-->
शेतकर्‍यांना दिलासा

शेतकर्‍यांना दिलासा

बुधवार दि. 23 ऑगस्ट 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
शेतकर्‍यांना दिलासा
शेतकरी कर्जमाफीसाठी सर्व लाभार्थी शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज भरून होईपर्यंत केंद्रे सुरू ठेवण्यात येणार असल्याची घोषणा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केल्याने खर्‍या अर्थाने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. त्याअगोदर अर्ज करण्यासाठी शेतकर्‍यांना फारच कमी कालावधी दिलेला होता. या मुदतीत उर्वरीत शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज भरणे अशक्य होते. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी 31 ऑगस्टच्या मुदतीवरून राज्यातील शेतकर्‍यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. बरे यासंबंधी वेगवेगळ्या तारखा सांगितल्या जात असल्याने गोंधळात भर पडली होती. त्यामुळे ग्रामीण भागात ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी सुविधा केंद्रांपुढे शेतकर्‍यांची झुंबड उडली होती. राज्य सरकारने राज्यातील शेतकर्‍यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत शेतकर्‍यांचे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले. सुमारे दीड लाखांपुढील शेतकर्‍यांसाठी एकरक्कमी परतफेड योजनेचा लाभ दिला जाणार आहे. नियमित कर्ज परतफेड करणार्‍यांसाठी 25 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. तसेच या योजनेत कर्ज पुर्नगठीत झालेल्या शेतकर्‍यांनाही लाभ दिला जाणार आहे. या कर्जमाफीचे लाभ देण्यासाठी शेतकर्‍यांची माहिती ऑनलाइन अर्जाद्वारे घेतली जात आहे. ऑनलाइन अर्ज भरून घेण्यासाठी 26 हजार केंद्रांवर सुविधा उपलब्ध केल्याचे राज्य सरकार सांगत आहे. आपले सरकार सेवा केंद्र, नागरिक सुविधा केंद्र, संग्राम आणि काही ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचा समावेश आहे. प्रत्यक्षात, यापैकी 13 हजार केंद्रे बंदच असल्याची टीका राज्य सरकारच्या सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेने केल्याने सरकारला घरचा आहेर मिळाला होता. राज्यात सध्या एकेका दिवसात एक ते सव्वा लाख शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज भरून होत आहेत. राज्य सरकारच्या दाव्यानुसार राज्यात 90 लाख शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे उर्वरित सुमारे 75 लाख शेतकर्‍यांचे ऑनलाइन फॉर्म भरायला पुढचे किमान दीड ते दोन महिने जातील असा अंदाज आहे. त्यातच कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज करण्यासाठी राज्य सरकारने 31 ऑगस्टपर्यंतची मुदत दिल्याची चर्चा होती. अर्ज करण्यासाठी शेतकर्‍यांना फारच कमी कालावधी होता. त्यामुळे या मुदतीत उर्वरीत शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज भरणे अशक्य होते. मात्र आता सरकारने ही मुदत काढून टाकल्याने शेतकरयंना फार मोठा दिलासा लाभला आहे.
------------------------------------------------------

0 Response to "शेतकर्‍यांना दिलासा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel