-->
पावसाची दडी

पावसाची दडी

गुरुवार दि. 17 ऑगस्ट 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
पावसाची दडी
कोकण विभाग वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने पुन्हा एकदा दडी मारल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. राज्यावर पुन्हा एकदा दुष्काळाचे संकट घोंघावत असून येत्या आठवड्यात वरुणराजाने कृपा न केल्यास राज्यातील अनेक भागांतील लोकांवर संकट कोसळणार आहे. 2014 आणि 2015 या वर्षांतील पावसाशी तुलना करता यंदा मुंबईत आतापर्यंत पडलेल्या पावसाचे प्रमाण कमीच असून, गेल्या सहा वर्षांतील हा नीचांक आहे. तरी देखील मुंबईतील स्थीती तितकीशी वाईट नाही. बहुतांशी तलाव भरल्यामुळे मुंबईकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटला आहे. मात्र कोकण वगळता उर्वरित राज्याची स्थिती चिंताजनक आहे. मराठवाडा व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत अवघा 60 ते 70 टक्के पाऊस पडला आहे. राज्यातील 18 जिल्ह्यात 50 टक्क्यांच्या खाली पावसाची सरासरी आहे. राज्यात सन 2014 आणि त्यानंतर 2015 अशी सलग दोन वर्षे पावसाने कमालीची ओढ दिली होती. अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहील, असा अंदाज तेव्हा हवामानशास्त्र विभागाने वर्तवला होता. यंदा महाराष्ट्रासह मध्य भारतात 100 टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मुसळधार पावसाचे महिने म्हणून ओळखल्या जाणार्‍यांमधील जुलै सरला असून, ऑगस्ट अर्धा सरला आहे. असे असताना गुजरात वगळता महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गोवा या राज्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. राज्यात नाशिक, पुणे, पालघर, ठाणे या जिल्ह्यांखेरीज इतरत्र पावसाने दडी मारली आहे. गेला आठवडाभर सिंधुदुर्ग व रत्नागिरी वगळता इतरत्र पावसाने हजेरी लावलेली नाही. हीच स्थिती येत्या आठवडयात कायम राहणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. राज्याच्या अनेक भागात शेतकर्‍यांंवर दुबार पेरणीचे संकट आले आहे.
नाशिक विभागात अहमदनगर, धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यात पावसाअभावी कमी-अधिक फरकाने बहुतांश शेतकर्‍यांची हीच अवस्था आहे. दुबार पेरणी करूनही कित्येकांचे हात पोळले गेले. प्रारंभीचा काळ सोडला तर धुळे, जळगाव व नगर जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले. धुळे व जळगाव जिल्ह्यात तलाव व धरणेही भरली नाहीत. पावसाअभावी शेतकर्‍यांसमोर पिके कशी जगवावीत, याची चिंता आहे. जळगावमध्ये खरीप हंगामात 90 टक्क्यांहून अधिक पेरणी झाली. एक लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रफळावर दुबार व तिबार पेरणीचे संकट ओढावले. खान्देशात कापसाचे क्षेत्र मोठे आहे. जळगाव, भुसावळ, यावल, रावेर तालुक्यात सर्वाधिक पेरा झाला असून, अमळनेर, बोदवड, मुक्ताईनगर, चाळीसगाव, भडगाव, पारोळा, पाचोरा येथे दमदार पावसाअभावी पेरण्या संकटात सापडल्या आहेत. पेरण्यांना उशीर झाल्याने उत्पन्नात घट येण्याची शक्यता असताना आता ती जगतील की नाही, याची भ्रांत आहे. धुळे जिल्ह्यात जूनच्या प्रारंभी झालेल्या तुरळक पावसाच्या भरवशावर अनेक भागात पेरण्या उरकण्यात आल्या. पण नंतर पंधरवडयाच्या खंडाने पाऊस झाला. जून आणि जुलै महिन्यात 25 दिवस पाऊस नव्हता. यामुळे एक हजार 136 हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणीचे संकट ओढवले. मूग, उडीद, सोयाबीन, मका व ज्वारी या पिकांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागले. नगर जिल्ह्यातही गंभीर स्थिती आहे. या जिल्ह्यात पाच लाख हेक्टरवर पेरणी झाली. काही भागात तीन आठवडे तर काही भागात सव्वा महिन्यांपासून पावसाने ओढ दिली. परिणामी, दुबार पेरणी करूनही सोयाबीन तग धरू शकले नाही. अनेकांनी ते मोडून चारा लागवडीकडे मोर्चा वळविला. ऊस लागवडीचे क्षेत्र घटले. मोसंबी, पेरू, डाळिंबासह अन्य फळबागा अडचणीत सापडल्या. नगर जिल्ह्यात खरीप कांद्याची मोठया प्रमाणात लागवड होते. हे वर्ष त्यास अपवाद ठरले.  नाशिक व पुणे जिल्ह्यातील पावसामुळे नगरला पाणी पुरविणारी धरणे भरली. यामुळे मुळा, गोदावरी, कुकडी, प्रवरा कालव्यांतून पाणी सोडण्यात आले. कालव्यांचे पाणी सर्वत्र मिळत नाही. ज्या भागांना ते मिळते, तिथे पाणी पोहोचण्यास महिना लागतो. या पाण्याचा लाभ केवळ एक लाख हेक्टरवरील पिकांना होईल. उर्वरित चार लाख हेक्टरवरील पिकांचे काय, हा प्रश्‍न आहे. कोपरगाव, नेवासा, पाथर्डी, शेवगाव, श्रीरामपूर या भागात मराठवाडयासारखीच स्थिती आहे. फळबागांसाठी निर्मिलेली शेततळी भरली नाहीत. बागा वाचविण्यासाठी आता टँकरने पाणी देण्याची वेळ आली आहे. सप्टेंबरमध्ये पावसाची साथ न मिळाल्यास पुढील पिकांचे नियोजन कोलमडण्याच्या मार्गावर आहे. पावसाळा संपायला आता जेमतेम एक महिना शिल्लक राहिला आहे. अशा स्थितीत पाऊस किती पडणार व त्यातून शेती किती वाचणार हा एक मोठा प्रश्‍नच आहे. शेवटच्या टप्प्यातही पाऊस पडून फारसा काही उपयोग शेतीला होणार नाही. फक्त पिण्याच्या पाण्याची सोय होऊ शकेल. त्यामुळे यावेळी राज्यावर दुष्काळी ढग जमा होऊ लागले आहेत. सरकार यावर काय उपाययोजना करते ते पहावे लागेल. मात्र सरकारकडे कोणतीही ठोस योजना नाही. अशा स्थितीत शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढण्याचा मोठा धोका आहे. सध्या शेतकरी आपल्या पुढील विविध समस्यांनी बेजार झाला आहे. त्यातच जर यंदा निसर्गाने धोका दिल्यास त्याच्यावरील तणाव वाढणार आहे. सरकारने कर्जमाफीची घोषणा केली असली तरी त्याची अंमलबजावणी कधी होणार याचा पत्ता नाही. अशा स्थितीत राज्यापुढे अनेक संकटे उभी राहातील. पावसाने आता तरी लवकरच दर्शन द्यावे.
------------------------------------------------------------

0 Response to "पावसाची दडी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel