-->
राष्ट्रगीत आणि सक्ती

राष्ट्रगीत आणि सक्ती

शुक्रवार दि. 12 जानेवारी 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
------------------------------------------------
राष्ट्रगीत आणि सक्ती
चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावण्याच्या सक्तीचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मागे घेतला, या निर्णयाचे स्वागत झाले पाहिजे. गेल्या वर्षी 2016मध्ये झालेला हा निर्णय आणि त्यावर न्यायालयाने उमटविलेली मोहोर यामुळे अनेक प्रश्‍न निर्माण झाले होते. आता सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालाने त्यांना तूर्त पूर्णविराम मिळाला असला तरी या निमित्ताने देशप्रेम आणि आपण तसेच आपल्या देशप्रमेच्या भ्रामक समजुती यावर आपण विचार करण्याची वेळ आली आहे. राष्ट्रगीत लावल्यास त्यावेळी उभे राहून सन्मान झाला पाहिजे यात दुमत असण्याचे कारण नाही. परंतु प्रत्येक करमणुकीच्या कार्यक्रमात राष्ट्रगीत वाजविण्याची सक्ती करणेही चुकीचे आहे. कारण अशाने आपण आपले राष्ट्रप्रेम काही सिद्द करु शकत नाही, निदान राष्ट्रप्रेम सिध्द करण्यासाठी हाच एकमेव निकष ठरावा असेही नाही. राष्ट्रप्रेम ही आपल्या मनातील सर्वोच्च भावना आहे व ती प्रत्येक क्षणाला दाखविण्याची आवश्यकता असतेच असे नाही. योग्य वेळ आल्यावर हे राष्ट्रप्रेम दाखविणे गरजेचे ठरते. मात्र राष्ट्रगीताला सिनेमागृहात एखादा उभा राहिला नाही तर त्याला चोपणे हे देखील चुकीचेच आहे. यामुळे तो राष्ट्रद्रोही ठरत नाही. आपल्याकडे सध्या विविध कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय झेंडा फडकाविण्याची एक स्टाईल आली आहे. यात अनेकदा राष्ट्रध्वजाचा अपमान होतो हे आयोजकांच्या लक्षातही येत नाही. हे बंद केले पाहिजे. राष्ट्रध्वज कुठे व कसा फडकावयाचा याचे जे नियम आहेत ते लोकांना समजावून सांगण्याची आवश्यकता आहे. असो. देशप्रेम असणे हे केव्हाही अभिमानाची बाब आहे. मात्र त्याचा अतिरेक होता कामा नये. आपल्या भूमीविषयीचे ममत्व आणि त्या भूमीवर राहणार्‍या लोकांविषयीची आपलेपणाची भावना यातून उदयास येणारा राष्ट्रवाद ही आधुनिक काळातील संकल्पना आहे. तिचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे बाकीच्या सर्व म्हणजे बिरादरी, जात, गाव, वंश, भाषा, प्रांत, धर्म इत्यादी निष्ठा देशनिष्ठेपेक्षा एकतर दुय्यम ठरतात किंवा तिच्यात विसर्जित होतात. देशप्रमेमाचा विचार करताना जात, पंथ, धर्म या सर्व बाबी गळून केवळ देशप्रेमाचा विचार झाला पाहिजे. चित्रपटगृहांतील राष्ट्रगीताच्या सक्तीवरून निर्माण झालेल्या या वादंगाच्या निमित्ताने अनेक मुद्दे पुढे आले. अशा सक्तीला सर्वोच्च न्यायालयानेही गेल्या वर्षी दिलेल्या एका निर्णयात उचलून धरल्याने देशभक्ती हा विषय दिखाऊपणासाठी वापरणार्‍यांचे फावले. चित्रपटगृहांत राष्ट्रगीत लावण्याची सक्ती आणि ते सुरू असताना उभे राहण्याची सक्ती याला इतके अवाजवी महत्त्व दिले गेले, की जणू काही असे करणारेच फक्त देशप्रेमी, बाकीचे देशद्रोही, असे समीकरणच तयार झाले. मुळात चित्रपटगृहांत अशा प्रकारे राष्ट्रगीत लावण्याची सक्ती करण्याचे प्रयोजन काय होते? एका जनहित याचिकेमुळे न्यायालयासमोर हे प्रकरण आले. श्यामनारायण चोक्सी हे मध्य प्रदेशातील एक निवृत्त अभियंते. एका चित्रपटाच्या वेळी राष्ट्रगीताचा अवमान होत असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी थेट न्यायालयात धाव घेतली. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आणि त्यावर निर्णय देताना 30 नोव्हेंबर 2016च्या आदेशात न्यायाधीशांनी सर्व चित्रपटगृहांत राष्ट्रगीत लावणे बंधनकारक ठरविले आणि त्या वेळी सर्वांनी उभे राहिले पाहिजे, असेही नमूद केले. खरे तर देशभक्ती ही सहजस्फूर्त भावना आहेे. त्याची सक्ती करणे चुकीचे आहे. देशभक्ती दाखविण्यासाठी असा सक्ती करण्याची आवश्यकताच नाही. ही भावना तुमच्या मनातून आली पाहिजे, जर ती येत नसेल तर तुम्हाला या देशाविषयी प्रेम वाटत नाही असा त्याचा अर्थ निघू शकतो. ही भावना व्यक्त करण्याचे काही संकेत जरूर असावेत; पण यानिमित्ताने कायदा स्वतःच्या हातात घेऊ लागला तर चुकीचे ठरणार आहे. नाटक, क्रिकेटचा सामना अथवा संगीताची मैफील हेदेखील मनोरंजनाचेच प्रकार आहेत. त्यांनाही राष्ट्रगीताची सक्ती का नाही, असा प्रश्‍न साहजिकच उपस्थित होतो. चित्रपटगृहात राष्ट्रगीत सुरू असताना उभा राहिला नाही म्हणून एका अपंग व्यक्तीला मारहाणीचा घृणास्पद प्रकारही घडला. तेव्हा अशा निरर्थक गोष्टींना आवर घालणे आवश्यक होते. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात या विषयावर आपले मत मांडताना आपली आधीची भूमिका बदलली. सक्तीची गरज नसल्याचे मत व्यक्त करीत ती रद्द करावी, अशी विनंती न्यायालयाला केली आणि सर्वोच्च न्यायालयानेही ती मान्य केली. तसे करतानाच राष्ट्रगीत सुरू असताना त्याविषयी आदर दाखविणे ही बाब महत्त्वाची असल्याचेही न्यायालयाने नमूद केले आणि ती भूमिका रास्तच आहे. आता या मुद्द्यावर गृह मंत्रालयाच्या विशेष सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. ध्वजवंदनाविषयीच्या मार्गदर्शक संहितेप्रमाणेच राष्ट्रगीतासंबंधीची संहिता ही समिती तयार करेल, त्यात राष्ट्रगीत कोठे, कोणत्या प्रसंगी वाजवावे, त्याविषयी आदर कशा रीतीने व्यक्त करावा आदी मुद्द्यांचा बारकाईने विचार करताना व्यवहार्यताही पाहिली जाईल, अशी अपेक्षा आहे. यापुढे सरकारने हे विषय अतिशय नाजूकपणाने हाताळण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमात राष्ट्रगीत वा ध्वजारोहरण करण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी काही नियमावली आखून दिल्यास त्याचे पालन करणे देशाच्या हिताचे ठरेल. अन्यथा राष्ट्रभक्तीचा चुकीचा अर्थ लावणार्‍यांचे फावेल.
---------------------------------------------------------------

0 Response to "राष्ट्रगीत आणि सक्ती"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel