-->
वेलकम 2018...

वेलकम 2018...

सोमवार दि. 01 जानेवारी 2018 च्या अंकासाठी अग्रलेख 
------------------------------------------------
वेलकम 2018...
नव्या उत्साहाने व नव्या उमेदीने 2018 सालचे सर्व जगाने आता जोरदार स्वागत केले आहे. मागच्या वर्षातील अनेक दु:खत घटना 2017 सालच्या सुर्यास्ताबरोबर आपण मनातून काढून टाकल्या आहेत. दररोज अस्ताला जाणार्‍या सुर्याला तरी कुठे माहित होते की, आपण आज या वर्षातले शेवटचे अस्ताला जाणार आहोत. परंतु कॅलेंडरचे पान आता उलटायचे नाही तर नवीन कॅलेंडर लावाले लागणार आहे, हे आपल्याला, मनुष्याला समजते. मग हिंदुत्ववादी म्हणतील आमचे नवीन वर्ष नाही, त्यांचे एकवेळ मान्य करु, परंतु त्यांनाही घरात नवीन कॅलेंडर हे भिंतीवर अडकवावे लागणारच आहे. आता बदलत्या काळानुसार, कालनिर्णयकर्त्यांनी देखील हिंदुत्वाचे पाडव्यापसून सुरु होणारे कॅलेंडर काढावे, असे आम्हाला वाटते. त्यामुळे त्यांना एक नवीन मार्केट मिळेल. असो. गेले वर्षे संपताना मुंबईतील कमला मिलमधील रेस्टॉरंटमध्ये लागलेल्या आगीत 14 जणांना होरपळून मृत्यू झाला. आपल्याकडील भ्रष्ट प्रशासकीय यंत्रणा व त्यांच्या जोडीला असलेले राजकारणी यांच्यामुळे झालेल्या या अपघातामुळे सर्वत्र खळबळ माजली. आपल्याकडील या भ्रष्ट यंत्रणेमुळे अशा प्रकारचे अपघात कुठेही घडू शकतात. खड्डांचे साम्राज्य असलेले रस्ते हे त्याचेच एक दुसरे उत्तम उदाहरण. या रस्त्यांमुळे अपघात होतात, अनेकांचे जीवही जातात, लोकांना पाठीचे रोग होतात, परंतु आपल्याकडील प्रशासन व राजकारण्यांना त्याचे सोयरेसुतक नसते. कमला मिलमध्ये ही मोठी घटना झाल्यावर मात्र यंत्रणा हलली व बेकायदेशीर बांधकामांवर हातोडा फिरला, तसे आता रस्त्यांची दुरुस्ती युध्दपातळीवर होण्यासाठी आता कोणत्या अपघाताची वाट पहावी लागणार ते बघायचे. असो. नवीन वर्षात आपण कोणतीही दुर्दैवी घटना घडू नये असाच विचार करु या. नवीन वर्षात अनेक घटना अपेक्षित आहेत. त्यातील क्रीडा जगतातील घटनांमध्ये जानेवारी महिन्यात 18 वर्षाखालील क्रिकेटपटूंचा वर्ल्ड कप न्यूझीलंडमध्ये होत आहे. त्यापाठोपाठ एप्रिल महिन्यात ऑस्ट्रेलियात कॉमनवेल्थ स्पर्धा होतील, यात भारत चांगल्या पदकांची अपेक्षा ठेवू शकतो. ही स्पर्धा संपल्यावर जगाला वेड लावणारी फिफा वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धा जूनमध्ये रशियात भरेल. त्यानंतर लगेचच ऑगस्ट महिन्यात 18वी एशियन गेम्स स्पर्धा इंडोनेशियात होईल. त्याशिवाय आपल्याकडे बारमाही असणारे क्रिकेट तर असेलच. त्यामुळे क्रीडा रसिकांसाठी यंदाचे वर्ष ही एक मोठी पर्वणीच ठरावी. जागतिक पातळीवरील विचार करता मार्च महिन्यात रशियात अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. यावेळी देखील विद्यमान अध्यक्ष पुतिन हे स्पर्धेत आहेत. त्यनंतर मे महिन्यात सध्या आयसिसच्या ताब्यात असलेल्या इराकमध्ये संसदेच्या निवडणुका होतील. इराकमधील सद्दाम हुसेन यांची राजवट अमेरिकेने संपुष्टात आणल्यापासून तेथे अस्थिरताच आहे. आता या निवडणुका होतात का व झाल्यास इराकमध्ये स्थैर्य येते का ते पहाणे महत्वाचे ठरेल. यानंतर जुलै महिन्यात पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यामुळे तेथे कोणाचे सरकार येते हे पाहणे आपल्यादृष्टीने महत्वाचे ठरणार आहे. त्याशिवाय जागतिका पातळीवरील महत्वाच्या घटनांमध्ये ब्रिटनचे प्रिन्स हेरी हे 19 मे रोजी लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. मार्च महिन्यात सौदी अरेबियात नागरिकासांठी सिनेमागृहे सुरु होणार आहेत. जुलै महिन्यात नासाच्या सूर्याला गवसणी घालण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. तर मार्च महिन्यात भारताच्या चांद्रयानच्या दुसर्‍या मोहिमेला प्रारंभ होईल. यंदाचा अर्थसंकल्प आजपासून बरोबर एक महिन्यांनी म्हणजे 1 फेब्रुवारीला सादर केला जाईल. अशा प्रकारे आजवरची अर्थसंकल्प सादर करण्याच्या तारखेची परंपरा देखील मोडीत काढण्यात आली आहे. अर्थसंकल्पाची तारीख कोणतीही असो, अर्थमंत्र्यांपुढील आव्हाने काही त्यामुळे कमी होणार नाहीत. नोटाबंदीचा झालेला परिणाम व घाईघाईने सुरु केलेला जी.एस.टी. यामुळे निर्माण झालेले प्रश्‍न यातून आपली अर्थव्यवस्था किमान दोन वर्षे तरी मागे ढकलली गेली आहे. नवीन प्रकल्प उभे राहीले नसल्याने नवीन रोजगार निर्माण झाले नाहीत तर जुन्या रोजगारांवर नोटाबंदीनंतर गदा आली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान मोदींचे दरवर्षी एक कोटी रोजगार देण्याचे आश्‍वासन कधीच हवेत विरले आहे. यावेळी तर सरकारने रोजगाराचे आकडेच दिलेले नाहीत. गुजरात निवडणुकीत भाजपाचा निवटता विजय झाला असला तरी खरी कसोटी आता भविष्यात लागणार आहे. चालू वर्षात कर्नाटक, मिझोराम, राजस्तान, छत्तीसगढ या राज्यात निवडणुका होणार आहेत. त्याचबरोबर 2018 सालला अजून बारा महिन्यांनी निरोप दिला जाईल त्यावेळी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जेमतेम चार महिन्यांवर आलेल्या असतील. त्यावेळी सरकारला आपल्या पाच वर्षाच्या कामाचा लोखाजोखा जनतेपुढे ठेवावा लागणार आहे. यावेळी भाऊक होऊन किंवा जनतेच्या खात्यात 15 लाख रुपये टाकण्याचे खोटे आश्‍वासन देऊन भागणार नाही. तर गेल्या वेळच्या निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता जनतेला अपेक्षित आहे. नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा.
-----------------------------------------------------------------

Related Posts

0 Response to "वेलकम 2018..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel