-->
मुख्यमंत्र्यांचा त्रागा

मुख्यमंत्र्यांचा त्रागा

शनिवार दि. 19 ऑगस्ट 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
मुख्यमंत्र्यांचा त्रागा
एरव्ही शांत व संयमाने बोलणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपाच्या प्रदेश कार्यकारणीत फार त्रागा करुन बोलले. याचे कारणही तसे होते. एक तर गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांना त्यांना पाठीशी घालावे लागले आहे, त्यात त्यांची फारच मोठी कसरत विधीमंडळात व त्यानंतर बाहेरही झाली होती. त्याअगोदर शेतकरी आंदोलनाने त्यांना हैराण करुन सोडले होते. ज्या प्रसार माध्यमांच्या जोरावर आपण जिंकून आलो तीच प्रसार माध्यमे गेले दोन दिवस मुख्यमंत्री केंद्रीय मंत्रिमंडळात सामिल होण्यासाठी दिल्लीला चालेल अशा बातम्या चालवत होते. तर केवळ मुख्यमंत्रीच नव्हे तर प्रदेशाध्यक्षपदावरुन रावसाहेब दानवे यांची उचलबांगडी होणार अशा बातम्या विविध चॅनेल्स वरुन पेरल्या जात होत्या. या बातम्या एवढ्या खात्रीलायकरित्या सांगितल्या जात होत्या की, मुख्यमंत्र्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे दिल्लीचे एका जर्नीचे तिकीट त्यांच्या ताब्यात आले असावे. त्यात रिटर्न तिकिट नव्हते, अशा थाटात या बातम्यांची पेरणी केली जात होती. अर्थात यामागे कोण आहे, की केंद्रीय नेतृत्वातील कोण गुपचूप हालचाली करीत होते हे कोणालाच समजत नव्हते. या सर्व माध्यमांच्या बातम्यांमुळे मुख्यमंत्री हैराण झाले होते. त्यातच त्यांनी कॉग्रेसचे नेते नारायण रामे यांचा भाजपा प्रवेश गेले तीन महिने थोपवून ठेवला होता. मात्र त्यालाही राष्ट्रपती निवडणुकीनंतर गती आल्याने देवेंद्रदादांच्या त्राग्यात भर पडली असावी. मात्र शेवटी मुख्यमंत्र्यांना स्वत:च जाहीर करावे लागले की, मी इकडेच राहाणार आहे. मला अजूनही केंद्रातून निमंत्रण नाही. त्याचबरोबर माझ्यबरोबर दानवेही राहाणार त्यांची उचलबांगडी काही होणार नाही, असे त्यांना प्रतिपादन करावे लागणे हे त्यांच्यादृष्टीने अपमानास्पदच होते. परंतु ज्या तर्‍हेने चॅनेल्स बातम्या चालवित होते, ते पाहता त्याचा त्यांना खुलासा करणे भागच होते. अर्थात दानवे यांच्या अनेकदा झालेल्या बडबडींमुळे त्यांच्या आंगलटी त्याचीच विधाने आली आहेत, त्यामुळे त्यांची उचलबांगणी होणे हे साधे लॉजिक माध्यमांनी लावले असावे. परंतु अशा केवळ बातम्या लॉजिक लावून चालविल्या जात नाहीत. त्याच्यांमागे कोणा ना कोण तरी धनी असतो. अर्थातच दानवे यांच्या विरोधातील भाजपातील गट असावा हे काही नाकारता येत नाही. प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीच्या निमित्ताने मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्या दाखविल्या गेल्या. पण प्रत्यक्षात असे काहीच होणार नाही. हे निर्णय बैठकांमध्ये होत नसतात. भाजपाची कार्यपद्धती पक्षजनांना ठाऊक आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता मात्र त्यांनी फेटाळली नाही. त्याचबरोबर प्रकाश मेहतांवरील आरोपांबाबत त्यांनी मौन बाळगले. अर्थातच त्यांचे हे मौन जाणूनबुजून होते. मुख्यमंत्री घसरले ते शेतकरी नेत्यांवर  आणि त्यांनी अनपेक्षितरित्या त्यांच्यावर हल्ला केला. शेतकर्‍यांना अजूनही केवळ आश्‍वासने दिली जात आहेत. प्रत्यक्षात त्यांच्या हातात काहीच पडत नाही. अशा वेळी शेतकऱी आंदोलनातील सुकाणू समितीच्या नेत्यांनी यावेळी ठिकठिकाणच्या पालकमंत्र्यांना झेंडावंदन करु न देण्याचे आंदोलन केले होते. अर्थातच कुणालाही मोठा काही अडथळा झेंडावंदन करताना केलेला नाही. शेतकर्‍यांनी हे आंदोलन प्रतिकात्मक केले होते. मात्र अशा प्रकारे झेंडावंदनाला विरोध करणे म्हणजे थेट देशद्रोह असल्याची टीका करणे म्हणजे जरा अतिच झाले. अर्थात भाजपाने त्यांच्या विरोधकांना देशद्रोही म्हणण्याची आता नित्याचीच सवय झाली आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी चीनमध्ये पाऊस पडल्यावर इकडे छत्री उघडणारे हे नेते अशी नेहमीची घिसिपिटी टीका कम्युनिस्टांवर केली. अर्थातच या टीकेमुळे हे शेतकरी आपल्या नेत्यापासून काही दुरावणार नाहीत. त्यांच्यापुढे असलेले प्रश्‍न सोडविणारे नेते त्यांना पाहिजे आहेत, मग त्यांनी कधीही छत्री उघडेना. असा आरोपांची कम्युनिस्टांना सवय झालेली असते, त्यामुळे त्यांच्या कार्यात काही खंड पडत नाही. मुख्यमंत्र्यांनी असा नेत्यांना देशद्रोही म्हटले मग ज्या पालमंत्र्यांनी जाणूनबुजून दांडी मारली ते देशद्रोही नाहीत का, असाही सवाल आहे. रायगडचेे पालकमंत्री किती वेळा झेंडावंदनाला किंवा शासकीय कार्यक्रमांना उपस्थित असतात त्याचा त्यांनी जर आढावा घेतला तर त्यांनाही देशद्रोही ठरवावे लागेल. असो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दुसर्‍याच्या घरावर दगड मारताना आपलेही घर काचेचेच आहे हे लक्षात घ्यावे. एकूणच पाहता शेतकरी आंदोलनामुळे मुख्यमंत्री जेरीस आले. त्यांना इच्छेविरुध्द शेतकर्‍यांना कर्जमाफी करावी लागली आहे. राज्य दिवाळखोरीत निघावे असे कोणालाही वाटणार नाही. परंतु शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी सध्या काही प्रमाणात कर्जमाफी करुन त्याला तातडीने दिलासा देणे गरजेचे होते. कर्जमाफीमुळे शेतकर्‍यांचे प्रश्‍न सुटणार नाहीत हे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे ही काही खोटे नाही. शेतकरी नेते हे देखील मान्य करतात. परंतु सध्या शेतकर्‍यांच्या ज्या गतीने आत्महत्या वाढत चालल्या आहेत त्या पाहता तातडीने कर्जमाफीचा दिलासा देणे आवश्यक होते. शेतकर्‍यांचे कर्ज माफ़ करा, त्यासाठी राज्य दिवाशखोरीत गेले तरी चालले अशी घोषणा शेतकऱी नेत्यांनी कधीच केलेली नाही. उलट उत्तरप्रदेशाचे भाजपाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सत्तेत आल्यावर त्यांनी आपल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत शेतकर्‍यांची कर्जे माफ केली होती. त्यांच्या या निर्णयानंतरच महाराष्ट्रातही कर्जमाफीच्या मागणीने जोर धरला होता. हे मुख्यमंत्र्यांनी विसरु नये. मुख्यमंत्र्यांना आता तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. आता त्यांना आपल्या कामाचा लेखाजोखा देण्याची वेळ आली आहे. पुढील दोन वर्षांनी सरकारला निवडणुकीला सामोरे जायचे आहे. अशा वेळी आम्ही तुम्हाला काय दिले? असे सांगणार. कारण या सरकारने फारसे काहीच केलेले नाही. त्यामुळेच मुख्यमंत्र्याचा भाजपाच्या प्रदेश कार्यकारणीत त्रागा झाला आहे.
-----------------------------------------------------------------------

0 Response to "मुख्यमंत्र्यांचा त्रागा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel