-->
लंडनचा नवा इतिहास

लंडनचा नवा इतिहास

संपादकीय पान बुधवार दि. ११ मे २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
लंडनचा नवा इतिहास
जगातील प्रमुख शहरांमध्ये ज्याचा उल्लेख होतो व ज्या शहराला मोठा इतिहास आहे, अशा लंडनने आता नवीन इतिहास लिहिला आहे. नुकतीच लंडन शहराच्या महापौरपदी मजूर पक्षाचे नेते व पाकिस्तानी वंशाचे सादिक खान यांची निवड झाली. लंडन शहराच्या महापौरांची निवड ही थेट होते. त्यानुसार झालेल्या निवडणुकीत ५७ टक्के मते खान यांना पडली. आजवर एवढी मते कोणत्याच महापौराला पडली नव्हती. त्या दृष्टीनेही खान यांनी मताधिक्यांचा एक नवा इतिहास लिहिला आहे. त्याहून या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे सादिक खान यांचे वडील हे साधे ट्रक चालक होते व एका चालकाच्या मुलाच्या हाती आता लंडनच्या शहराची सूत्रे आली आहेत. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खान हे मुस्लिम असून, या शहराच्या महापौरपदी एका मुस्लिम व्यक्तीची निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. अमेरिका हा देश आपल्याला बहुभाषिक व बहुधार्मिकांचा म्हणून स्वतःला म्हणवून घेतो. मात्र, या देशात सध्या मुस्लिमांना हाकलून द्या, असे सांगणारा ट्रम्प अध्यक्षपदाच्या चुरशीत आघाडीवर आहे. अर्थात, असे विचार सांगणार्‍या व्यक्तीच्या मागे अमेरिका जाणार का, हा सवाल आहे. ट्रम्प खरोखरीच अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर आले, तर अमेरिकेचे सध्याचे बहुसांस्कृतिक स्वरुप बदलून जाईल. अर्थात, असे काही होईल असे सांगता येत नाही. मात्र, अमेरिकेत अशा प्रकारे वंशवाद, धर्मकारण पोसले जात असताना ब्रिटिश नागरिकांना आपल्या देशाच्या प्रमुख शहराच्या प्रथम नागरिक म्हणून मुस्लिम व्यक्तीची निवड करावी त्याबद्दल लंडनवासियांचे आभार मानावेत तेवढे थोडकेच आहेत. कारण, गेल्या काही वर्षांत प्रामुख्याने दशकात मुस्लिमांकडे एका संशयित नजरेने पाहिले जाते. याचे प्रमुख कारण म्हणजे दहशतवादाच्या मागे असलेल्या प्रमुख मुस्लिम शक्ती. परंतु, अशा प्रकारे मोजक्या दहशतवादींमुळे संपूर्ण मुस्लिम समाज आज संकटात सापडल्यासारखा आहे. त्यांच्याकडे संशयित नजरेने पाहिले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर लंडन शहराने आपल्या महापौरपदी  मुस्लिम व्यक्तीला निवडणे याला विशेष महत्त्व आहे. खान यांनी आपल्या निवडीनंतर केलेल्या भाषणात लंडन हे एक महान शहर आहे व मला या शहराचा मोठा अभिमान आहे, असे म्हटले आहे. खरे तर, लंडन शहराचा हा आदर्श संपूर्ण जगाने स्वीकारावा असे वाटते. ग्रेट ब्रिटनने आपल्याला व जगातील प्रमुख देशांना लोकशाहीचे बाळकडू पाजले. परंतु, आजही एवढ्या वर्षांनंतर ब्रिटनने आपल्या लोकशाहीची पाळेमुळे घट्ट रुजवत त्याचा खरा अर्थ जगाला सांगितला आहे. कोणत्याही शहराच्या प्रथम नागरिकाची जात, धर्म, पंथ यांच्या आधारावर कोणाचीही निवड होऊ शकत नाही, तर लोकशाही निवड पद्धतीने त्याच्या समाजसेवेच्या आधारावर निवड होणे आवश्यक आहे, असे ब्रिटनने आज जगाला यातून दाखवून देऊन संदेश दिला आहे. जगातील प्रमुख शहरांचा विचार करता ती बहुभाषिक व बहुसांस्कृतिक होणे क्रमप्राप्त असते. कारण, शहराचे ते वैशिष्ट्यच ठरते. ठिकठिकाणचे समुदाय रोजगारासाठी एकत्र येऊन शहराला आकार देतात. जगातील कोणतेही शहर त्याला अपवाद नाही. हे वास्तव आता जगाने स्वीकारले पाहिजे. लंडनच्या या नव्या महापौरांना निवडून जगाला एक नवा संदेश मिळाला आहे.

0 Response to "लंडनचा नवा इतिहास"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel