-->
मुंबईही दिल्लीच्या वाटेने

मुंबईही दिल्लीच्या वाटेने

गुरुवार दि. 16 नोव्हेंबर 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
------------------------------------------------
मुंबईही दिल्लीच्या वाटेने
आपल्या देशात व एकूणच विकसनशील देशात प्रदूषण व पर्यावरणविषयक प्रश्‍नांच्या बाबतीत जनजागृती फारच कमी आहे. विकसीत देशात यासंबंधी जनजागृती व हक्कांची जाणीव जास्त आहे. खरे तर तेथे गेल्या शतकात जास्त प्रदूषण झाले व त्याचे परिणाम त्यांना भोगावयास लागल्यावर त्यांना शहाणपण सुचले. यातून तेथे पर्यावरणाविषयक व प्रदूषणाच्या प्रश्‍नासंबंधी जनजागृती वाढली. फिनलँडसारख्या देशात प्रदूषमाच्या प्रश्‍नावरुन निवडणूक लढविली जाते व तेथे हा मुद्दा महत्वाचा ठरतो. त्यावरुन येथील लोकांना या प्रश्‍नांचे गांभीर्य समजल्याचे स्पष्टपणे दिसते. मात्र आपल्याकडे अजूनही हा मुद्दा कळीचा म्हणून पाहिला जात नाही. लोकांमध्ये जनजागृती तर दूरच परंतु शासकीय पातळीवरही शांतताच दिसते. या प्रश्‍नाकडे गाभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे आज दिल्लीसारख्या राजधानीच्या ठिकाणी जे प्रदूषण झाले आहे, त्याचा कुणी गांभीर्याने विचार करताना दिसत नाही. हिवाळ्यासारख्या अतिशय सुंदर असलेल्या मोसमात सध्या प्रदूषणाचे ग्रहण लागले आहे. अर्थातच हे ग्राहण मानवनिर्मीत आहे, हे विसरता येणार नाही. एकीकडे हवामानातील बदल तर दुसरीकडे मनुष्याची पर्यावरणाविषयक हेळसांड यामुळे दिल्लीतील प्रश्‍न निर्माण झाला आहे. प्रदूषणाला देश, राज्याची सीमा नसते. त्यानुसार, हरयाणा, चंदिगड येथील प्रदूषणाची भर पडल्यामुळे दिल्लीकरांना सध्या जीणे नकासे झाले आहे. अर्थात आता पुढील टप्प्यात मुंबईला हेच प्रश्‍न भेडसाविणार आहेत. अर्थातच मुंबईकर अजूनही स्वस्थ व सुस्त आहे. त्याच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातील दीनक्रमेतून त्याला याचा विचार करण्यास वेळही नाही. परंतु आता मुंबईतील या चाकरमान्यांनी भविष्य सुखकर व्हावे यासाठी तरी आतापासून सावधानता बाळगावयास हवी. सध्या धुके आणि धूलिकणांमुळे दिल्लीची प्रदूषणाची पातळी खालावली आहे. प्रदूषण मंडळाच्या हवेच्या दर्जाच्या निर्देशांकानुसार शनिवारच्या 403च्या निर्देशांकावरून रविवारी पुन्हा 460 वर गेला. या प्रदूषकांमध्ये कार्बन मोनाक्साईडचा मोठया प्रमाणात समावेश असल्यामुळे डोळ्यांची जळजळ, श्‍वसनाच्या त्रासांच्या तक्रारी वाढल्या. धुक्यामध्ये धुरके मिसळ्याने दृष्यमानता 100 मीटरपेक्षा कमी झाली. त्यामुळे वाहनांचे अपघात झाले. विमानांची उड्डाणेही तात्पुरती स्थिगीत करण्यात आली. प्रदूषणामुळे शाळांना सुट्टी देण्यात आली, तर वाहतूक कोंडी व महामार्गावरील अपघातांचे मोठे आव्हान निर्माण झाले. दिवाळीच्या काळात आणि सध्याही नवी दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक चारशेच्या वर आहे. तो तीनशेच्या वर गेल्यास परिस्थिती गंभीर मानली जाते. नवी दिल्लीलगतच्या हरयाणा, चंडीगढ आणि अन्य भागात शेतीच्या मशागतीची कामे सुरू असून त्यातून प्रदूषण, धूळ, धूलिकण व कार्बनचे कण हवेच्या प्रवाहाबरोबर दिल्लीच्या दिशेने येतात. दिल्लीत सध्या थंडी असल्याने धुक्यामध्ये धूर, धुळीचे कण मिसळून धुरके निर्माण होते. म्हणजेच दिल्लीचे प्रदूषण हे धूर आणि आद्र्रता यांचे मिश्रण आहे. हवेची पातळी खालावल्याने प्रदूषणाची स्थिती बिघडली आहे. दिल्लीच्या किमान आणि कमाल तापमानात घट झाल्याने प्रदूषक घटक लेयरचा थर पार करून वर जाऊ शकत नाहीत. त्यामुळेच दिल्लीकरांची मोठी घुसमट झाली आहे. मुंबईचा आता या पाठोपाठ नंबर लागणार आहे. मुंबईत सध्याच प्रदूषणाचे प्रमाण जास्त आहे. मात्र समुद्रकिनारा असल्यामुळे वातावरणात आद्रता असते. मुंबईच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर औद्योगिक प्रकल्प आहेत. त्यामुळे मुंबई ही गॅस चेंबर आहे. मात्र अजूनही तिचे स्वरुप दिल्लीसारखे झालेले नाही, हे मुंबईकरांचे व त्यांच्या भोवती असलेल्या परिसाराचे सुदैव म्हटले पाहिजे. मुंबईच्या परिसरात औद्यागिकीकरण आहेच शिवाय बांधकामे देखील झपाट्याने बांधण्याची कामे जोरात सुरु आहेत, अशा वेळी प्रदूषणाचे प्रमाण हे वाढतच जात आहे. अर्थात हे प्रदूषण केवळ मुंबईच नाही तर त्याच्या परिसरात पसरणार आहे व यातून शेजारीच असलेला रायगड जिल्हा वगळला जाऊ शकत नाही. आपल्याकडे कोकणात रसायनी, तळोजा, रोहा पासून ते थेट चिपळूण पर्यंत रासायनिक विभाग आहेत. या विभागामुळे रोजगार जरुर मिळतो मात्र प्रदूषणही वाढत जाते हे विसरता येणार नाही. आपल्याकडे हे प्रदूषण मर्यादीत राहावे यासाठी फार कोणी प्रयत्न करीत नाही. अनेक कारखाने हे प्रदूषित पाणी हे थेट नद्यांमध्ये सोडतात. यामुळे प्रदूषणात लक्षणीय वाढ होते. त्याचबरोबर सुका कचरा आणि ओल्या कचर्‍याचे वर्गीकरण अजून कागदावरच आहे. त्यात रासायनिक, जैविक आणि इलेक्ट्रॉनिक्स कचर्‍याची भर पडते आहे. या कचर्‍याचे वर्गीकरण न होता डम्पिंग ग्राऊंडवर जाळला जात आहे. त्यापासून निर्माण होणारा धूर मुंबईच्या अफाट लोकसंख्येला बाधक ठरत आहे. आपल्याकडे अरबी समुद्राकडून येणार्‍या वार्‍यांमुळे प्रदूषणाचा धोका नसल्याची ग्वाही देण्यात येत असली तरी, मुंबईतले वायुविजन थंडावले जाण्याचा धोका आहे. शिवाय वाढणार्‍या समुद्राच्या पातळीचा त्रास दाटीवाटीने राहणार्‍या मुंबईकरांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबईसाठी हा धोकाही ठरू शकतो. सध्या मुंबई प्रदूषणाच्या उंबरठ्यावर उभी आहे. मुंबईची दिल्ली कधीही होऊ शकते, हे लक्षात घेणेे आवश्यक आहे व त्यादृष्टीने पावले आतापासूनच टाकली जाणे आवश्यक आहेत. यासाठी सरकारने प्रशासन म्हणून क़डक पावले उचलणे जसे जरुरीचे आहे तसेच मुंबईकरांच्या मनात याविषयी जागरुकता निर्माण झाली पाहिजे. या दोन्ही घटकांनी आत्तापासूनच न झटल्यास मुंबई दिल्लीच्या मार्गाने जाणार हे नक्की!
-------------------------------------------------------------------------

0 Response to "मुंबईही दिल्लीच्या वाटेने"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel