-->
डाव्यांच्या एकजुटीचे पहिले पाऊल...

डाव्यांच्या एकजुटीचे पहिले पाऊल...

रविवार दि. 20 ऑगस्ट 2017 च्या मोहोरसाठी लेख -- 
------------------------------------------------
डाव्यांच्या एकजुटीचे पहिले पाऊल...
------------------------------------------
एन्ट्रो-सध्या एकूणच जगातील राजकारण पाहता सध्याचा लंबक हा उजव्या दिशेने सरकलेला आहे. भारतात मोदीं पंतप्रधानपदी बसणे, अमेरिकेच्या अध्यक्षपदी ट्रम्प येणे तसेच युरोपात काही लहान देशात उजव्या शक्तींना पाठबळ मिळणे हे त्याचे द्योतक आहे. हा लंबक आता पुन्हा डाव्या बाजूला सरकावायचा असेल तर डाव्या व पुरोगामी तसेच सेक्युलर शक्तींना पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने लाल निशाण पक्षाने टाकलेले हे विलीनीकरणाचे पाऊल महत्वाचे ठरते. आताच्या तरुण पिढीला, जे प्रामुख्याने तिशीत आहेत, त्यांना लाल निशाण पक्षाची फारशी ओळख नसावी. परंतु डाव्या चळवळीत लाल निशाणचे योगदान फार महत्वाचे आहे. आज हा पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्षात विलीन झाला असताना इतिहासात थोडे डोकावणे महत्वाचे आहे... 
----------------------------------------
डाव्या चळवळीतील एक महत्वाचा घटक असलेल्या लाल निशाण पक्षाचे 18 ऑगस्ट रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षात विलीनीकरण करण्यात आले. डाव्या चळवळीसाठी ही एक महत्वाची घटना मानली जाते. यातून डाव्यांच्या एकजुटीचे एक नवे पर्व सुरु होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकीकडे जातीयवादी उजव्या शक्ती डोके वर काढीत असताना डाव्यांची अशा प्रकारे एकजूट झाल्यास देशात काही वेगळे चित्र उभे राहू शकते. सध्या एकूणच जगातील राजकारण पाहता सध्याचा लंबक हा उजव्या दिशेने सरकलेला आहे. भारतात मोदीं पंतप्रधानपदी बसणे, अमेरिकेच्या अध्यक्षपदी ट्रम्प येणे तसेच युरोपात काही लहान देशात उजव्या शक्तींना पाठबळ मिळणे हे त्याचे द्योतक आहे. हा लंबक आता पुन्हा डाव्या बाजूला सरकावायचा असेल तर डाव्या व पुरोगामी तसेच सेक्युलर शक्तींना पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने लाल निशाण पक्षाने टाकलेले हे विलीनीकरणाचे पाऊल महत्वाचे ठरते. आताच्या तरुण पिढीला, जे प्रामुख्याने तिशीत आहेत, त्यांना लाल निशाण पक्षाची फारशी ओळख नसावी. परंतु डाव्या चळवळीत लाल निशाणचे योगदान फार महत्वाचे आहे. आज हा पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्षात विलीन झाला असताना इतिहासात थोडे डोकावणे महत्वाचे आहे. यातून आपण सध्यस्थितीचा बोध घेऊ शकतो.
लाल निशाण पक्षाची स्थापना करणारे नेते हे कम्युनिस्ट पक्षातच होते. 8 ऑगस्ट 1942 साली कॉग्रेसने ब्रिटीशांना चले जावचा नारा दिला त्यावेळी देशातील वातावरण एका नव्या वळणावर येऊन ठेपले होते. स्वातंत्र्याची चळवळ धगधगत होती. जागतिक पातळीवरचा विचार करता 1938 साली दुसर्‍या जागतिक युध्दाला तोंड फुटले होते. 1942 साली हिटलरच्या विरोधात आघाडीत रशियाही सामिल झाला होता. ग्रेट ब्रिटन यात आघाडीत सामिल होता, परंतु म्हणावा तसे त्यांचा तोपर्यंत सक्रिय सहभाग त्यावेळी नव्हता. लेनिनच्या नेतृत्वाखाली रशियात कामगारांचे राज्य स्थापन झाले होते ते कमकुवत होता कामा नये अशी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची भूमिका होती. त्यासाठी सध्यातरी हिटलरच्या विरोधी आघाडीला मजबूत करण्याची आवश्यकता आहे, अशी भूमिका कम्युनिस्ट पक्ष मांडत होता. मात्र पंडित नेहरु यांच्या मते आपला स्वातंत्र्य लढा निर्णायकी आला असताना आपण आणखी जोर लावून ब्रिटीशांकडून स्वातंत्र्य मिळवून घेणे महत्वाचे होते. युद्दामुळे ब्रिटीश हैराण झाले असताना आपल्याला स्वातंत्र्य देण्यासाठी फारशी खळखळ करणार नाहीत अशी भूमिका पंडित नेहरुंची होती. नेहरुंची ही भूमिका त्यावेळच्या एकसंघ असलेल्या कम्युनिस्ट पक्षाला पटत नसली तरीही पक्षातील तरुण नेते कॉ. यशवंत चव्हाण, कॉ. एस.के.लिमये, कॉ.भाऊ फाटक व कॉ. लक्ष्मण मेस्त्री यांना पटली नव्हती व त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतलाच. मात्र त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. कम्युनिस्ट पक्षात त्याकाळी (व आजही) सदस्य होणे ही सोपी बाब नव्हती. अनेक दिव्ये पार केल्यावर एखाद्याला सदस्यपद मिळत असे. मात्र याच चौघा तरुणांनी पक्षातून काढून टाकल्यावर आलेली नामुष्की पाहता त्यावर आपण चळवळीतच काम करत राहाण्याचे ठरविले. यातून नवा पक्ष स्थापन करणे त्यांना मनाला पटत नव्हते, कारण त्यांना कम्युनिस्ट पक्ष एकच राहावा असेही वाटत असे. म्हणून त्यांनी नवजीवन संघटना स्थापन केली. याच संघटनेचे काम करीत असताना 1942 साली कॉ. यशवंत चव्हाण यांचे कोल्हापूरात स्वातंत्र्य चळवळीविषयी आक्रमक भाषण झाले. यातून अनेक तरुण त्यांच्या संघटनेत सामील झाले. यात कॉ. डी.एस. कुलकर्णी, कॉ. ए.डी.भोसले, कॉ. मधुकर कात्रे या तरुणांचा समावेश होता. कॉ. एस.के.लिमये हे त्यांचे अभ्यासवर्ग घेत. यातून संघटनेची वैचारिक बांधणी होत होती. तो काळ डाव्या पक्षांच्या भरभराटीचा काळ होता. तरुण डाव्या चळवळीकडे तसेच स्वातंत्र्य चळवळीकडे आकर्षित होत होते. 1947 ते 52 या काळात याच वेळी शेकापमध्ये मोठ्या प्रमाणावर तरुणांची फौज दाखल झाली होती. त्यावेळी नवजीवन संघटनेतील तरुणांना शेकापचे तत्कालीन नेते भाई जेधे व भाई मोरे यांनी शेकापमध्ये सामिल होण्याचे आवाहन केले. त्यानुसार नवजीवन संघटना शेकापमध्ये विलीन झाली. त्याचवेळी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र या तरुणांचे काही शेकापमध्ये काही जमेना त्यामुळे त्यांनी तीन महिन्यातच शेकापमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. परंतु ते बाहेर पडताना त्यांच्याबरोबर शेकापचे नेते दत्ता देशमुख, जीवनराव सावंत, वसंतराव सावंत, बी.डी.पाटील हे देखील बाहेर पडले. त्याकाळी नवजीवन संघटनेचा हा गट पॉवरफूल होता, राजकीयदृष्ट्या घट्ट होता. क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या कामगार किसान पक्षात ते जाणार होते मात्र हा पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्षात विलीन झाल्याने नवजीवन संघटनेतील तरुणांनी आपले संघटन पुन्हा याचा नावाने करण्यास सुरुवात केली. एकत्रिक कम्युनिस्ट पक्ष असावा ही त्यांची प्रमुख मागणी होती. मात्र यातच 65 साली कम्युनिस्ट पक्षात उभी फूट पडली व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा जन्म झाला. यानंतर लगेचच नवजीवन संघटनेच्या नेत्यांनी 66 साली लाल निशाण पक्षाची स्थापना केली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लाल निशाण पक्ष समितीतील एक बिनीचा शिलेदार होता. खरे तर दत्ता देशमुखांनी या संयुक्त महाराष्ट्र समितीला ग्रामीण नेतृत्वाचा चेहरा दिला. तोपर्यंत ही समिती बहुतांशी शहरी नेत्यांचीच होती. संयुक्त महाराष्ट्र समितीत जागा वाटपावरुन बरीच भांडणे झाली होती. त्यावेळी लाल निशाणने आम्हाला एकही सिट देऊ नकात मात्र समिती टिकली पाहिजे अशी भूमिका घेतली होती. शेवटी लाल निशाणच्या वाट्याला आठ जागा आल्या व त्यावेळी त्यांचे आठही उमेदवार विजयी झाले होते. लाल निशाण पक्षाचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी चळवळीला नेहमीच प्राधान्य दिले. पक्षाचा अभिनिवेश नेहमीच त्यांनी दुय्यम ठेवला तसेच सर्व कम्युनिस्ट विचारांचे पक्ष एक झाले पाहिजेत अशी त्यांची भूमिका राहिली. या पक्षाचे नेते किती तत्वनिष्ठ होते याचे एक उत्तम उदाहरण द्यायचे म्हणजे, 1962 साली चीनने भारतावर आक्रमण केले त्यावेळी देशातील सर्वच कम्युनिस्ट नेत्यांना सरकारने अटकेत टाकले होते. त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांना केंद्राचे आमंत्रण आले होते. त्यावेळी त्यांनी दिल्लीला जाण्यापूर्वी जेलमध्ये दत्ता देशमुख यांची भेट घेतली व त्यांना कॉग्रेसमध्ये आल्यास मुख्यमंत्री करतो असे आश्‍वासने दिले होते. त्यावेळी केंद्रात यशवंतरावांच्या शब्दाला मान होता. त्यामुळे दत्ता देशमुख मुख्यमंत्री सहजरित्या झालेही असते. परंतु कॉ. देशमुखांनी ही ऑफर जेलमध्येच धुडकाविली. एखादा माणूस पदावर येऊन घडी बदलू शकत नाही. सत्तेचे आमुलाग्र परिवर्तन झाले पाहिजे, असे आमचे ठाम आहे, असे मत ठणकावून त्यावेळी दत्ता देशमुखांनी यशवंतरावांपाशी व्यक्त केले होते. दत्ता देशमुखांना आपले मुख्यमंत्रीपद गेले याची खंत त्यांना कधी पुढच्या आयुष्यात वाटली देखील नाही. हे उदाहरण यासाठीच सांगावयाचे की, लाल निशाण पक्षाचे नेते असे विचारांशी पक्के बांधलेले होते. त्यांनी कधीच कोणत्या पदाची लालसा धरली नाही. त्यांनी नेहमीच चळवळीला प्रधान्य दिले. संयुक्त महाराष्ट्रानंतर त्यांनी निवडणुकीचे राजकारण सोडले व कामगार, कष्टकर्‍यांच्या संघटना उभारण्यावर सर्व लक्ष केंद्रीत केले. जर त्यांनी निवडणुका लढविल्या असत्या तर अगदी आजवर त्यांना एक-दोन आमदार विधानसभेत पाठविणे शक्य होते. 1982 साली गिरणी कामगारांचा ऐतिहासिक संप झाला. त्यावेळी गिरणी कामगारांची संपाची उर्मी जबरदस्त होती, त्यांची एकजूट वाखाणण्याजोगी होती. गिरणी कामगारातील कॉग्रेसची मान्यताप्राप्त संघटना, राष्ट्रीय मिल मजदूर संघ ही देखील पूर्णपणे यात हादरली होती. त्यावेळी मात्र कामगारांचा डॉ. दत्ता सामंतांवरील विश्‍वास पाहून लाल निशाण पक्षाची असलेली कापड कामगार संघटना त्यांनी डॉक्टरांच्या संघटनेत विलीन केली. लाल निशाण पक्षाचे काम काम हे मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक या महत्वाच्या शहरात जोरात होते. प्रामुख्याने तळागाळातील असंघटीतांना संघटीत करण्याचे अवघड काम त्यांच्या नेत्यांनी केले. उस तोडणी कामगार, कोतवाल, पी.डब्ल्यू.डी. कामगार, आंगणवाडी सेविका या तळागातील संघटना त्यांच्याकडे होत्या. शून्यातून त्यांनी विश्‍व उभारले. कॉ. यशवंतराव चव्हाण, कॉ. एस.के.लिमये या नेत्यांनी तर आपल्या वाट्याची वैयक्तीक असलेली मालमत्ता विकून पक्षाला निधी दिला. मुंबई, पुण्यात स्वतंत्र्य्रित्या राहाणे परवडणारे नव्हते म्हणून यांचे नेते कम्युनमध्ये राहात. बहुतांशी नेते व कार्यकर्त्यांच्या पत्नी या नोकरी करीत व घरखर्च चालवित. अशा प्रकारच्या नेत्यांचा आदर्श आजकालच्या राजकारण्यांनी घेण्याची आवश्यकता आहे. 1986 साली रशियात अनेक बदल गोर्बोचेव्ह यांनी ग्लासनॉस्त व पेरेस्त्राईकाच्या रुपाने करण्यास सुरुवात केली होती. गोर्बोचेव्ह यांच्या या सुधारणांचे लाल निशाण पक्षाने स्वागत केले होते. रशियाने अफगाणिस्तानातून आपले सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली होती. जागतिक शांततेसाठी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी काही सकारात्मक पावले टाकली होती. रशियाने चीनशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला होता. अशा वेळी भारत-रशिया-चीन असा जर मैत्रीचा, सहकार्याचा त्रिकोण तयार झाला तर जागतिक पातळीवर अमेरिकेलाही शह देता येऊ शकतो अशी थेअरी कॉ. एस.के.लिमये यांनी मांडली होती. यासाठी कॉग्रेस व कम्युनिस्टांनी एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादन केली होती. परंतु त्याकडे फारसे कुणी लक्ष दिले नाही. मात्र नंतर कॉग्रेस व कम्युनिस्टांनी एकत्र येऊन काम करण्याची त्यांची भविष्यवाणी यु.पी.ए.च्या रुपाने सत्यात उतरली होती. काँग्रेसशी जागतिक पातळीवरील प्रश्‍नांमध्ये सहकार्य करणे मात्र त्याचबरोबर देशातील प्रश्‍नांबाबत संघर्ष करण्याची भूमिका त्यांनी मांडली होती. इंदिरा यांधी यांनी वेळोवेळी जी पुरोगामी पावले उचलली होती त्याचे त्यांनी नेहमीच स्वागत केले होते. अर्थात त्याबाबत त्यांच्या लाल निशाण पक्षातही मतभेद होते. यातूनच लाल निशाण (लेनिनवादी) हा त्याच्यांतून फूटून नवीन गट स्थापन झाला. कॉग्रेसबाबत घ्यावयाची भूमिका त्यांना प्रामुख्याने पटत नव्हती. ज्यावेळी भाजपाच्या लोकसभेत दोन जागा होत्या वेळी लाल निशाणचे नेते कॉ. लिमये यांनी जातियवादी शक्तींच्या वाढत्या प्रभावाबद्दल चिंता व्यक्त केली होती. आता भाजपला कॉग्रेस संपवायची आहे म्हणजे, नेहरुंच्या विचारांची कॉग्रेस संपवायची आहे. जे नेहरुंच्या विचारांपासून दूर आहेत असे कॉग्रेसचे नेते भाजपात सध्या रांगा लावून प्रेवश करीत आहेतच. कॉग्रेसमध्ये देखील ज्या भांडवली शक्ती आहेत त्या जनहिताच्या विरोधातील शक्ती आहेत. महात्मा फुले, शाहू महाराजांऩी सर्वांना मोफत शिक्षण देण्याची सरकारची जबाबदारी आहे, असे म्हटले होते. मात्र कॉग्रेसमधील शिक्षणसम्राट असलेल्या नेत्यांना हे धोरण कसे पटणार? त्यामुळे कॉग्रेसच्या या जनता विरोधी धोरणावर वचक ठेवला पाहिजे, असे लाल निशाण पक्षाचे मापन काही चुकीचे नाही. अर्थात त्यांची कॉग्रेससंदर्भातील ही मते बहुतांशी सर्वच कम्युनिस्टांना पटतील किंवा सेक्युलर नेत्यांना पटतील असेही नाही. परंतु आता जर जातियवादी शक्तींचा पाडाव करायचा असेल तर यु.पी.ए.-1 च्या धर्तीवर किमान समान कार्यक्रम आखून पुढे गेले पाहिजे. त्यातून लाल निशाणने भारतीय कम्युनिस्ट पक्षात आपले विलीनीकरण केले आहे. डाव्या पक्षांसाठी हे एक चांगले पाऊल ठरावे.
--------------------------------------------------------      

0 Response to "डाव्यांच्या एकजुटीचे पहिले पाऊल..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel