-->
भगवानगडावरचे राजकारण...

भगवानगडावरचे राजकारण...

संपादकीय पान मंगळवार दि. ११ ऑक्टोबर २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------- 
भगवानगडावरचे राजकारण...
सध्याच्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सर्व काही आलबेल चालले आहे, असे नव्हे. कोकण कुणाचा पत्ता काटतोय, तर कोण कुणाला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न करतोय, असे सध्या राजकारण सुरु आहे. यात सर्वसामान्यांच्या कामाचे कोणच बोलत नाही अशी स्थिती आहे. आता दसर्‍याच्या निमित्ताने आपल्या मंत्रीमंडळातील सहकारी पंकजाताईं मुंडे यांच्या विरोधात नामदेवशास्त्रींना उभे करुन त्यांना अस्वस्थ करुन सोडले आहे. त्यामुळे दसर्‍यांच्या आदल्याच दिवशी झालेल्या एका जाहीर सभेत पंकजाताईंनी मुख्यमंत्र्यांच्या समोर त्यांची भरभरुन स्तुती केली. असे असले तरी एकेकाळी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीला आव्हान देणार्‍या पंकजाताईंना फडणवीस कसे स्वस्थ बसू देतील हा सवाल आहेच. असो, आता सर्वांच्या नजरा भगवानगडावर आज दसर्‍याच्या सभेत काय होणार याकडे लागल्या आहेत. गेल्या २० वर्षांपासून गोपीनाथ मुंडे भगवानगडावर दसर्‍याच्या दिवशी सभा घेत होते. त्यांच्या निधनानंतर गेल्या वर्षी पंकजा यांनी ही सभा घेतली. पण यंदा गडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी अशी सभा गडावर घ्यायला विरोध चालवला आहे. खरे तर नामदेवशास्त्री यांना या गादीवर बसवण्याचे श्रेय गोपीनाथ मुंडे यांच्याचकडे जाते. त्या वेळी महंतांना गड सोपवण्याला बर्‍यापैकी विरोध झाला होता; पण गोपीनाथरावांनी पुढाकार घेऊन नामदेवशास्त्री यांचे नाव लावून धरले आणि त्यांना गडाची सत्ता मिळाली. महंतांनी येथील सत्ता आल्यापासून तब्बल दहा वर्षे गोपीनाथरावांना कधी विरोध केला नाही. असे असताना आता पंकजाताईंना विरोध कशासाठी, असा प्रश्न निर्माण होतो. त्यावर महंत म्हणतात, डिसेंबर २०१५ मध्ये गोपीनाथगडाचे उद्घाटन झाले त्या वेळी पंकजा यांनीच आता राजकारण गोपीनाथगडावर आणि अध्यात्म भगवानगडावर, असे जाहीर केले होते आणि त्यामुळे त्यांनी तो शब्द पाळायला हवा. पंकजा यांनी दर्शनासाठी गडावर अवश्य यावे; पण सभा घेऊ नये, हा त्यांचा आग्रह आहे. तो आग्रह मोडून काढत सभा घ्यायचीच, असे पंकजा यांनी ठरवले आहे. त्यामुळे कदाचित होणार्‍या कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीला तुम्ही जबाबदार राहाल, अशा आशयाचे पत्र महंतांनी जिल्हाधिकार्‍यांना पाठविले आहे. त्यामुळे दसर्‍याच्या दिवशी गडावर पोलिस आणि राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आले आहे. त्यापेक्षाही येथे पंकजाताई भाषण करणार किंवा नाही तसेच या दोघांपैकी कोण माघार घेणार असा प्रश्‍न सर्वांना पडला आहे. वंजारी समाजाची भगवानबाबांवर श्रद्धा आहे. पंकजा यादेखील वंजारी समाजाच्या आहेत आणि श्रद्धेपोटी त्या भगवानगड सोडू इच्छीत नाहीत, असा याचा अर्थ नाही. दसर्‍यानंतर बहुतांश साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होतो. ऊसतोड मजूर जे बहुतांशी वंजारी समाजातले आहेत, दसर्‍यानंतर ऊसतोडणीला जातात आणि जाण्यापूर्वी भगवानबाबांचा आशीर्वाद मागण्यासाठी दसर्‍याला गडावर येतात. वंजारी समाजाने गोपीनाथ मुंडेवर जबरदस्त प्रेम केले आणि श्रद्धा जपली ती भगवानबाबांच्या पायाशी. त्यामुळेच दसर्‍याला वंजारी समाज भगवानगड सोडून गोपीनाथगडावर येईल, याची शाश्वती पंकजा यांना वाटत नसावी. गोपीनाथगडावर सभा घेतली आणि अपेक्षित गर्दी झाली नाही तर राज्याच्या राजकारणात गोपीनाथ मुंडेंनंतर वंजारी आणि ओबीसी समाजाची नेता पंकजा असल्याचे जे चित्र निर्माण करायचे आहे ते होऊ शकणार नाही, असेही पंकजा यांना वाटत असावे. त्यामुळेच सभा घ्यायची ती भगवानगडावरच, असा त्यांचा आग्रह दिसतो आहे. तर दुसरीकडे महंत नामदेवशास्त्रींचा इतका टोकाचा विरोध कशासाठी, या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. गेल्या वर्षभरात नामदेवशास्त्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील संवाद वाढला आहे, अशी चर्चा आहे. उभयतांची एकदा भेट झाल्याचेही समजते. त्यानंतरच महंतांची ताकद वाढली व त्यांनी उघडपणे पंकजाताईंच्या विरोधात बोलायला सुरुवात केली. वंजारी आणि समस्त ओबीसी समाजाच्या गोपीनाथ मुंडेंनंतर आपणच नेत्या आहोत अशी प्रतिमा पंकजा यांना उभी करावयाची आहे. तसेच वंजारी, धनगर आणि माळी समाजाचे नेतृत्व त्यांना करायचे आहे. त्याला खो देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हे पाऊल उचलले आहे असे बोलले जाते. धनगर समाजाचे नेतृत्व करणारे महादेव जानकर यांना मंत्रिमंडळात घ्यावे, अन्यथा मीही मंत्रिपद सोडते, असा इशाराच पंकजा यांनी मुख्यमंत्र्यांना दिला होता आणि म्हणून जानकरांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले, अशीही माहिती आता पुढे आली आहे. राम शिंदेंच्या बाबतीतही पंकजा यांनी असेच केल होते. पण राम शिंदे यांना मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट मंत्रिपद आणि पंकजा यांचेच जलसंधारण हे खाते देऊन त्यांना आपल्याकडे वळवून घेतले आहे, असा पंकजा समर्थकांचा दावा आहे. बनारस संस्कृत विद्यापीठाची न्यायाचार्य ही पदवी मिळवलेले महंत अत्यंत बुद्धिमान तर आहेतच;  पण महत्त्वाकांक्षीही आहेत. सध्या ते गडावरचे सर्वेसर्वा असलेले विश्वस्त आहेत. संपूर्ण वंजारी समाजाची श्रद्धा असलेल्या भगवानगडाचे आपण सर्वेसर्वा असल्यामुळे वंजारी समाज हा आपल्या शब्दावर चालावा आणि त्या बळावर सत्तानिर्मितीतही आपल्या शब्दाला किंमत असावी असे त्यांना वाटते, असेही त्यांना ओळखणारे सांगतात. यानिमित्ताने महंतांच्या आशाआकांक्षांना मुख्यमंत्र्यांचे बळ लाभले आहे. त्यामुळे महंतांनी यावेळी पंकजाताईंना खुले आव्हान केले आहे. राज्याच्या राजकारणात वंजारी समाजाचे मोठे प्रस्थ आहे आणि त्यांचा गोपीनाथरावांनंतर एकखांबी नेता कोण असेल हे अद्याप ठरावयाचे आहे. या नेतेपदाच्या लढाईत मुख्यमंत्र्यांनी नथीतून पंकजाताईंवर तीर मारला आहे, हे नक्की.
-------------------------------------------------------

0 Response to "भगवानगडावरचे राजकारण..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel