-->
विरोधकांचा नवा प्रयत्न

विरोधकांचा नवा प्रयत्न

मंगळवार दि. 22 ऑगस्ट 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
विरोधकांचा नवा प्रयत्न
मोदी सरकार आणि एनडीएच्या विरोधात विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा एकजुटीचे प्रयत्न सुरु केले आहेत. आता मात्र यावेळी बहुजन समाज पक्षाने यात पुढाकार घेतला असून बहुजन समाज पक्षानेही सामाजिक हितासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. बहुजन समाज पक्षाने ट्विटरवर एक पोस्टर शेअर केले आहे. ज्यात मायावती, अखिलेश यादव, लालूप्रसाद यादव, ममता बॅनर्जी, सोनिया गांधींसह अनेक नेते एकत्र आल्याचे दाखविण्यात आले आहे. मात्र बहुजन समाज पक्षाचे राष्ट्रीय महासचिव एस. सी. मिश्रा यांनी सांगितलं की, फोटो शेअर करण्यात आलेले ट्विटर अकाऊंट हे बहुजन समाज पक्षाचे अधिकृत अकाऊंट नाही. खरंतर 2014च्या देशात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यावर राजनैतिक घडामोडींना वेग आला होता. मात्र भाजपा ज्या गतीने फोफावत होता ते पाहता, विरोधकांचे अनेकवेळा खच्चीकरणच होत होते. भाजपानं आतापर्यंत अनेक राज्यांत सत्ता स्थापन केली आहे. तसेच राजकारणातही भाजपाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असल्यानं विरोधी पक्षांसाठी स्वतःचे अस्तित्व टिकवणे मोठें आव्हान ठरु लागले आहे. त्यामुळेच विरोधी पक्ष स्वतःमधील मतभेद विसरून एकत्र येण्याचे अपील करत आहेत. बहुजन समाज पक्ष हा कधीही युती करण्यापासून टाळाटाळ करत आला आहे. मात्र आता ट्विटरच्या माध्यमातून फोटो शेअर करत बहुजन समाज पक्षाने सामाजिक हितासाठी अखिलेश यादवपासून सोनिया गांधींपर्यंत सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. बहुजन समाज पक्षानं शेअर केलेल्या फोटोमध्ये काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, जेडीयू नेते शरद यादव, आरजेडीचे नेते लालूप्रसाद यादव, तेजस्वी यादव, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह अखिलेश यादवांचाही समावेश आहे. या सर्व नेत्यांमध्ये मायावतींचा फोटो सर्वात मोठा दाखवण्यात आला आहे. मायावती उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीला सर्वात मोठा शत्रू मानते. मात्र आता मायावती त्याच समाजवादी पक्षाला सोबत घेऊन काम करू इच्छिते आहे. मात्र काही वर्षांपूर्वी मायावतींवर समाजवादी पार्टीच्या नेत्यांनी गेस्ट हाऊसमध्ये हल्ला केला होता. त्यावेळी भाजपा नेत्याने मायावतींचा जीव वाचवला आहे. त्यामुळे निकराचा विरोध असतानाही मायावतींनी एकत्र येण्याचे अपील केले आहे. समाजवादी पार्टीसोबत एकत्र येण्याचे आवाहन केल्यामुळे मायावतींची राजकीय अपरिहार्यता दिसून येते आहे. त्यापेक्षाही विरोधकांसाठी एक महत्वाचे पाऊल लवकरच आता पडणार आहे,अशी चिन्हे दिसू लागली आहेत. मध्यावधी निवडणुकीला आता जेमतेम दोन वर्षे शिल्लक राहिली आहेत. सत्तधारी भाजपा मात्र जोरात आहे याबाबत काहीच शंका नाही. अर्थात असे असले तरी पूर्णपणे चेपल्या गेलेल्या विरोधकांना आता हळूहळू नवसंजीवनी मिळत आहे, असे म्हमावयास हरकत नाही. सुमारे दीड वर्षांपूर्वी झालेल्या बिहारमधील निवडणुकीत लालू-नितीश-कॉग्रेस यांनी एकत्र येऊन भाजपाचा पराभव केला होता. सेक्युलर शक्ती जर एकत्र आल्या तर भाजपाचा पराभव निश्‍चित होऊ शकतो हे या विजयाने दाखवून दिले होते. परंतु भाजपा नितीश कुमार यांना फोडण्यास यशस्वी ठरला आणि भ्रष्टाचाराचे भांडवल करीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यांच्याशी असलेल्या आघाडीतून फारकत घेतली. नितीश कुमार यांनी संधीसाधू राजकारण करीत बिहारमधील सेक्युलर राजकारणाला छेद दिला. अर्थात नितीश कुमार हे यात तरबेज आहेत. यापूर्वी देखील त्यांनी अशा प्रकारचे राजकारण केलेले आहे. सत्तेसाठी यापूर्वी भाजपाशी त्यांचे साटेलोटे होतेच. मात्र यावेळी त्यांनी सेक्युलर राजकारणाच्या शपथा घेतल्या होत्या, त्यामुळे नितीश कुमार पुन्हा भाजपाच्या वळचमीला लागणार नाहीत असे अनेकांना वाटत होते. परंतु झाले उलटेच. खरे तर विरोधी पक्ष नितीश कुमार यांना विरोधकांचे पंतप्रधानांचे उमेदवार म्हणून पाहत होते. मात्र त्यांनी आता बिहारमधील चित्रच पालटून टाकल्याने विरोधी पक्षांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. आता मात्र नितीश कुमार यांच्या धक्यातून विरोधी पक्ष सावरत आहेत असेच दिसते. आता मायावतींनी विरोधकांची मोट बांधण्यास पुढाकार घेतला ही बाब चांगली झाली. सर्वात महत्वाचे म्हणजे मायावतींनी त्यांचा प्रमुख विरोधक असेलेल्या समाजवादी पक्षाला आपल्या सोबत घेण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे विरोधकांचे बळ निश्‍चितच वाढणार आहे. भाजपाला आता सत्ता बळकाविण्याचे तंत्र जमले आहे. त्यासाठी त्यांना हिंदू मतांचे धृवीकरण करावे लागते. प्रत्येक राज्यातील निवडणुकीच्या अगोदर त्यांनी काही ना काही कारणे निर्माण करुन हिंदूंची मते कशी एकवटीतील याचा प्रयत्न केला आहे. यातूनच त्यांची ताकद वाढली आहे. त्यासाठी कोणाचा जीव गेला तरी त्यांना त्याचे काही देणेघेणे नाही. त्यामुळे यापूर्वी कॉग्रेस अल्पसंख्यांना संरक्षण देत असे अशी टीका करणारा भाजपा आता हिंदूंची मते एकत्र करुन मते आपल्या पदरात पाडून घेत आहे. व त्यायोगे सत्ता काबीज करीत आहे. भाजपाने केलेले हिंदूंचे राजकारण चालते, मात्र कॉग्रेसचे अल्पसंख्यांचे राजकारण नको, असा भाजपाचा कावा आहे. कॉग्रेसमुक्त भारत ही भाजपाची घोषणा होती. मात्र आज सत्तेसाठी कॉग्रेस पक्षातले अनेक नेते भाजपाच्या दारात गेले आहेत. त्यामुळे कॉग्रेसमुक्त भाजपा नव्हे तर कॉग्रेस युक्त भाजपा असे म्हटले पाहिजे. या सर्व राजकारणाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व विरोधी पक्षांना एकजूट करुन भाजपाच्या लोकशाही विरोधी कृत्यांना व देशाच्या घटनेलाच आव्हान देण्याच्या राजकारणाला विरोध करण्यासाठी एकत्र आले पाहिजे. मायावतींचा हा प्रयत्न कितपत यशस्वी होते ते काळच ठरवील. परंतु निदान मायावतींनी यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे हे स्वागतार्ह ठरावे.
-------------------------------------------------------------------

0 Response to "विरोधकांचा नवा प्रयत्न"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel