-->
लक्ष निकालाकडे...

लक्ष निकालाकडे...

सोमवार दि. 10 डिसेंबर 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
लक्ष निकालाकडे...
महिनाभर पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे उद्या निकाल लागतील, त्यावेळी यात कोण जिंकले, कोण हरले ते स्पष्ट होईल. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमधील भाजपची सत्ता उलथवून टाकण्याचा चंग काँग्रेसने बांधला होता. त्याला अनुसरुन एक्झिट पोलचे निकाल लागले आहेत. पाचपैकी तीन राज्यांमध्ये सत्तांतर झाल्यास लोकसभेच्या निवडणुकीवर परिणाम होईल व भाजपासाठी ते कठीण जाईल. जर भाजपाने या राज्यातील आपली सत्ता कायम राखली तर त्यांच्यासाठी तो एक मोठा बोनसच म्हणावा लागेल. निवडणूक होत असलेल्या पाच राज्यांमध्ये मध्य प्रदेश हे मोठे राज्य. गेली 15 वर्षं शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्री असून यावेळी भाजपासाठी अनेक नकारात्मक घटना येथे घडल्या आहेत. एक तर सलग तीन वेळा येथील निवडणुका जिंकल्यामुळे सरकारविरोधी वातावरण आता तापले होतेे. सुरुवातीच्या रणधुमाळीत तहे राज्य भाजपच्या हातून जाणार नाही, असा अंदाज व्यक्त होत होता; मात्र अखेरच्या टप्प्यात भाजपला काँग्रेसने कडवी लढत दिल्याचे विविध वाहिन्या तसेच ऑनलाईन पाहण्यांमधून स्पष्ट झाले आहे. सट्टाबाजारानेही काँग्रेसला कौल दिला आहे. कॉँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी यांनी तीनही राज्यात एकखांबी लढत दिली आहे. त्यात त्यांनी राजस्थान व मध्यप्रदेश येथे जास्त लक्ष केंद्रीत केले होते. मध्यप्रदेशात त्यांना चांगला प्रतिसाद मिळत होता. जर येथे सत्ताबदल झाला तर तो राहूल यांचाच मोठा विजय ठरावा. कारण प्रचंड मेहनत त्यांनी येथे घेतली होती. गेल्या वेळी कॉँग्रेसला गुजरातमध्ये अनुकूल वातावरण होते, परंतु भाजपाने शेवटच्या टप्प्यात बाजी मारली. कॉँग्रेसचे अनेक उमेदवार शंभर मतांच्या फरकाने पडल्यामुळे भाजपा सत्तेत आला. गुजरात कॉँग्रेसच्या हातून जरासाठी सटकले, तेथेही राहूल गांधींनी भाजापाला चांगलाच घाम फोडला होता. आता देखील तीनही राज्यात तीच स्थीती आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांचा प्रचार पाहता, बहुतांश मुद्दे हे स्थानिक कमी आणि राष्ट्रीय जास्त होते. मध्य प्रदेश, छत्तीसगड या दोन राज्यांमध्ये नक्षलवाद आणि व्यापम घोटाळ्यासारखे मुद्दे चर्चेला आले; परंतु त्यात फारसा जोर नव्हता. मध्य प्रदेशमध्ये शेतकर्‍यांचे प्रश्‍न चर्चिले गेले, परंतु ते अगदीच स्थानिक पातळीवर चर्चिले गेले नाहीत, तर राष्ट्रीय मुद्देच यात आले. मध्य प्रदेश सरकारच्या भावांतराचा मुद्दा, कैद्यांचे पलायन, मध्य प्रदेशात झालेले गव्हाचे मोठे उत्पादन, शेतीसाठी भांडवल देण्याचा प्रश्‍न चर्चेत आला नाही. मध्य प्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न बिघडला असताना त्याविषयी फारशी चर्चा झालीच नाही. छत्तीसगडमध्ये गेल्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांसह अनेक नेते नक्षलवाद्यांनी केलेल्या स्फोटात बळी गेले. तरीही मोदी यांनी काँग्रेसवर नक्षलवाद्यांना मदत केल्याचा आरोप केला. या आरोपाला काँग्रेसने गुळमुळीत उत्तर दिले. छत्तीसगडमध्ये भाजप आणि काँगे्रस या दोन्ही पक्षांच्या जागांमध्ये फारसे अंतर राहणार नाही, असा अंदाज आहे. भाजप हा सर्वाधिक मोठा पक्ष असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. काँग्रेसला छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये विजय मिळवण्याचा एवढा आत्मविश्‍वास निर्माण झाला की, या पक्षाने बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्षाशी युती करणेच टाळले. त्याचा नकारात्मक परिणाम होतो किंवा नाही ते आता पहावे लागेल. भाजपविरोधात देशव्यापी आघाडी निर्माण होत असताना काँग्रेसचे मित्रपक्षांना असे गृहीत धरणे अडचणीचे ठरू शकते. अनेकदा सहकारी पक्ष देखील अवास्तव जागा मागतात व परिणामी आघाडी फुटते. कॉँग्रेसकडे सध्या राहूल गांधी हेच एकमेव प्रचारासाठी स्टार नेते आहेत. सध्या तरी कॉँग्रेसची सर्व भिस्त त्यांच्यांवरच आहे. स्थानिक नेत्यांना बरोबर घेत राहुल यांनी तीनही राज्ये पिंजून काढली. त्यामुळे या निवडणुकांमध्ये काँग्रेसला यश मिळाले तरी ते त्यांचे असेल. आजवर अपयशाचे धनी गेल्या काही वर्षात ते झालेले आहेत, परंतु हे त्यांच्यादृष्टीने मोठे यश ठरेल. भाजपने नेहमीप्रमाणे केंद्रीय मंत्र्यांची तसेच शेजारच्या राज्यांमधील मुख्यमंत्र्यांची आणि खासदारांची फौज उतरवली होती. जाहिरातींवर प्रचंड खर्च केला होता. त्यातुलनेत एकेकाळी सत्ता असलेली व आता सत्ता नसताना हतबल झालेली काँग्रेस साधनसामग्री, प्रचारसाहित्य, जाहिरातीत फारच कमी पडलेली दिसली. या निवडणुकीत नोटाबंदी, राफेल, 15 लाख रुपये, काळा पैसा या राष्ट्रीय प्रश्‍नांचीच जास्त चर्चा झाली. मोदी यांनी तर गांधी घराणे आता कसे भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकत नाही हे दाखवूनच देतो असे सांगत धमकाविलेच. पंतप्रधानांसारख्या नेत्याला अशा प्रकारे खालच्या पातळीवर येऊन प्रचार करताना पाहून आपल्या देशातील राजकारण आता कोणत्या थराला गेले आहे ते दिसते. व या एकूणच प्रकारची किव येते. राहुल यांनी मोदी यांच्यावर फारशी व्यक्तिगत टीका केली नाही. त्यांनी मोदी यांचे नाव न घेता चौकीदारामुळे देश बदनाम झाला, असा टीकेचा सूर ठेवला. तसेच चौकीदार चोर है च्या घोषणा देऊन मोदी सरकारच्या नाकात दम आणला. एकूणच ही निवडणुक सत्ताधारी व विरोधकांच्या दृष्टीने महत्वाची ठरणार आहे. कॉँग्रेसच्या ताब्यात एक किंवा त्याहून जास्त राज्ये आल्यास त्यांना सध्याच्या पराभवाच्या छायेतून बाहेर पडण्यास मोठी मदत होईल. यातून कॉँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळू शकते. भाजपाच्या ताब्यातून एखादे मोठे राज्य जरी सटकले तरी त्यांना लोकसभेसाठी राजकारण जड जाऊ शकते. भाजपासाठी ते वाईट संकेत ठरतील.
----------------------------------------------------------

0 Response to "लक्ष निकालाकडे..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel