-->
नव्या जगाचे नवे आकर्षक रोजगार

नव्या जगाचे नवे आकर्षक रोजगार

संपादकीय पान बुधवार दि. ११ मे २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
नव्या जगाचे नवे आकर्षक रोजगार
सध्याचे जग हे आधुनिकतेचे व तंत्रज्ञानाचे आहे. अगदी साधा लिपिक असला तरीही त्याला संगणक चालविता येणे गरजेचे ठरले आहे. अर्थात, यात चूक काहीच नाही. पूर्वी लिपिकाला टायपिंग येणे गरजेचे होते, आता त्याची जागा संगणकाने घेतली आहे. असो. अशा प्रकारे आधुनिकतेशी नाते सांगणारे अनेक रोजगार आता निर्माण झाले आहेत. यातील सध्याचा एकदम हॉट म्हणता येईल असा रोजगार म्हणजे डाटा सायंटिस्ट किंवा अँनेलिस्ट. अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर विविध प्रकारचा जो डाटा येत असतो त्याचे विश्‍लेषण करायचे. केवळ सध्याच नव्हे तर भविष्यातही यातील रोजगाराच्या संधी वाढत जाणार आहेत. या क्षेत्रात सध्या मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने सी.ए. किंवा अभियंत्यांपेक्षाही जास्त पगार दिला जातो. येत्या तीन वर्षांत अशा दोन लाख डाटा सायंटिस्टची गरज आपल्याला भासणार आहे. केवळ आपल्याच देशात नाही, तर अमेरिकेतही डाटा सायंटिस्टची गरज भासत आहे. सध्या कंपन्यांना आपल्या खर्चात कपात करण्यासाठी अशा प्रकारच्या आपल्याकडील डाटाचे विश्‍लेषण करण्याची गरज भासते. ज्याचे गणित चांगले आहे असे लोक, वेअर हाऊस इंजिनिअर्स, आय.टी. उद्योगातील तज्ज्ञ मंडळींना या क्षेत्रात आणखी ज्ञान मिळवून यात चांगले करिअर करता येऊ शकते. गेल्या काही वर्षांत आधुनिक जगाशी नाते जोडत अनेक नवीन रोजगार तयार झाले. तरुण पिढीला अनेक नव्या संधी चालून आल्या. अर्थात, जे चांगले शिकलेले आहेत त्यांच्यासाठीच या संधी होत्या व आहेत. परंतु, भारतासारख्या अवाढव्या देशात तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी विविध प्रकारची कौशल्ये आत्मसात करावी लागणार आहेत. मात्र, जसे अशा प्रकारच्या रोजगाराच्या संधी नव्याने उपलब्ध झाल्या आहेत, तशाच आणखी जास्त संधी या अर्धशिक्षितांसाठी तयार कराव्या लागणार आहेत. त्यातच सरकारसाठी मोठे आव्हान पेलावे लागणार आहे. आज आपण आपल्या देशात सर्वात जास्त तरुण आहेत, असे मोठ्या अभिमानाने सांगतो. मात्र, त्याच वेळी या तरुण हातांना रोजगार देण्याचे आव्हान आपल्यापुढे आहे. मोदी सरकार यात किती यशस्वी होते, त्यावर त्यांचे राजकीय भवितव्य अवलूंन आहे.

0 Response to "नव्या जगाचे नवे आकर्षक रोजगार"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel