
सहाराचे गौडबंगाल ( अग्रलेख )

नेहमीच वादाच्या भोव-यात राहिलेल्या सहारा उद्योगसमूहाच्या दोन कंपन्यांवर सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी)ने अखेर कारवाई केली आहे. सहारा समूहातील दोन कंपन्यांची तसेच सहाराचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांच्या खात्यासह सर्व संचालकांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. अशा प्रकारे एखाद्या कंपनीची खाती गोठवून कारवाई करण्याची सेबीच्या इतिहासातील ही पहिलीच घटना. खरे तर ही कारवाई अगोदरच व्हायला पाहिजे होती. सर्वोच्च न्यायालयाने शेअर बाजाराच्या या नियामक संस्थेला सहारावर कारवाई करण्यास का चालढकल केली जात आहे, असा प्रश्न उपस्थित केल्यावर सेबीने कारवाईचा बडगा उगारला. सहारा इंडिया रिअल इस्टेट कॉर्पोरेशन लि. व सहारा हाउसिंग इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लि. या कंपन्यांनी बेकायदेशीररीत्या बाजारातून पैसा उभा केल्याच्या तक्रारी होत्या. तसेच गुंतवणूकदारांना त्यांनी अवास्तव परतावा देण्याचे प्रलोभन दिले होते. सहारा समूहाच्या या दोन कंपन्यांनी सुमारे 24 हजार कोटी रुपये विविध प्रकारचे रोखे विक्रीस काढून उभारले होते. कोणत्याही प्रकारचा निधी जनतेकडून उभारताना सेबीची जी नियमावली आहे, त्याचे पूर्णपणे उल्लंघन करून हा पैसा उभारण्यात आला होता. आपल्याला ‘राजकीय’ सहारा असल्याने आपण भांडवल बाजारातही जनतेचा पैसा सर्व नियम धाब्यावर बसवून उभारू शकतो, असा एक समज सुब्रतोदांचा झाला होता. गेली तीन वर्षे याविरोधात न्यायालयीन लढाई चालू होती.
सहा महिन्यांपूर्वीच सहाराला तीन टप्प्यांत सर्व पैसे गुंतवणूकदारांना सव्याज परत करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेही होते. परंतु कधीच नियम पाळण्याची सवय नसलेल्या सहाराने या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ सुरू केली होती. सहाराच्या दाव्यानुसार, त्यांनी सुमारे 19 हजार कोटी रुपये गुंतवणूकदारांना परत केले आहेत. मात्र सेबीला हा दावा मान्य नाही. त्यांनी संचालक, कंपन्यांची खाती गोठवून त्यातील रकमा एका स्वतंत्र खात्यात जमा करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार आता ही प्रक्रिया सुरू होऊन गुंतवणूकदारांना पैसे परत केले जातील. कदाचित सहारा उच्च न्यायालयात जाऊन या प्रक्रियेला स्थगिती देण्याचा प्रयत्न करेलही. गेल्या दोन दशकांत झपाट्याने प्रकाशझोतात आलेला सहारा उद्योगसमूह हा एक मोठा संशोधनाचा विषय ठरावा. तसे पाहता याच काळात इन्फोसिस, विप्रोसारख्या कंपन्याही झपाट्याने विस्तारल्या. त्यांच्या प्रवर्तकांनी आपल्या बौद्धिक सामर्थ्याच्या जोरावर आपला उद्योग वाढवला आणि जगात आपली पत पोहोचवली. परंतु सहाराच्या वाढीबद्दल नेहमीच संशयाचे धुके लोकांसमोर राहिले आहे.
सहारा नेमके कोणते ‘उद्योग’ करून असा भरघोस नफा कमावतात, याचे गौडबंगाल राहिले आहे. कोलकात्यात एका साध्या वित्तीय कंपनीच्या कारभारापासून सुरुवात केलेल्या सहारा समूहाचा वटवृक्ष कसा फोफावला आणि या वटवृक्षाच्या पारंब्यांना कोण कोण लटकत आहेत, याची अनेक गॉसिप कॉर्पोरेट क्षेत्रात चर्चिली जातात. उद्योगधंदा करून प्रामाणिकपणे पैसा कमावण्यात चुकीचे असे काहीच नाही. अशा प्रकारे मोठे झालेले उद्योगपती आपल्याला अनेक सापडतील. त्यांच्या व्यवहारात पारदर्शकता असते. सहाराच्या बाबतीत असे काही आढळत नाही. बरे सहाराने जे ‘उद्योग’ केले त्यात काही घसघशीत नफा मिळतो असेही नाही.
0 Response to "सहाराचे गौडबंगाल ( अग्रलेख )"
टिप्पणी पोस्ट करा