकरे यांच्या जोडीला आता नारायण राणे आले आहेत, असे आपल्याला म्हणता येईल. अर्थात अशा प्रकारचा पक्ष स्थापन करुन आपली सत्तेच्या घोडेबाजारात किंमत वाढवून घेणे फारच फायदेशीर असते. प्रामुख्याने ज्यावेळी एखाद्या पक्षास स्पष्ट बहुमत मिळत नाही त्यावेळी अशा पक्ष नेत्यांची चांगलीच चलती होते. नारायण राणेंचा स्वाभिमानी पक्ष आता भाजपाच्या वळचणीला लागला होता. भाजपाने त्यांना खासदार केले. आता ते राष्ट्रवादीशी जवळीक करीत आहेत. अर्थात त्यांनी कॉँग्रेस सोडताना नाही तरी केंद्रीय नेतृत्वावर टीका केलेली नाही. उलट पक्षाध्यक्ष सोनिया गांधी व राहूल गांधी यांचे नेहमीच सहकार्य लाभले असे सांगून पुढे काळाच्या ओघात कॉँग्रेस पक्षाशी जवळीक करण्याचा आपला पर्याय खुला ठेवला होता. अर्थात असे राजकारण करुनही लोक जर स्वत:ला स्वाभिमानी म्हणवून घेतात यावरुन आपले राजकारण किती खालच्या पातळीचे झाले आहे, हे दिसते. सध्या कोणालाही पक्षाची वैचारिक बैठक नको आहे. फक्त हव्या आहेत त्या सत्तेच्या चाव्या. कारण सत्ता असली की आपण समाजसेवा करु शकतो, सत्तेशिवाय ते शक्य नाही अशी ठाम राजकारण्यांची समजूत झालेली आहे. आता अशा प्रकारे सतत पक्षांतरे केल्याने राणेंची प्रतिमा मलिन होणार आहे हे नक्की. गेल्या विधानसभेला अशक्य वाटणारा पराभव राणेंना मालवणकरांनी दाखवून दिला आहे, हे विसरता येणार नाही. शेवटी राणेंसारखा जनपाठिंबा असलेला नेता देखील सत्तेशिवाय फार काळ जगू शकत नाही, हेच यावरुन पुन्हा एकदा सिद्द झाले आहे. राणेंकडे जिल्ह्यातील सर्व आर्थिक, राजकीय ताकदीच्या नाड्या ताब्यात आहेत. परंतु ती सत्ता त्यांना पुरेशी वाटत नाही तर राज्यातील एक प्रमुख ताकद म्हणून आपल्याकडे पहावे असे त्यांना वाटते. आता राणेंची ही नवी सोयरीक त्यांंना फायदेशीर ठरते का ते पहायचे.
-------------------------------------------------------------

0 Response to "तळकोकणातील धुमशान"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel