-->
ब्रिक्सकडून अपेक्षा

ब्रिक्सकडून अपेक्षा

संपादकीय पान गुरुवार दि. १३ ऑक्टोबर २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------- 
ब्रिक्सकडून अपेक्षा
गोवा येथे शनिवारपासून दोन दिवसांच्या होणार्‍या ब्रिक्स देशांच्या शिखर परिषदेकडून भारताच्या मोठ्या अपेक्षा आहेत. या अपेक्षांची कितपत पूर्तता होते हे कळेलच. ब्रझील, रशिया, भारत, चीन व दक्षिण आफ्रिका या पाच देशांच्या समूहाची ही आठवी परिषद आहे. जगातील या विकसनशील व झपाट्याने वाढणार्‍या अर्थव्यवस्था असलेल्या या देशांच्या समूहाला जगात मोठे मानाचे स्थान आहे. या परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी ब्रिक्स देशांच्या आपल्या समकक्ष अधिकार्‍यांना दहशतवादविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. ब्रिक्स देशांनी दहशतवादाची व्याख्या ठरवण्यात वेळ घालवू नये असा सल्लाही त्यांनी दिला आहे. गोव्यात ब्रिक्स देशांच्या शिखर परिषदेत याच मुद्दावर प्रामुख्याने चर्चा होणार आहे. त्याचबरोबर परिषदेच्या अखेरच्या दिवशी म्हणजे रविवारी  याबाबत काही महत्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय दहशतवादावरील सर्वसमावेशक परिषद नवीन व्याख्येच्या तयारीत असल्याचेही समजते. यावर भारताबरोबर ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे ब्रिक्स देश एकत्रित काम करत आहेत. डोवल यांच्या भुमिकेशी ब्रिक्समधील काही वरिष्ठ अधिकारी सहमत असल्याचे बोलले जाते. हा मुद्दा डोवल यांनी ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीतही उपस्थित केला होता. सप्टेंबर महिन्यात दिल्लीत ही बैठक झाली होती. ब्राझीलमधील उफा येथे झालेल्या ब्रिक्स बैठकीत सीसीआयटी संबंधीचा विषय चर्चेसाठी नव्हता. मात्र वर्ष २०१४ पर्यंत यावर चर्चा होत होती. पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटे पाडण्यासाठी ही चांगली संधी भारताला चालून आली असल्याचे मानले जाते. जगात दहशतवादावर एकच व्याख्या करण्यास सांगण्यात आले आहे. यामध्ये सर्व दहशतवादी संघटना, प्रशिक्षण शिबिरांवर बंदी घालण्याबाबत सांगितले आहे. सर्व दशहतवाद्यांवर विशेष कायद्यान्वये खटले दाखल करणे आणि सीमारेषेबाहेरून होणारा दहशतवादाला प्रत्यापर्ण गुन्हा मानावा असे त्यात नमूद करण्यात आले आहे. भारत आणि चीनमधील संबंध हे स्थिर आहेत. त्यामुळे येत्या काळात ड्रॅगन (चीन) आणि हत्ती (भारत) हे देश शांततेत नांदू शकतात, असा विश्वास चिनी दुतावासाचे सल्लागार चेंग गुआनझॉंग यांनी या परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर व्यक्त केला आहे. कधीकाळी भारत आणि चीनच्या संबंधांचे वर्णन भविष्यातील हाडवैरी म्हणून केले जायचे. हत्ती आणि ड्रॅगन यांच्यातील संघर्ष वाढत जाईल, असा अंदाज अनेकांकडून वर्तवण्यात आला होता. मात्र आता दोन्ही देशांमधील संबंध चांगल्या स्थितीत आहेत. त्यामुळे आता यापुढे ड्रॅगन आणि हत्ती सोबत राहू शकतात, असे गुआनझॉंग यांनी म्हटले आहे. भारत आणि चीनचा इतिहास वेगळा आहे. संस्कृती आणि धर्मदेखील वेगळे आहेत. मात्र याच वैविध्यतेचा वापर विविध क्षेत्रांमध्ये एकमेकांना सहकार्य करताना होऊ शकतो. सांस्कृतिक देवाणघेवाण आणि संवाद दोन्ही देशांसाठी अत्यंत आवश्यक आहेत. दोन्ही देश प्रगती करत असताना त्यांच्यातील वैविध्य जपले जाणे आवश्यक आहे. जगातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती असलेले भारत आणि चीन हे देश शांतता टिकवून एकमेकांसोबत राहू शकतात, अशी भावना गुआनझॉंग यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या या निवेदनामुळे ब्रिक्स देशांच्या या परिषदेतून काही चरी चांगले निष्पन्न निघेल असे दिसते. सध्या जागतिक पातळीवर भारत आणि चीन या सध्याच्या घडीला जगातील सर्वाधिक मोठ्या बाजारपेठा म्हणून ओळखल्या जातात. अनेक विकसीत देशांचेही या दोन देशांकडे यासंबंधी लक्ष असते. या दोन्ही देशांना नागरीकरणाचा मोठा इतिहास आहे. शिवाय दोन्ही देशांमधील परंपरा गौरवशाली आहेत. आशियातील मोठया देशांचा ज्यावेळी उल्लेख होतो, तेव्हा नेहमीच भारत आणि चीनचे नाव अग्रस्थानी असते, असे देखील गुआनझॉंग यांनी म्हणणे महतव्चा आहे. चीन आणि भारताच्या संबंधात मध्यंतरी तणाव निर्माण झाला होता. जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी भारताने संयुक्त राष्ट्रात प्रयत्न केले होते. भारताच्या प्रयत्नांना चीनने खीळ घातली होती. याशिवाय अणू पुरवठादार देशांच्या गटात स्थान मिळवण्याचे भारताचे प्रयत्न चीनमुळेच अपयशी ठरले होते. ब्रम्हपुत्रा नदीवर चीनने महागडा जलविद्युत प्रकल्प उभारला आहे. चीनकडून उचलण्यात येणार्‍या पावलांमुळे भारत आणि चीनच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. असे एसले तरी भारताला वेळोवेळी जागतिक पातळीवर अनेक महत्वाच्या प्रश्‍नावर म्हणजे पाकिस्तानच्या प्रश्‍नावर चीन भारताला जाहीर पाठिंबा व्यक्त करतो. ब्रिक्स देशातील हे पाच देश म्हणजे भविष्यातील महासत्ता होऊ शकतात एवढ्या ताकतीच्या आहेत. तर यातील चीनने जगात महासत्ता होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरुच ठेवली आहे. ब्रिक्समध्ये भारताचेही मोलाचे स्थान आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या पाचही देशात चांगला सुसंवाद आहे. परस्परांमध्ये चांगले व्यापारी संबंध आहेत. तसेच भविष्यात हे देश परस्परांना चांगल्या पायाभूत सुविधा पुरवू शकतात. यातून या देशाच्या अर्थव्यवस्थांना चांगले बळ लाभू शकते. या देशातील सर्वांनाच दहशतवाद नको आहे तसेच या देशांच्या समुहातील कुणीही दहशतवाद पोसलेला नाही. भारताच्या दृष्टीने ही सर्वात जमेची बाजू ठरावी, नुकताच भारताने पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून तेथे अतिरेक्यांच्या विरोधात कारवाई केली होती. या कारवाईचे जगाने स्व्गत केले होते. या पाश्‍वर्र्भूमीवर भारत आपले दहशतवाद विरोधी धोरण ब्रिक्स देशांच्या परिषदेत जोरदारपणे मांडणार हे नक्की.
------------------------------------------------------------------------------

0 Response to "ब्रिक्सकडून अपेक्षा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel