-->
गलिच्छ राजकारण

गलिच्छ राजकारण

बुधवार दि. 15 नोव्हेंबर 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
------------------------------------------------
गलिच्छ राजकारण
गुजरातमधील निवडणुकांचे राजकारण आता तापू लागले आहे. सोमवारी युवा नेता हार्दिक पटेल यांची एका तरुणीबरोबरचा व्हिडिओ व्हारयल झाल्याने या राजकारणाला आता गलिच्छतेची एक किनार लागली आहे. अर्थातच हे राजकारण भाजपा करीत आहे, हे सांगायला कुणा ज्योतिषाची आवश्यकता नाही. अर्थात ही सीडी पाहिल्यावर त्यात अश्‍लिल असे काही दिसत नाही. मात्र एकाद्याची बदनामी करण्यासाठी एखादी अशा प्रकारची सीडी पुरेशी असते. अशा प्रकारची आपली सीडी येणार आहे, असा अंदाज हार्दिक पटेलने यापूर्वीच व्यक्ते केला होता. याचा अर्थ भाजपा कोणत्या थराला जाऊ शकते याचा अंदाज हार्दिक पटेल यांना आहे. अशा प्रकारचे गलिच्छ राजकारण गुजरातमध्ये यापूर्वीही संघाचे कार्यकर्ते संजय जोशी यांच्याबाबतीत घडले आहे. गुजरातचे मुक्यमंत्री असताना नरेंद्रभाईंचे कडवे विरोधक म्हणून ओळखल्या गेलेल्या संजय जोशी यांची अशीच अश्‍लिल सीडी बाजारात आली होती. त्यानंतर संजय जोशी हे राजकारण व समाजकारण यातून लूप्त झाले. मात्र याची पुनरावृत्ती हार्दिक पटेल यांच्यासंदर्भात होणार नाही. कारण आता हार्दिक पटेल यांच्यामागे मोठा समाज आहे व युवा नेता म्हणून त्यांना मान्य केलेले आहे. अशा प्रकारे आपल्याविरुध्द कुभांड रचली जात आहेत याची पूर्व कल्पना दिल्याने गुजराती जनतेलाही त्याचा अंदाज होता. यातून एक अर्थ स्पष्ट निघतो की, गुजरातमधील निवडणूक आपल्यासाठी सोपी नाही हे भाजपाला समजले आहे. ती जिंकण्यासाटी कोणत्याही थराला जायची त्यांची तयारी आहे. भाजपविरोधात गुजरातेत निर्माण झालेला असंतोष सोशल मीडिया व अन्य माध्यमांतून गेले काही दिवस सातत्याने व्यक्त होत आहे. विकास वेडा झाला ही कॉग्रेसची कॅचलाईन आता चांगलीच लोकप्रिय झाली आहे. त्यामुळेच भाजपला गुजरातेत सर्वशक्तिनिशी प्रयत्न करावे लागत आहेत. एकीकडे राहुल यांच्या संवादी सभांना मिळणारा प्रतिसाद बघता ज्याला आपण पप्पू म्हणून हिणवले तोच आपल्याला मोटे आव्हान देत आहे, याची खंत भाजपाला लागली आहे. राहुल यांनी या वेळी एकाच वेळी अत्यंत आक्रमक, तर दुसरीकडे कमालीची संयमी अशी आपली प्रतिमा या प्रचारमोहिमेच्या निमित्ताने उभी करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप व मोदी यांच्यावर टीका जरूर करायची आहे; मात्र तसे करताना पंतप्रधानपदाचा अवमान होणार नाही, याची खबरदारीही घ्यायची आहे, हा राहुल यांनी पक्षकार्यकर्त्यांना दिलेला सल्ला त्यांच्यातील एका परिपक्व राजकारण्यची साक्ष देतो. त्याचबरोबर विरोधी पक्षात असताना, भाजप नेते तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग असताना पंतप्रधानपदाचा अवमान आणि टिंगलटवाळी करत होते, हे निदर्शनास आणून देऊन राहुल यांनी आणखी एक वार भाजप व मोदी यांच्यावर केला आहे. यावेळी गुजरातच्या राजकारणात तरुण आगाडीवर आहेत, ही एक त्यातील जमेची बाजू म्हटली पाहिजे.  गुजरातेत जवळपास 18 टक्के असलेल्या पाटीदार म्हणजेच पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल, दलित समाजातील युवकांना आत्मभान आणून देणारे जिग्नेश मेवानी आणि ओबीसी युवकांच्या गळ्यातील ताईत असलेले अल्पेश ठाकूर यांनी भाजपविरोधात सुरू केलेल्या आंदोलनाचे नेमके काय परिणाम होणार, हे 18 डिसेबर नंतर स्पष्ट होणार असले तरीही हे तीन युवक गुजरातमध्ये आज राजकारणाच्या केंद्रबिंदू ठरले आहेत. याचा भाजपाला मोठा फटका बसेल शी सध्या तरी शक्यता दिसत आहे. गुजरातचा विकास केला अशी भाजपाचा दावा आहे. मात्र गुजरातचा विकास हा फक्त शहरांपुरताच मर्यादीत झाल आहे. ग्रामीण भागात विकासाचे लोण पोहोचलेलेच नाही. गुजरातेत आजही जातिय समिकरणे फार तीव्र आहेत. गुजरातला बुलेट ट्रेन नको आहे तर ग्रामीण व शहरी तरुणांच्या हातांना रोजगार पाहिजे आहे. नोटाबंदी नंतर गुजरातला मोठा फटका सहन करावा लागला. त्यानंतर आलेल्या जी.एस.टी.मुळे तर राज्यातल्या उद्योजक व व्यापार्‍यांचे कंबरडे पार मोडून गेले. त्यामुळे भाजपाविरोधी लाट निर्माण होण्यास हातभार लागला. यातूनच राहूल गांधी, हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी यांना प्रतिसाद वाढता मिळू लागला. जीएसटीफ परिषदेच्या ताज्या बैठकीत 27 वस्तूंवरील कर कमी करण्याचा निर्णय घेणे त्यामुळेच केंद्र सरकारला भाग पडले आहे. एका अर्थाने आचारसंहिता लागू झाल्यावरही गुजरातच्या निवडणुकीच्या निमित्ताने केलेली ही खैरातच आहे. निवडणुकाचा प्रचार सुरु असताना जर कॉग्रेसने अशा निराणय घेतला असता तर भाजपाने त्याचे किती मोठे भांडवल केले असते. मात्र त्याबाबत माध्यमांपासून ते भाजपा समर्थक सर्वच मूग गिळून गप्प आहेत. गुजरातेत गेल्या काही वर्षांत शहरी भाग विरुद्ध ग्रामीण भाग अशी मोठी दरी पडली आहे. गुजरातच्या विकास मॉडेलचा डंका भाजपने जोमाने वाजवला आणि 2014च्या लोकसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळवले. राज्यातील सहा महानगरांच्या पालिकांत भाजपला यश मिळत असताना, 23 जिल्हा परिषदा मात्र काँग्रेसच्या हाती आल्या. आजही भाजपचे गुजरातेत भरभक्कम संघटन आहे व त्यांना पर्याय उभा करण्याचे सामर्थ्य कॉग्रेसमध्ये आहे का, असा सवाल उपस्थित होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक ठरली आहे. त्यामुळे विदेश दौर्‍यावरुन परतताच मोदींचा पुन्हा एकदा मुक्काम गुजरातमध्येच असणार आहे. यात जर कॉग्रेसने बाजी मारली तर त्यांच्यासाटी तो एक मोटा जॅकपॉटच असेल. मात्र भाजपासाठी कॅटवॉक निश्‍चितच नाही.
--------------------------------------------------------

0 Response to "गलिच्छ राजकारण"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel