-->
इस्त्रोच्या भरारीतील साक्षीदार!

इस्त्रोच्या भरारीतील साक्षीदार!


अतिथी संपादक - अंतराळ शास्त्रज्ञ पद्मश्री प्रमोद काळे 
------------------------------------------------
इस्त्रोच्या भरारीतील साक्षीदार!
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा विकास गेल्या पाच दशकात झपाट्याने झाला आहे. नवीन उपग्रहांची उभारणी, उपग्रह प्रक्षेपणात केलेले भारतीय शास्त्रज्ञांनी संशोधन, एकाच वेळी सर्वाधीक उपग्रह सोडण्याचा विक्रम, मंगळावरील यान, चंद्रावरील स्वारी अशा अनेक बाबींचा त्यात समावेश होईल. यात भारतीय शास्त्रज्ञांचे योगदान मोठे आहे. त्यांनी भारताला या क्षेत्रात एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले. सर्वात महत्वाचे म्हणजे यातील बहुतांशी तंत्रज्ञान शास्त्रज्ञांनी देशांतर्गत विकसीत केले आहे. ही बाब आपल्या सार्वांसाठीच अभिमानाची ठरावी. सुदैवाने या सर्व घटनांचा मी साक्षीदार आहे. यात माझा सक्रिय सहभाग असल्याने देशासाठी हे काम करताना एक वेगळाच अभिमान मला नेहमीच वाटतो. माझा जन्म पुण्यातला असल्याने माझे सर्व शिक्षण तेथेच झाले. फर्गुसन कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यावर बी.एस.सी. फिजिक्स करण्यासाठी बडोद्याच्या एम.एस. विद्यापीठात गेलो. 1962 साली मी अहमदाबादच्या गुजरात विद्यापीठातून इलेक्ट्रोनिक्समध्ये एम.एस.सी. केले. शिक्षण पूर्ण केल्यावर मी भारतीय अंतराळ संशोधन केंद्रात (इस्त्रो) दाखल झालो. येथे तब्बल 32 वर्षे कार्यरत होतो. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रेरणेतून इस्त्रोची स्थापना झाली होती. माझ्या सुदैवाने मला या संस्थेत जवळपास स्थापनेपासून काम करण्याची संधी मिळाली. याच काळात मला तीन वर्षे डॉ. विक्रम साराभाई यांच्यासोबत काम करण्याचा योग आला. उपग्रह टॅ्रकिंग येथून मी माझ्या कामाला सुरुवात केली. 1963 साली भारत सरकारने अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था (नासा) येथे प्रशिक्षण घेण्यासाठी जी टीम पाठविली होती त्यात माझा समावेश होता. माझ्यासाठी ही एक मोठी संधी चालून आली होती. याच दरम्यान भारत सरकारने तुंबा येथे रॉकेट प्रक्षेपण केंद्र स्थापन करण्यासाठी जागेची निवड केली होती. तुंबा हे भौगोलिकदृष्टया फार महत्वाचे ठिकाण असल्याने त्याची निवड करण्यात आली होती. या केंद्रासाठी हजारो एकर जमीन सरकारने ताब्यात घेतली होती. मला अजूनही आठवते की त्यावेळी या संस्थेकडे पारसे निधीही नव्हते. पण काही तरी मोठे काम करावयाचे आहे, याची जिद्द आम्ही सर्वांमध्ये होती. त्याकाळी आमच्याकडे साधे एखादे वाहनही नव्हते. सुरुवातीच्या काळात उपग्रहाचे भाग आम्ही सायकलवरुन नेत असू. आज ही संस्था नावारुपाला आल्यावर त्याच्या सुरुवातीच्या काळातल्या या गोष्टी आता फार गमतीशीर वाटतात. माझ्या इस्त्रोतील या कारकिर्दीत मला अनेक ज्येष्ठ संशोधकांसमवेत काम करण्याची संधी मिळाली. त्यातील एक होते आपले माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम. यांनी व आम्ही एकत्र प्रदीर्घ काळ एकत्र काम केले. रॉकेट संशोधनात त्यांचा मोलाचा वाटा होता. देशाचे रॉकेट मॅन असे त्यांना जे संबोधतात ते खरेच आहे. कलाम हे नेहमीच आपल्या सहकार्‍यंना सोबत घेऊन काम करायचे. एखादे काम झाले की, त्यावर चर्चा करायचे. त्यात आपले काही चुकत तर नाहीना, काही खटकत असेल तर मला सांगा, असे आवर्जुन विचारायचे. यातच त्यांचा मोठेपणा होता. कलाम यांना कधीच गर्व नव्हता. अगदी सादा माणूस, ज्याचा मूळ पिंड संशोधन हाच होता. राष्ट्रपती झाल्यावरही ते अगदी आपले जीवन साधेपणाने जगले. आमच्यासारखे जुने सहकारी भेटत त्यावेळी ते संशोधनातल्या जुन्या आठवणीत फार काळ रमायचे. स्थापनेपासून आजवर इस्त्रोने अनेक भरारींचे टप्पे पाहिले आहेत. यात आम्ही आमच्या वतीने जेवढे शक्य झाले तेवढे योगदान देण्याचा प्रयत्न केला. देशाने सोडलेला पहिला उपग्रह भास्करपासून ते आजवर आपण या क्षेत्रात मोठी मजल मारली आहे. अर्थात हा उपग्रह आपण बनविलेला असला तरीही विदेशातून सोडण्यात आला होता. त्यानंतर आपण उपग्रह सोडण्यासाठी लागणार्‍या रॉकेटची निर्मीती करण्याचा ध्यास घेतला आणि त्यातही आपण झपाट्याने यश संपादन केले. त्याकाळी आपण अल्पावधीत चांगले संशोधन केले होते. आता तर आपण एकाच वेळी शंभर उपग्रह अवकाशात सोडण्याची क्षमता असलेली रॉकेटस् तयार करीत आहोत. अनेक विकसीत जगातील देश सुद्दा आपल्याकडून या सेवेचा लाभ घेत आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे यातून आपम चांगले परकीय चलन कमवित आहोत. नेहरुंच्या दूरदृष्टीतून ज्यावेळी ही संस्था उभी राहिली त्यावेळी आपण पुढील पाच दशकात एवढी मजल मारु असे वाटले देखील नव्हते. सोव्हिएत युनियनने सोडलेला अवकाशातील पहिला उपग्रह स्फुटनिकच्या उड्डाणाला गेल्याच महिन्यात साठ वर्षे पूर्ण झाली. या घटनेनंतर जगातील अवकाश संशोधनाला गती आली होती. भारताने व येथील संशोधकांनी देखील या स्फुटनिकपासून प्रेरणा घेऊन कामाचा श्री गणेशा केला होता, याची यावेळी आठवण आल्याशिवाय रहात नाही. आपले अंतराळ संशोधन हे थेट पंतप्रधानांच्या अखत्यारीत येते. पंडित नेहरुंपासून ते जवळजवळ प्रत्येक पंतप्रधानांनी यात जातीने लक्ष घातले. त्यामुळे ही संस्था वाढण्यास मदत झाली, हे विसरता येणार नाही. पंडित नेहरुंप्रमाणे इंदिरा गांधींना ही या संशोधनात विशेष रस होता, याची देखील आठवण आल्याशिवाय रहात नाही. इस्त्रो मध्ये माझ्यावर अनेक जबाबदारीची कामे देण्यात आली होती. उपग्रहांच्या सिस्टिमच्या इलेक्टॅानिक्स विभागाचा प्रमुख होतो. इन्सॅट 1 या प्रकल्पाचा मी प्रकल्प व्यवस्थापक होतो. हा उपग्रह आपल्यासाठी अत्यंत महत्वाकांक्षी होता व त्यात आपण चांगले यश ंसपादन केले होते. इस्त्रो पेलोड सायंटिस्ट मिशनचा मी संचालक होतो. अहमदाबादच्या स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटरचा संचालक म्हणूनही काही काळ काम केले. तसेच थिरुअनंतपुरमच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरचा संचालकही होतो. अशा अनेक जबाबदारीची पदे सांभाळली. सरकारने माझ्या या कामाची पोच मला पद्मश्री हा सन्मान देऊन केली. निवृत्तीनंतर विविध सामाजिक संस्थांशी तसेच शैक्षणिक उपक्रमांशी जोडला गेलो आहे. यातून तरुण पिढीला मार्गदर्शन करण्याचा माझा हेतू असतो. त्याचबरोबर एका स्वयंसेवी संस्थेशीही मी निगडीत आहे. ही संस्था गरीब मुलांमध्ये कार्यरत आहे. त्यांचे काम रायगड जिल्ह्यातील पेण येथेेही चालते.
--------------------------------------------------------   

0 Response to "इस्त्रोच्या भरारीतील साक्षीदार!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel