-->
जातियवाद्यांना चपराक

जातियवाद्यांना चपराक

बुधवार दि. 1 नोव्हेंबर 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
------------------------------------------------
जातियवाद्यांना चपराक
जगातील आठ आश्‍चर्यातील एक आश्‍चर्य असलेल्या ताजमहालची उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी साफसफाई करण्याचा घातलेला घाट तसेच कर्नाटकात टिपू सुलतान या महान योध्दाला हिंदू विरोधी म्हणून विनाकारण जातियवादी वातावरणाला खतपाणी घालण्याचा उद्योग भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केला होता. मात्र खुद्द राष्ट्रपतींनी व जनतेने भाजपाचा हा डाव उधळून लावला व त्यांना चंगलीच चपराक लगावली. आग्रा येथे यमुनाकाठी गेली चार शतके दिमाखाने उभा असलेला ताजमहाल हे बादशहाच्या अमर प्रीतीचे मंदिर एक विशाल म्हणून गौरवलेले गेले आहे. एकतेची पायाभारणी करणार्‍या भारतीय संस्कृतीचे हे प्रतीक आहे. मात्र उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुरुवातीला ताजमहाल हे खूनी रक्ताचे प्रतिक आहे असे संबोधून हिंदूंच्या विरोधातील ती वास्तू असल्याचे मत व्यक्त केल्यावर एकच खळबळ उडाली होती. मात्र त्यावर एवढा विरोध झाला की शेवटी ताजमहाल हे भारतातील एक अनमोल रत्न असून, ते आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे, असे मुख्यमंत्र्यांना सांगणे अखेर भाग पडले आहे. उत्तरप्रदेश सरकारने तर ताजमहालला आपल्या पर्यटनाच्या यादीतून हद्दपार केले होते. मात्र त्याला एवढा विरोध झाला की राज्य सरकारला माघार घ्यावी लागली. या देखण्या वास्तूसंदर्भात गेल्या महिनाभरात उभ्या केलेल्या वादाचे वर्तुळ पूर्ण झाले आहे. खरे तर योगींचे हे उद्गार म्हणजे ताजमहाल हा आपल्या संस्कृतीवरील मोठाच कलंक आहे, असे सांगत या वादाला खतपाणी घालणारे भाजपच्या तिसर्‍या-चौथ्या फळीतील नेते संगीत सोम यांना दिलेली सणसणीत चपराकच होती. शेवटी योगींनी या वादावर पडदा पाडण्यासाठी ताजमहालमध्ये जाऊन तेथे साफसफाई करण्याचा घाट घातला होता. यानंतरही याबाबतीतचे वाद शमण्याची चिन्हे नाहीत. योगींनी गेल्या गुरुवारी जगातील सात आश्‍चर्यांपैकी एक असलेल्या या वास्तूला भेट देऊन, त्या परिसरात साफसफाई करण्याचा देखावा मोठ्या धूर्तपणे उभा केला खरा, पण त्याच वेळी आगर्‍याचेच भाजपचे आमदार जगनप्रसाद गर्ग यांनी, मंदिर पाडून या वास्तूची उभारणी झाल्याचे संघपरिवार प्रदीर्घ काळापासून वाजवत असलेले तुणतुणेच नव्याने हातात घेतले. शिवाय, रा. स्व. संघाच्या इतिहास विभागाने दर शुक्रवारी ताजमहालाच्या परिसरात होणार्‍या नमाजावर बंदी घालण्याची मागणी केली आहे! ताजमहाल हा तेजोमल असून त्याखाली पूर्वी शिवमंदीर होते असा दावा संघांच्या इतिहासतज्ञांनी मांडला आहे. अर्थात संघाचे हे विचार काही नवीन नाहीत. यापूर्वीही त्यांनी ही थेअरी मांडली होती. मात्र आता सत्तेत असताना हे मांडल्यामुळे याला वजन प्राप्त झाले. हा वाद आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन पोचला असतानाच, तिकडे कर्नाटकातील भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी मटिपू सुलतान हा क्रूरकर्मा आणि महिलांवर सामूहिक बलात्कार करणारा नेता होता, असे ट्विट करून नवा वाद उभा केला. मात्र, त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीच कर्नाटक विधानसभेतील आपल्या भाषणात टिपू सुलतानवर स्तुतिसुमने उधळून चपराक लगावली. टिपू सुलतान हा ब्रिटीशांशी लढमारा एक लढवय्या नेता होता. तो सर्वधर्मसमभाव मानणारा होता. त्याच्या फौजेत केवळ मुसलमान नव्हते तर हिंदूही होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेतही केवळ हिंदू नव्हते तर मुस्लिमही होते. संघाचा असा दावा आहे की, टिपू सुलतानने पेशव्यांची कत्तल केली. परंतु त्यावेळी त्याने या कत्तली का केल्या हे लक्षात घेतले पाहिजे. त्रावणकोर या संस्थानात असलेला राजा हा मनुवादी होता व त्याची निरंशुश सत्ता ही सर्वसामान्यांच्या हिताची नव्हती तर त्यांना मारक होती. त्याच्या काळात दलित व मागासवर्गीयांना अतिशय हिन दर्जाची वागणूक दिली जाई. महिलांना प्रामुख्याने मागास वर्गातील महिलांना पूर्ण कपडे घालण्यास मनाई होती. अशा या राज्यावर आक्रमण करुन टिपू सुलतानने सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिला होता. त्याहून सर्वात महत्वाचे म्हणजे ब्रिटीशांच्या विरोधात टिपू सुलतानने मोठी लढाई केली होती व त्यातच त्याला विरमरण आले होते. असा हा राजा जनतेच्या हितासाठी नेहमीच राबला होता. त्याने हिंदु-मुस्लिम असा भेदभाव कधी केला नाही. मात्र आताचे राज्यकर्ते मतांच्या राजकारणासाठी याचा वापर करीत आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर, सर्वसामान्य माणसाच्या जगण्याशी कसलेही संबंध नसलेले हे निरर्थक वाद उभे करून धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न तर भाजप नेते जाणीवपूर्वक करू पाहत आहेत. ताजमहालसंबंधातील वादाला दस्तुरखुद्द आदित्यनाथ यांनीच तोंड फोडले होते आणि पुढे उत्तर प्रदेशातील पर्यटनस्थळांच्या यादीतून ताजमहाल वगळण्यात आल्यामुळे मोठेच वादंग माजले होते. त्यानंतर योगींना ही जी काही उपरती झाली आहे, त्याची कारणे ही अर्थातच राज्याच्या अर्थकारणात आहेत. देश-विदेशातील सर्वाधिक पर्यटकांची गर्दी खेचणार्‍या या वास्तूला भेट देणार्‍यांकडून फी, तसेच अन्य माध्यमांतून गेल्या तीन वर्षांत उत्तर प्रदेश सरकारच्या गंगाजळीत 75 कोटी रुपयांची भर पडली आहे. त्यामुळेच योगींना या वास्तूची तोंड फाटेतोस्तवर स्तुती करणे भाग पडले आहे. प्रगत देश पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सर्व शक्तिनिशी प्रयत्न करतात आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या स्थळांच्या संवर्धनाबाबत काटेकोर प्रयत्न करीत असतात. आपण मात्र अशा स्थळाबद्दल निरर्थक वक्तव्ये करून त्याविषयी वादाचा धुरळा उडवित आहोत. यातून आपण देशात दंगे-धोपयांना आमंत्रण देणार आहोतच शिवाय या एतिहासिक वास्तूंबद्दल आपण जगात प्रतिमा मलिन करीत असतो. त्यामुळे भविष्यात आपल्याकडे येणार्‍या पर्यटकांची संख्या कमी होऊ शकते. यातून फायदा नव्हे तर तोटाच जास्त होण्याचा धोका आहे.
--------------------------------------------------------------

Related Posts

0 Response to "जातियवाद्यांना चपराक"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel