-->
मराठी मौनी खासदार

मराठी मौनी खासदार

बुधवार दि. 23 ऑगस्ट 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
मराठी मौनी खासदार
राज्यातील 48 पैकी मोजके 15 मराठी खासदार संसदेत जनतेचे प्रश्‍न मांडण्यात अग्रेसर होते, अशी धक्कादायक माहिती हाती आली आहे. अन्य खासदार हे मौनी बाबाच होते. अरविंद सावंत, सुप्रिया सुळे, हीना गावित, भावना गवळी, श्रीरंग बारणे, पूनम महाजन-राव, धनंजय महाडिक आदी अपवाद वगळता आंध्र प्रदेश, पश्‍चिम बंगाल, ओडिशा, केरळ आदी राज्यांतील खासदारांच्या तुलनेत अनेक मराठी खासदार तीन वर्षांनंतर अजूनही संसदेत प्रभाव तर सोडाच; पण बोलण्यासाठीही ओळखलेच जात नाहीत. राज्यातील खासदारांनी अशा प्रकारे मौन धारण केल्याने संसदेत राज्याच्या जनतेचे प्रश्‍न कसे उपस्थित होणार असा सवाल आहे. अर्थात सत्ताधारी असोत किंवा अन्य पक्षांचे खासदार हे एकाच माळेचे मणी ठरले आहेत. मात्र नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात प्रश्‍न उपस्थित करणे वा चर्चांमध्ये सहभागी होण्यात लोकसभेपेक्षा महाराष्ट्रातील राज्यसभा खासदारांनी लक्षवेधी कामगिरी केली आहेे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार फटकारल्यानंतरही सत्तारूढ पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांसह भाजप खासदार संसदेत पूर्णवेळ उपस्थित राहण्याबाबत उदासीनच दिसून येत आहेत. या अधिवेशनात 100 टक्के उपस्थित राहणार्‍यांत भाजपचे केवळ सात ते आठ खासदार आहेत. श्रीरंग बारणे यांनी या अधिवेशनात लेखी-तोंडी मिळून सर्वाधिक 51 प्रश्‍न उपस्थित केले. महाडिक (46), सुळे (45), गावित (42) यांचेही प्रश्‍न लक्षणीयरीत्या उपस्थित झाले. अशोक चव्हाण यांनी केवळ एक प्रश्‍न उपस्थित केला तर जेमतेम एका चर्चेत ते सहभागी झाले. ते केवळ 33 टक्के म्हणजे सर्वांत कमी काळ संसदेत हजर राहिल्याचे दिसते. रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीचे प्रमाण 67 टक्के असून, त्यांनी केवळ सात प्रश्‍न विचारले. ते देखील एकाही चर्चेत सहभागी झालेले नाहीत. पुण्याचे खासदार अनिल शिरोळे, नगरचे दिलीप गांधी, कृपाल तुमाने, चिंतामण वनगा, संसदेबाहेर विलक्षण सक्रिय असलेले हेमंत गोडसे आदी अनेक खासदार मौनींमध्ये गणले जातात. भाजपशी मनभेद झालेले नाना पटोले यांची उपस्थिती दणदणीत असली तरी प्रश्‍न (19) व चर्चांत सहभाग (03) याबाबत तेही या वेळेस उदासीन दिसले. राज्यसभा हे तसेही ज्येष्ठांचेच सभागृह असल्याने येथील अमर साबळे व संजय काकडे हे पन्नाशीच्या घरातले सदस्य येथील सर्वांत तरुण मराठी खासदार आहेत. डी. पी. त्रिपाठी (78), शरद पवार (75), हुसेन दलवाई (74) हे सत्तरीच्या पुढचे सदस्य आहेत. राज्यसभा हे सतत चालणारे सभागृह असल्याने हजेरी वगळता खासदारांनी विचारलेले प्रश्‍न व चर्चांतील सहभाग यांची एकत्रित माहिती संसदेतर्फे ठेवली जाते. या तिन्ही बाबतीत अजय संचेती, रजनी पाटील, दलवाई यांनी आघाडी कायम ठेवली आहे. डॉ. विनय सहस्रबुद्धे व वंदना चव्हाण यांचाही संसदेतील लक्षवेधी मराठी वक्त्यांत समावेश आहे. पी. चिदंबरम हे सर्वांत अल्प काळ   सभागृहात हजर राहिले व त्यांनी नोटाबंदी वगळता एकाही चर्चेत भाग घेतलेला नाही.

0 Response to "मराठी मौनी खासदार"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel