-->
प्रदूषणाचा विळखा

प्रदूषणाचा विळखा

शुक्रवार दि. 18 ऑगस्ट 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
प्रदूषणाचा विळखा
प्रदूषणामुळे माणसाचे आयुष्य कमी होते असे नव्हे तर प्राणीमात्रांवरही मोठे परिणाम होतात. प्रदूषणाचा हा वाढत जाणारा विळखा माणसाला संपविणार की काय असा प्रश्‍न उपस्थित होतो. त्यामुळेच अनेक विकसीत देश अशा प्रकारचे उदयोग आपल्या देशातून हटवून विकसनशील किंवा गरीब देशांकडे नेत आहेत. त्यामुळे येथील जनतेचे व प्राण्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आपल्या देशात प्रदूषणाने अनेकांचे आयुष्य उध्वस्त केल्याच्या घटना काही कमी नाहीत. अलिकडेच रासायनिक कंपन्यांच्या प्रदूषणामुळे डोंबिवलीत हिरवा पाऊस पडला होता. तर आता येथील तळोजा औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक प्रदूषणामुळेही इथल्या प्राण्यांचा रंग बदलत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. शरीराला चिकटणारा रंग चाटल्याने प्राण्यांना नाना आजार जडण्याची शक्यता आहे. या रंगांमुळे कुत्र्यांना कर्करोग किंवा दृष्टी गमावावी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वायू आणि जलप्रदूषणाबद्दल तळोजा औद्योगिक वसाहत नेहमीच चर्चेत असते. येथील काही कारखान्यांतून होणार्‍या प्रदूषणाचा फटका आता प्राण्यांना बसू लागला आहे. विशेषत: श्‍वानांना याचा जास्त त्रास होत असल्याचे दिसत आहे. या परिसरात प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी सतत वाढत आहेत. त्यात श्‍वसनाचे आजार, उलट्या होणे यांचे प्रमाण जास्त आहे. काही दिवसांपासून येथील प्रदूषणामुळे कासाडी नदीतील माशांचा मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत आहे. ही घटना ताजी असताना या वसाहतीमधील काही कारखान्यांत तयार होणार्‍या रासायनिक उत्पादनांमुळे श्‍वानांना त्रास होऊ लागला आहे. काही ठिकाणी श्‍वानांचे रंगच बदलत आहेत. रासायनिक पुडमुळे हा रंग बदलत आहे. औद्योगिक परिसरातील काही कारखान्यांमध्ये कपड्यांना डाय करण्याचे रंग बनवण्यात येतात. या रंगांमुळे श्‍वानांच्या शरीराचे रंग बदलत आहेत. शरीराला लागणारा रंग श्‍वान जिभेने चाटून काढण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे तो रंग त्यांच्या पोटात जातो. या रंगांमुळे श्‍वानांना अ‍ॅलर्जी झाल्यामुळे शरीराला खाज सुटते. जखमा होऊन, त्या चिघळतात. याचबरोबर रसायनांचे बारीक कण नाकावाटे श्‍वासनलिकेत अडकून बसत असल्याने त्यांना श्‍वसनाचे त्रास होतात. पोटात गेलेल्या रसायनांमुळे जुलाब, उलटी यांसारखे त्रास त्यांना वरचेवर होतात. रासायनिक रंगांमुळे त्वचारोग, कर्करोग, सूज येणे, किडनीचे आजार जडू लागले आहेत. असे रंग डोळ्यात गेल्याने दृष्टी जाण्याची भीती असते. हे जसे श्‍वानांचे झाले तसेच माणसाचेही आहे. जर माणसांना हे रंग लागल्यास त्याचेही त्यांना परिणाम भोगावे लागतील. तळोजा औद्योगिक वसाहतीत सुमारे 330 रासायनिक कारखाने आहेत. येथून वाहणारी कासाडी नदीही प्रदूषणामुळे दूषित झाली आहे. या नदीतील मासे अनेकदा मृत अवस्थेत पाण्यावर तरंगताना दिसतात. या प्रदूषणाचा परिणाम परिसरातील प्राण्यांवरही होऊ लागला आहे. औद्योगिक वसाहतीतील अनेक श्‍वानांचा मूळचा रंग प्रदूषणामुळे बदलून ते निळे झाल्याचे वृत्त अनेकांनी दिलेही होते. श्‍वानांच्या बदललेल्या रंगाची दखल जगातील जगातील अनेक माध्यमांनी घेतली आहे. मात्र येथील प्रशासन ढिम्म आहे. गेली अनेक वर्षे या भागात प्रदूषणाचा कहर झाला आहे. रात्रीच्या वेळी अनेकदा तळोजा औद्योगिक वसाहतीच्या पाच ते 10 किलोमीटर परिसरात हानीकारक रसायनांची दुर्गंधी पसरते. अनेकदा येथील ग्रामस्थांनी याबाबत आवाज उठवूनही सरकारी पातळीवर त्याची कोणतीच दखल घेत नाहीत. अशा प्रकारे हे प्रकरण सरकार व प्रशासनाला दडपता येणार नाही. तळोजातील या औद्योगिक परिसरातील प्रत्येक कारखान्यांची तपासणी प्रदूषण नियंत्रण महामंडळाने तातडीने करण्याची आवश्यकता असून त्यातील प्रदूषण करणार्‍या कारखान्यांना रितसर नोटीसा पाठवून त्यांचे प्रदूषण कसे कमी करता येईल त्यावर उपाय योजण्याची आवश्यकता आहे. आपल्याला औद्योगिक परिसरातील कारखाने बंद करणे शक्य नाही हे आपण समजू शकतो. कारण हे कारखाने रोजगार उपलब्ध करुन देतात. मात्र येथून रोजगार मिळतो म्हणून त्यांना प्रदूषण करण्याचा परवानाच मिळाला आहे असे त्यांनी समजण्याचे कारण नाही. आता प्रदूषमावर नियंत्रण मिळविण्यासाठी नवीन तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. आवश्यकता वाटल्यास किंवा त्यांना याचे प्रकल्प उभारण्याची आर्थिक क्षमता नसल्यास त्यांना सरकारने अर्थसहाय्य करुन हे प्रकल्प उभारले गेले पाहिजेत. कारण त्याव्दारे आपण प्रदूषणावर नियंत्रण मिळवू शकतो. तसेच रोजगारही टिकवू शकतो. भोपाळच्या युनियन काब्राईड या कंपनीने हजारो जणांचे जीव घेतले होते, या घटनेला आता तीन दशकाहून जास्त काळ झाला असला तरीही आपण त्यापासून काही धडा घेतलेला नाही, असेच दिसते. माणसाला संपविणारे उद्योग आपल्याला नको आहेत. मात्र ज्या उद्योगात नियंत्रणे वापरुन आपण उत्पादन करु शकतो ते उद्योग चालू शकतात. अनेकदा घातक रसायने आपल्याकडे बनविली जातात व त्याची निर्यात केली जाते. मात्र याच्या निर्मतीत जी खबरदारी घ्यावी लागते ती घेतली जात नाही. यासाठी कायदे कडक पाहिजेत. अनेकदा आपल्याकडे हे कायदे कागदावरच राहातात. परंतु लोकांचा व प्राण्याचं जीव धोक्यात आणून आपल्याला रोजगार टिकविण्यात काहीच अर्थ नाही. आपल्यासा ठिकठिकाणी जी मिनी भोपाळ आहेत ते थांबविलेच पाहिजेत. मुंबईपासून जवळ असलेल्या रायगड जिल्ह्यातील तळोजा औद्योगिक वसाहतीत जर अशी स्थिती असेल तर अन्य ग्रामीण भागात काय स्थिती असेल त्याचा विचारच न केलेला बरा.
-----------------------------------------------------------

0 Response to "प्रदूषणाचा विळखा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel