-->
पावसाचा रुसवा कायम

पावसाचा रुसवा कायम

सोमवार दि. 21 ऑगस्ट 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
पावसाचा रुसवा कायम
-----------------------------------
संपूर्ण कोकणपट्टीत समाधानकारक पाऊस पडलेला असला तरीही देशाचा विचार करता मात्र अपेक्षेएवढा पाऊस पडलेला नाही. आसाम, बिहार, पश्‍चिम बंगाल, उत्तरप्रदेश या राज्यात अनेक भागात पूर आलेला असला तरी देशाचे सरासरी पर्ज्यमान हे पाच टक्क्याहून कमीच आहे. 18 ऑगस्टपर्यंत महिन्याभरात अपेक्षेपेक्षा 24 टक्के पाऊस कमी पडला आहे. मध्य भारतात पावसाने गेल्या महिन्याभरात दडी मारल्याने शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. देशाच्या अंदाजानुसार यंदा गेल्या वर्षाच्या सरासरीएवढा तरी पाऊस पडण्याची हवामान खात्यास अपेक्षा होती. फारच तर काय, काहीसा थोडा पाऊस कमी पडण्याची शक्यता नाकारता येणार नव्हती. हवामानखात्याच्या अंदाजानुसार पाच ते दहा टक्के अंदाज कमी-जास्त ठरु शकतो. मात्र हा अंदाज यावेळी खोटा ठरणार की काय अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे. जून महिन्यात मध्य भारतात सर्वात कमी म्हणजे 58 टक्के कमी पाऊस पडला. त्याखालोखाल उत्तर-पश्‍चिम विभागात 37 टक्के कमी झाला. मात्र संपूर्ण देशाचा विचार करता 5 टक्के पावसाची सरासरी कमी आहे. अर्थात अजूनही पावसाळा पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे आपला कोटा पाऊस पूर्ण करेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. बंगालच्या उपसागरात आता कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने येत्या आठवड्यात चांगलाच पाऊ पडेल अशी अपेक्षा आहे. मध्यभारत व पश्‍चिम किनारपट्टी या भागात त्यामुळे पावसाची घट भरुन निघेल. जुलै महिन्यात पावसाच्या आगमात अनेक अडथळे निर्माण झाले. हिंद महासागरात पावसासाठी जे अपेक्षित वातावरण तयार होणे अपेक्षित होते त्याला विविध कारणाने अडथळे निर्माण झाले. याचा परिणाम म्हणून जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण घटले. या घडामोडींनंतर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टाच तयार झाला नाही. पॅसिफिक महासागरात एखादे वादळही निर्माण झाले नाही. तसे काही वादळ आले असते तर त्याचा आपल्याला उपयोग झाला असता. मात्र तसे काहीच घडले नाही. त्यामुळे समुद्र गेले महिनाभर शांतच आहे. पावसाच्या निर्मीतीसाठी जे आवश्यक घटक असतात तशा हालचाली समुद्रात झाल्याच नाही. आता मात्र भारतीय उपसागरात काही हालचाली होऊ लागल्या आहेत व त्याचा फायदा आता आपल्याला मिळेल असे दिसते आहे. उत्तर पश्‍चिम भारतात पावसाची आता चिन्हे दिसत आहेत. देशाच्या अनेक भागात पावसाने तीन आठवड्याची सुट्टी घेतली आहे व ही सुट्टी आता दीर्घकालीन झाली. आता तरी पाऊस पडण्याची गरज आहे. एकीकडे बिहार, उत्तरप्रदेश, आसाम, बंगाल या राज्यात पावसाने धुमाकूळ घालून पूर स्थिती निर्माण केली आहे. तर दुसरीकडे मात्र दुष्काळ येईल की काय अशी स्थिती आहे. एकीकडे ओला तर दुसरीकडे सुका दुष्काळ अशी परिस्थिती आहे. हरयाणा, उत्तरप्रदेशचा पश्‍चिम भाग, मध्यप्रदेशचा पश्‍चिम भाग, महाराष्टातील विदर्भ व मराठवाडा, संपूर्ण कर्नाटक, केरळ या राज्यात पाऊस सरासरीच्या 20 टक्के अजूनही कमी आहे. देशातील इतर 36 उपविभागांपैकी 26 विभागात पाऊस अपेक्षित आहे किंवा जास्त आहे. ईशान्य भारत व हिमालयाच्या पट्यात पाऊस नेहमीपेक्षा चालू महिन्यात जास्त झाला आहे. यातील अनेक भागात पूर आले आहेत. दक्षिण भारतात जुलै महिन्यात पावसाने जवळपास दडीच मारली. या महिन्यात येथे 36 टक्के पाऊस कमी झाला. चालू महिन्यात या भागात बरा पाऊस पडला असला तरीही 16 टक्के घट कायमच आहे. पावसाच्या दांडीमुळे अनेक भागात खरीबाचे पिक धोक्यात आले आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाच्या कमी पडण्याचा सर्वाधीक फटका शेतकर्‍यांना बसणार आहे. तेलबिया व डाळींच्या पीकाला सर्वात जास्त फटका बसणार आहे. या दोघांचेही पीक यंदा कमी येणार असून त्यामुळे मागणीचा पुरवठा करण्यासाठी सरकारला विदेशी चलन खर्च करुन यांची आयात करावी लागेल. त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार हे नक्की. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खरीबाची पेरणी कमी झाली आहे. त्यातून अंतिम पीक कसे येते हा मुददा नंतरचा. गेल्या वर्षीपेक्षा हे उत्पादन कमीच होईल हे स्पष्ट आहे. तेलबियांचे लागवड क्षेत्रही यावेळी कमी झाले आहे. त्यामुळे तेलबियांचे उत्पादन घसरणार आहे. एकूणच देशात सध्या काही राज्यात पूरस्थिती असली तरी संपूर्ण देशाचा विचार करता काही भागात पावसाने दडी मारल्याने मोठी अडचणीची स्थीती निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी देशात पावसाची सर्वत्रच समाधानाची परिस्थिती होती. मात्र त्यापूर्वी सलग तीन वर्षे पावसाने सर्वांनाच फसविले होते. त्यामुळे दुष्काळाची स्थिती अनेक भागात होती. अल् निओमुळे पाऊस चांगला पडणार नाही असे हवामानखात्याचे म्हणणे होते. गेल्या वर्षीच यासाठी अपदाव ठरले. अल् निओचा प्रभाव आता यंदा नसेल असे सांगितले जात होते. परंतु असे असूनही पाऊस काही सर्वांचे समाधान करेल असे दिसत नाही. यंदा कमी पाऊस होणार म्हणजे पुन्हा एकदा महागाई डोके वर काढणार हे नक्की आहे. त्यातच शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांची गंभीरता आणखीन वाढणार आहे. गेल्या काही महिन्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे प्रमाण काही कमी झालेले नाही. उलट त्यात झपाट्याने वाढच झाली आहे. हे सर्व प्रश्‍न सोडविण्याची तयारी सरकारने ठेवली पाहिजे. अन्यथा केवळ महागाईच नव्हे तर शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे प्रमाण रोखणे कठीण जाईल.
-----------------------------

0 Response to "पावसाचा रुसवा कायम"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel