-->
स्पर्धा बाजारांची... (अग्रलेख )

स्पर्धा बाजारांची... (अग्रलेख )

दिव्य मराठी  Feb 12, 2013 Edit
अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या हस्ते शनिवारी देशातील एमसीएक्स-सीएक्स या नवीन शेअर बाजाराचे उद्घाटन झाले. त्याच दिवशी सकाळी दिल्लीत अफझल गुरूला फाशी दिल्याने या महत्त्वपूर्ण बातमीची फारशी दखल कुणी घेतली नाही. मात्र गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांना पोषक अशी ही घटना आहे. सध्या देशात राष्ट्रीय पातळीवर दोन महत्त्वाचे शेअर बाजार असताना आणखी तिस-या  शेअर बाजाराची गरज काय होती, असा प्रश्न सर्वात प्रथम उपस्थित होईल. परंतु भांडवलशाहीत कोणाचीही मक्तेदारीची स्थिती असता कामा नये. प्रत्येक ठिकाणी स्पर्धा पाहिजे. त्यानुसार, देशातील सर्वात जुना असलेला मुंबई शेअर बाजार व सर्वात जास्त समभागांची उलाढाल करणारा राष्ट्रीय शेअर बाजार यांना आणखी एका स्पर्धकाची गरज होती. या स्पर्धेमुळे गुंतवणूकदारांना चांगली सेवा व दलालीचे दर उतरण्यास मोठा हातभार लागणार आहे.
एमसीएक्सच्या प्रवेशामुळे आता लगेच पहिल्या टप्प्यातच शेअर दलालींचे दर उतरण्यास सुरुवात झाली आहे, याचे स्वागत व्हावे. आपल्याकडे समभाग व्यवहारांची सुमारे दोनशे वर्षांची परंपरा आहे. सध्याची मुंबई शेअर बाजाराची इमारत आहे तेथे ब्रिटिश काळात एका झाडाखाली शेअर दलाल अनधिकृतपणे समभागांचे व्यवहार करत. खूप गलका झाल्यावर त्यांना पोलिस पिटाळूनही लावत. पुढे 1830 मध्ये त्यांच्या या व्यवहारांना अधिकृत मान्यता मिळाली आणि देशातील शेअर बाजारांची बीजे रोवली गेली. स्वातंत्र्यानंतर मुंबई शेअर बाजारातील व्यवहारांचे स्वरूप मर्यादित असले तरीही मारवाडी, गुजराती, पारशी समाजातीलच मंडळी प्रामुख्याने होती.
मराठी माणूस मात्र त्यात पिछाडीवर होता. त्या वेळी मुंबई शेअर बाजार ही शेअर दलालांनी स्थापन केलेली संस्था असल्याने दलालांचा यावर वरचश्मा होता. त्यामुळे दलाल मंडळी आपल्याला पाहिजे तसा मनमानी कारभार करत. यामुळे समभागांच्या व्यवहारात  पारदर्शकता नव्हती. श्रीमंत, पैसेवाले आणि दलालांचा मुंबई शेअर बाजार हा एक अड्डा बनला होता. 1991 मध्ये आर्थिक उदारीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आणि पुढच्याच वर्षी राष्ट्रीय शेअर बाजाराची स्थापना झाली. मुंबई शेअर बाजाराला खरे आव्हान यातून उभे राहिले. त्या काळी राष्ट्रीय शेअर बाजारात सर्वात प्रथम संगणकावर सौदे सुरू झाले आणि शेअर व्यवहारातील पारदर्शकता काय असते, याचा अनुभव गुंतवणूकदाराने घेतला. तेव्हापासून गुंतवणूकदारांनी मुंबई शेअर बाजाराकडे पाठ फिरवण्यास सुरुवात केली.
संगणकावर आपल्या समभागांची खरेदी-विक्री करण्याचा अनुभव घेतल्यावर मुंबई शेअर बाजारातील दलालांचे कारभार उघडे पडले. यातून मुंबई शेअर बाजाराला इच्छेविरुद्ध आपल्या कारभारात बदल करावा लागला. म्हणजे त्यांनाही संगणकीकरणाची साथ घ्यावी लागली. यातून समभागांच्या व्यवहारात राष्ट्रीय शेअर बाजारासारखी पारदर्शकता आणावी लागली. अर्थातच हे स्पर्धेमुळे झाले. उदारीकरणाच्या पहिल्या दशकातच शेअर बाजाराकडे नवश्रीमंत, मध्यमवर्गीय वळू लागला होता. एकेकाळी शेअर बाजार हा सट्टा असल्याचे हिणवून तेथे पाठ फिरवणा-या  मध्यमवर्गीयांची पावले समभागांच्या खरेदी-विक्रीकडे वळू लागली. नव्याने होणा-या  समभागांच्या विक्रीत तो सहभागी होऊ लागला.
बँकेत ठेवी ठेवण्याऐवजी म्युच्युअल फंडांच्या योजनेत पैसे गुंतवण्याकडे कल वाढला. सोने थेट खरेदी करण्यापेक्षा ई-गोल्डमध्ये मध्यमवर्गीय गुंतवू लागला. अशा प्रकारे आपल्याकडे समभाग ‘संस्कृती’ रुजण्यास सुरुवात झाली. याला मोठा हातभार उद्योगपती धीरूभाई अंबांनी यांनी लावला. मध्यमवर्गीयांना रिलायन्सचे समभाग खरेदी करण्यास उत्तेजन देऊन त्यांनी बँक ठेवींकडे वळणारा पैसा काही प्रमाणात समभागांकडे वळवला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यातून समभाग संस्कृती रुजली. मराठी माणसांचीही गुंतवणूक करण्याची मानसिकता याच काळात बदलली. गेल्या दशकात समभागांच्या गुंतवणुकीतील तेजी-मंदी अनुभवल्यावर हा गुंतवणूकदार आता पोक्त झाला आहे. अशा स्थितीत आपल्याकडे आता पूर्णत: खासगी कंपनी असलेला एमसीएक्स हा शेअर बाजार सुरू झाला आहे. आर्थिक उदारीकरणाचे युग आपल्याकडे सुरू झाल्यापासून आपण किमान दोन वेळा जागतिक मंदी अनुभवली आहे. व्याजाच्या दरांचे हेलकावे पाहिले आहेत. मुंबई शेअर बाजाराला उलाढालीत राष्ट्रीय शेअर बाजाराने केव्हाच मागे टाकले असले तरी गुंतवणूकदारांना कमी पैशात आंतरराष्ट्रीय दर्जाची सेवा देण्यास हे दोन्ही शेअर बाजार कमी पडले आहेत.
आता मात्र एमसीएक्सच्या प्रवेशाने या तिन्ही शेअर बाजारांत स्पर्धा सुरू होणार आहे. अमेरिकेतदेखील न्यूयॉर्क शेअर बाजार, नॅसडॅक अशा विविध शेअर बाजारात निकोप स्पर्धा सुरू असते. गुंतवणूकदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी त्यांना विविध सवलती, प्रलोभने दिली जातात. आपल्याकडे आता तशा प्रकारचे चित्र दिसू लागेल. त्याहून महत्त्वाचे म्हणजे, आपल्याकडे गेल्या दोन दशकांत रुजलेली मोठी, मध्यम आकारातील शहरातील समभाग संस्कृती आता निमशहरी, ग्रामीण भागात पाळेमुळे पसरू लागली आहे. एमसीएक्सच्या सध्या झालेल्या सभासद सदस्यांची संख्या ग्रामीण भागातून जास्त आहे, ही घटना फार सूचक ठरावी. गेल्या चार महिन्यांत सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. याला जोड म्हणून देशात गुंतवणूक वाढण्यासाठी   प्रयत्न होणे आवश्यक आहे. पायाभूत क्षेत्रातील कंपन्यांचे रोखे, नवीन कंपन्यांची समभाग विक्री, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांची समभाग विक्री याला चालना देण्यासाठी आपल्याकडे सक्षम गुंतवणूकदार जसा आवश्यक आहे, तसेच त्या गुंतवणूकदाराला शेअर बाजाराच्या माध्यमातून समभाग-खरेदी विक्रीचे व्यासपीठही उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यातूनच देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. आता देशात आणखी एका शेअर बाजाराची भर पडल्याने याला निश्चितच चालना मिळेल.

0 Response to "स्पर्धा बाजारांची... (अग्रलेख )"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel