-->
पुन्हा तीच आश्‍वासने

पुन्हा तीच आश्‍वासने

बुधवार दि. 16 ऑगस्ट 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
पुन्हा तीच आश्‍वासने
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वातंत्र्य दिनानिमित्ताने लाल किल्यावरुन झालेले आजचे हे चौथे भाषण. त्यांच्या सत्ताग्रहणानंतर झालेल्या पहिल्या भाषणात जो जोर आणि जोश होता त्याचा अभाव यावेळी पूर्णपणे जाणवत होता. याचे महत्वाचे कारण म्हणजे अनेक पातळीवर सरकार फोल ठरले आहे तसेच अनेक समस्यांवर सरकारकडे प्रश्‍नांची उत्तरे नाहीत. त्यामुळे पंतप्रधानांनी आपल्या भाषणात कितीही जोश आणण्याचा प्रयत्न केला असला तरीही हे सर्व कृत्रीम आहे असेच जाणवत होते. सत्तेवर येण्यापूर्वी त्यांनी जी जनतेला आश्‍वासने दिली होती त्यातील एकही आश्‍वासन सत्यात उतरलेले नाही. जनतेला देखील हे वास्तव आता समजले आहे. त्यामुळे यावेळच्या भाषणात आपला हिंदुत्वाचा मुखडा बाजुला सारुन नरेंद्र मोदींनी जनतेची पुन्हा एकदा जोरदार फसवणूक केली आहे. सरकारने फार मोठ्या प्रमाणावर असलेला काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदीचे पाऊल उचलले. मात्र यातून काहीच काळा पैसा हाती लागला नाही. कारण काळा पैसा रोख रकमेच्या रुपाने ठेवणारे आपल्याकडे फारच कमी लोक आहेत. गेल्या तीन वर्षात सव्वा लाख कोटींपेक्षा जास्त काळा पैसा बाहेर काढला, असा दावा त्यांनी केला आहे. यात 1 लाख लोकांनी करचुकवेगिरी करुन हा पैसा दडवला होता. तसेच नोटाबंदीमुळे 3 लाख कोटी रुपये बँकांमध्ये जमा झाल्याचे त्यांनी सांगितले. परंतु काळा पैसा त्याहून कितीतरी पट जास्त आहे. बरे विदेशातून काळा पैसा भारतात आणण्याच्या आश्‍वासनाचे काय झाले असाही प्रश्‍न उपस्थित होतो. त्याहून पुढचे म्हणजे विदेशातील पैसा आम जनतेत वाटण्यात येणार होते. प्रत्येकाच्या वाट्याला 15 लाख रुपये येणार होते त्याचे काय झाले असाही लोकांपुढे प्रश्‍न आहे व त्याचे उत्तर आपल्या भाषणात दिलेले नाही. आस्थेच्या नावावर हिंसा खपवून घेतली जाणार नाही याचा त्यांनी पुर्नउच्चार लाल किल्यावरुन केला असला तरीही हे काही वास्तवात उतरलेले नाही. कारण गोरक्षणाच्या नावाखाली अनेक मुसलमानांचे जीव गेले आहेत. याबाबत मोदी सुरुवातीला मूग गिळून बसतात व नंतर कालांतराने बोलतात. तसेच आजवर अनेकदा त्यांनी यासंबंधी इशारा देऊनही कारवाई का होत नाही असा सवाल आहेच. भारत दहशतवाद, सांप्रदायिकता आणि जातीयवादापासून मुक्त करण्याचे उदिष्ट मोदींनी जाहीर केले असले तरीही ते साध्य करणे एवढे सोपे नाही. कारण त्यासाठी समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जावे लागणार आहे. केवळ हिंदुत्वाचा विचार करुन हे शक्य होणार नाही. आज आपल्यापुढे गरीबीचे मोठे आव्हान आहे. शेतकरी सध्या कमवितो त्यापेक्षा दुप्पट कमवेल असे बोलणे सोपे आहे. कारण सध्या शेतकरी आत्महत्या करीत आहे. त्याचे सरकारला काहीच वाटत नाही आणि त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची भाषा केली जात आहे. स्वातंत्र्यांच्या 70 वर्षात आपण स्वच्छ पाणी, रस्ते, चांगले आरोग्य, शिक्षण या सेवा तळागाळातील जनतेला पुरवू शकलेलो नाही, हे मोठे दुदैव आहे. नुकत्याच झालेल्या उत्तरप्रदेशातील बालके दगावण्याचा प्रकार पाहिला तर आंगावर काटा उभा राहिले. परंतु सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष अमित शहा मात्र या घटनेचे समर्थन करुन अशा घटना होतच राहातात असे बोलणे हे सत्ताधार्‍यांचे कोडगेपणा दखविते. त्यामुळे मोदी केवळ बोलतात मात्र त्यांच्या हातून कृती होत नाही, तसेच करुन दाखविण्याची यंत्रणा त्यांच्याकडे नाही हे आता गेल्या चार वर्षात सिध्द झाले आहे. त्यामुळे लाल किल्यावरचे त्यांचे भाषण हा केवळ उपचार ठरला आहे. स्वतंत्र्य भारतासाठी हे विशेष वर्ष आहे. यंदा ऐतिहासिक चंपारण्य सत्याग्रहाचे 100 वे वर्ष आपण साजरे करत आहोत. भारत छोडो आंदोलनाचे हे 75 वे वर्ष आहे. बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवास सुरुवात केली होती त्याचेही यंदा 125 वे वर्ष आहे. मात्र स्वातंत्र्यसैनिकांना आपण विसरत चाललो आहोत. एवढेच कशाला लोकमान्य टिळकांना देखील विसरण्याची तयारी मोदी यंच्या पक्षाच्या असलेल्या पुण्याच्या महापौर करीत आहेत. इतिहासातून आपण चांगल्या गोष्टी शिकल्या पाहिजेत, असे कुणाला आता वाटत नाही. उलट प्रत्येक ठिकाणी राजकारण व जातियवाद आणण्याची स्पर्धा सुरु आहे. मोदींना हे दिसत नाही असे आहे का, तर याचे उत्तर नाही असे आहे. त्यांना हेच घडवायचे आहे. कारण त्यांना हिंदुत्वाचे राजकारण करुन जातीय समिकरणे करुन सत्ता टिकवायची आहे. पंतप्रधानांनी गेल्या वेळच्या भाषणात पाकिस्तानातील फुटीर शक्तींना अप्रत्यक्षरित्या पाठिंबा दिला होता. पाकला धडा अशाच प्रकारे शिवायचा अशी त्यांची स्ट्रॉस्टिजी होती. मात्र असे करुनही पाकिस्तान काही स्वस्थ बसलेला नाही, किंवा शहाणा झालेला नाही. त्यामुळे पाकसंदर्भातील ठोश्याला ठोसा मारण्याचे हे धोरण फोल ठरले आहे. यावेळी पंतप्रधानांनी चीन बाबात निदान मौन बाळगून शहाणपणा केला आहे. चीनला उगाचच नको ते आव्हान देण्यात अर्थ नाही, कारण चीन आपल्यापेक्षा सर्वच बाबतीत पुढे गेला आहे. चीनशी युध्द झाल्यास आपण मार खाऊ हे वास्तव पंतप्रधानांना पटले असावे. त्यामुळे यावेळी त्यांनी छाती फुगवून चीनला आव्हान दिले नाही हे बरे झाले. हा देश बुद्धाचा आहे, महात्मा गांधींचा आहे. त्यामुळे आस्थेच्या नावावर हिंसेच्या मार्गाला बळ दिले जाणार नाही. देशात कोणत्याही प्रकारची हिंसा खपवून घेणार नाही, असे  जे पंतप्रदानंनी दिल्लीच्या लाल किल्यावरुन सांगितेल आहे ते कितपत खरे होते ते आता पहावे लागेल. एकूणच पंतप्रधानांच्या भाषणात नाविष्य असे काहीच नव्हते. -----------------------------------------------------------------

0 Response to "पुन्हा तीच आश्‍वासने"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel