-->
शॉपिंग व्हिलेज! (अग्रलेख )

शॉपिंग व्हिलेज! (अग्रलेख )

दैनंदिन जीवनात लागणा-या जीवनावश्यक वस्तू असोत किंवा चैनीच्या वस्तू असोत, त्यांची खरेदी करणे किंवा उच्चभ्रू लोकांच्या भाषेत ‘शॉपिंग’ करणे प्रत्येकासाठी गरजेचे असते. आपल्याकडे गेल्या दोन दशकांत मध्यमवर्गीय झपाट्याने वाढल्यावर ‘शॉपिंग संस्कृती’ जन्माला आली. त्यातच मोठ्या शहरात भव्यदिव्य मॉल्स उभे राहिल्यावर तेथे जाऊन खरेदी करणे हे एक प्रतिष्ठेचे लक्षण गणले जाऊ लागले. रविवारी किंवा सुटीच्या दिवशी मॉलमध्ये जाऊन ‘विंडो शॉपिंग’ ते प्रत्यक्ष खरेदी (अनेकदा अनावश्यक असलेलीही) करणे आणि शेवटी त्याच मॉलमधील मल्टिप्लेक्समध्ये पिक्चर पाहून दिवस घालवणा-यांची एक नवी मध्यमवर्गीयांची पिढी जन्माला आली आहे. शहरातील या मध्यमवर्गीयांच्या बाजारपेठेचे आकर्षण बहुराष्ट्रीय कंपन्यांपासून देशातील ग्राहकोपयोगी कंपन्यांना निर्माण झाले ते यातूनच.
अमेरिकेतदेखील खर्च करण्याच्या संस्कृतीने अर्थव्यवस्थेला नेहमी चालना मिळत आली आहे. परंतु फरक इतकाच की आपल्याकडील मध्यमवर्गीय बचत करत दुसरीकडे खर्च करत असतो. अमेरिकन नागरिकासारखा कर्जाच्या गर्तेत अडकूनही खर्च करत राहत नाही. आपल्याकडीलही मध्यमवर्गीयांच्या खरेदीच्या बाजारपेठेने अप्रत्यक्षरीत्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. अनेकांचा माल खपत आहे, त्यातून रोजगार निर्मितीला चालनाही मिळाली आहे, ही त्यातील एक समाधानाची बाब. त्यामुळे खरेदीच्या या संस्कृतीचे स्वागत करायला हरकत नाही. मात्र शहरातील धकाधकीच्या जीवनातून दिलासा मिळण्यासाठी हीच पिढी गेल्या पाच वर्षांत हळूहळू ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी वळू लागली. यातून ऑनलाइन शॉपिंगचीही एक मोठी बाजारपेठ विकसित झाली.
प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन खरेदी असो, खरेदी ही  महानगरातूनच मोठ्या प्रमाणावर होते, अशी एक ठाम समजूत सर्वांची झाली होती. या समजुतीला छेद देणारी घटना आता घडली आहे. ही घटना म्हणजे, लहान व मध्यम आकारातील शहरातून गेल्या वर्षात ऑ नलाइन खरेदीचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. देशात एकूण झालेल्या ऑनलाइन खरेदीतील 50 टक्के वाटा हा लहान व मध्यम आकाराच्या शहरांतील आहे. म्हणजे ऑनलाइन खरेदीची मक्तेदारी ही फक्त महानगरापुरतीच मर्यादित राहिलेली नाही, तर निमग्रामीण शहरी भागातही ऑनलाइन खरेदीचे लोण पोहोचले आहे. देशातील ई-कॉमर्सचा व्यवसाय गेल्या वर्षात सुमारे 128 टक्क्यांनी वाढला. यातील आघाडीची 20 शहरे वगळता अन्य शहरातील खरेदीची वृद्धी ही 25 टक्क्यांहून जास्त आहे. तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेत ऑनलाइन खरेदी करणारे ग्राहक 40 टक्के नवीन आहेत. म्हणजे देशात ऑनलाइन खरेदीची पाळेमुळे आता ख-या अर्थाने रुजू लागल्याची चिन्हे दिसत आहेत.
देशात ज्या वेळी दहा वर्षांपूर्वी ऑनलाइन खरेदी सुरू झाली त्या वेळी याला प्रतिसाद काही मिळणार नाही, असा अनेकांचा होरा होता. यामागचे मुख्य कारण म्हणजे, प्रत्यक्ष खरेदी करताना भारतीयांची दरांबाबत घासाघीस करण्याची असलेली मानसिकता. सांगितलेल्या किमतीला खरेदी करण्याची मानसिकता नसल्याने तसेच घासाघीस करूनच खरेदी करण्यात धन्यता पावणारी संस्कृती असल्याने ऑनलाइन खरेदी कधीच रुजणार नाही, असा असलेला अंदाज मात्र आता खोटा ठरत आहे. कारण पुस्तकांपासून किराणा मालाच्या वस्तू ते कपडे, इलेक्टॉनिक्स वस्तू अशा सर्वांचीच ऑनलाइन खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. त्यामुळे भारतीयांची खरेदी करण्याबाबतची मानसिकता आता बदलत चालल्याचे हे द्योतक आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागात अजूनही फार मोठ्या प्रमाणात इंटरनेट (आणि जिकडे इंटरनेट आहे तिकडे विजेची नियमितता नसल्याने) पोहोचले नसतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणावर खरेदी होत असल्याने केवळ शहरीच नव्हे तर निमशहरी भागातही खरेदीची मानसिकता बदलते आहे. गेल्या दोन वर्षांत खरे तर शहरातील एकूण खरेदीच्या तुलनेत ग्रामीण भागाने खरेदीत आघाडी घेतलीच होती. यातून ग्रामीण भागातील लोकांची क्रयशक्ती वाढत चालल्याचे स्पष्टपणे दिसते. एकीकडे काही भागात दुष्काळाची स्थिती असतानाही दुसरीकडे ग्रामीण भागातील हे बदलते चित्र सुखावह ठरावे असेच आहे. आर्थिक उदारीकरणाने गेल्या दोन दशकांत मध्यमवर्गीयांची बाजारपेठ मोठ्या शहरात तयार झाली. त्यातून शहरी भागाचा चेहरामोहरा बदलत गेला. आता ग्रामीण भागात बदलाचे वारे येत आहे. अर्थात, अजूनही आपल्याकडे गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी फार मोठी आहे. ग्रामीण भागात ही दरी प्रकर्षाने जाणवते.
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेसारख्या योजनांनी ग्रामीण भागातील चित्र बदलण्यास मोठा हातभार लावला आहे. आर्थिक उदारीकरणाचे समर्थक या योजनांवर टीका जरूर करोत, परंतु देशातील ग्रामीण गरिबांना या योजनेतून रोजगार उपलब्ध होऊन त्यातून त्यांच्या हातात चार पैसे खुळखुळू लागले आहेत. ही योजना आणखी समर्थपणे राबवल्यास ग्रामीण भागाचे चित्र बदलण्याची ताकद यात आहे, हे आता सिद्ध झाले आहे. इंटरनेटने जगाचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून टाकला आहे. एकीकडे जसा माहितीचा अफाट खजिना एका क्लिकवर उपलब्ध झाला आहे, तसे खरेदीसाठीही दुकानात हिंडत बसण्याची आता गरज उरलेली नाही. पुढील काही काळात तर चित्रपटही थिएटरमध्ये जाऊन पाहण्यापेक्षा घरीच बसून पाहण्याची सोय उपलब्ध होणार आहे. यातून पुढील दशकात करमणुकीच्या जोडीला खरेदीची एकूणच ठोकळेबाज संकल्पना, त्याची मानसिकता बदलत जाणार आहे. जग हे आता एक ‘व्हिलेज’ होण्याच्या मार्गावरील ही पहिली पायरी ठरावी.

0 Response to "शॉपिंग व्हिलेज! (अग्रलेख )"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel