-->
जास्त ताणू नये...

जास्त ताणू नये...

रविवार दि. 9 जुलै 2017 च्या मोहोरसाठी लेख -- 
------------------------------------------------
जास्त ताणू नये...
--------------------------------
एन्ट्रो-आपली स्थिती 1960 सालासारखी नाही ही वस्तुस्थिती मान्य केली तरीही चीन हा खूपच तंत्रज्ञानातच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रात आपल्यापेक्षा कित्येक प्रमाणात पुढे गेला आहे. अशा स्थितीत थंड डोक्याने विचार करुन व भावनेच्या अहारी न जाता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. चीनशी आपले युध्द झाले हे मान्य. त्यानंतर गेल्या काही दशकात आपले संबंध प्रामुख्याने व्यापारी व सांस्कृतिक संबंध हे लक्षणीयरित्या सुधारले आहेत. उभय देशांनी आपला सीमा वाद उकरुन काढण्याचे व जशी आहे तशी स्थिती कायम ठेवण्याचे ठरविले होते. परंतु भाजपाच्या सरकारने याला तडा नेऊन चीनशी संघर्ष उभा केला आहे. हा संघर्ष फार ताणता कामा नये. आता गेल्या काही दिवसात हे संबंध खूपच ताणले गेले आहेत. याला दोन्ही देश जबाबदार आहेत... 
-----------------------------------------
भारत आणि चीनमध्ये सध्या सिक्कीम सीमेवरुन वाद सुरु असून दिवसेंदिवस वातावरण चिघळत चाललं आहे. एका ठराविक मर्यादेपर्यंत ठीक आहे, परंतु भारताने चीनशी संबंध फार ताणता कामा नयेत. कारण जास्त ताणल्यास याचा भारताला फायदा होणार नाही, उलट चीनला धडा शिकविण्याच्या नादात आपण आपले नुकसान करुन बसू अशी स्थिती आहे. आपली स्थिती 1960 सालासारखी नाही ही वस्तुस्थिती मान्य केली तरीही चीन हा खूपच तंत्रज्ञानातच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रात आपल्यापेक्षा कित्येक प्रमाणात पुढे गेला आहे. अशा स्थितीत थंड डोक्याने विचार करुन व भावनेच्या अहारी न जाता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. चीनशी आपले युध्द झाले हे मान्य. त्यानंतर गेल्या काही दशकात आपले संबंध प्रामुख्याने व्यापारी व सांस्कृतिक संबंध हे लक्षणीयरित्या सुधारले आहेत. उभय देशांनी आपला सीमा वाद उकरुन काढण्याचे व जशी आहे तशी स्थिती कायम ठेवण्याचे ठरविले होते. परंतु भाजपाच्या सरकारने याला तडा नेऊन चीनशी संघर्ष उभा केला आहे. हा संघर्ष फार ताणता कामा नये. आता गेल्या काही दिवसात हे संबंध खूपच ताणले गेले आहेत. यात दोन्ही देश जबाबदार आहेत. चीनने जर्मनीतील हॅमबर्ग येथील 20 शिखर परिषदेदरम्यान होणारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील बैठक रद्द केली. ही घटना काही स्वागतार्ह नाही. आशिया खंडात शांतता नांदली पाहिजे, असे आपण म्हणत असलो तरी अशा काही निर्णयामुळे ही शांतता भंग पावण्याची शक्यता जास्तच आहे. द्विपक्षीय चर्चेसाठी सध्या वातावरण योग्य नसल्याचं सांगत चीनने भेटीसाठी नकार दिला आहे. भारत आणि चीनमधील वाद संपवण्यामध्ये ही बैठक महत्वाची ठरेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. परंतु याला सुरुंग लावला गेला आहे. उभय देशात चर्चेची दारे ही खुली असली पाहिजेत. सिक्किम मधील आपले सैनिक  भारताने स्वत:हून मागे घ्यावेत, अन्यथा 1962 पेक्षाही वाईट अवस्था करू, अशी धमकी चीनच्या ग्लोबल टाइम्स या सरकारी वृत्तपत्राने दिली आहे. तर चीनला रोखण्यासाठी भारताबरोबरच अमेरिका व जपान मलबार कवायतीमध्ये सहभागी होणार आहेत. याशिवाय चीनच्या हिंदी महासागरातील सर्व हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी जीसॅट 7 म्हणजेच रुक्मिणी हा उपग्रह सज्ज ठेवण्यात आला आहे. मात्र त्याहून चीनची उपग्रह यंत्रणा मजबूत आहे. भूतान व सिक्किमच्या भागात आम्ही घुसखोरी केली नसून, आमचे सैन्य आमच्याच भागात आहे आणि तिथे रस्तेबांधणीचे काम करण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे, असा दावा करीत चीनने भारतावरच घुसखोरीचा आरोप केला आहे. एवढेच नव्हे, तर ते सैन्य हटवण्यात यावे, अन्यथा भारताची अवस्था 1962 पेक्षा वाईट केली जाईल, अशी इशारेवजा धमकी चीनने दिली आहे. संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी 2017 चा भारत आणि 1962 ची परिस्थिती वेगळी होती, असे केलेले विधान चीनला खूपच झोंबले. त्यातूनच चिनी वृत्तपत्रातून ही धमकी दिल्याचे मानले जात आहे. युद्ध झाल्याश भारतालाच सर्वाधिक नुकसान सोसावं लागेल, असे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे. चीनच्या हिंदी महासागरातील हालचालींमुळे भारत, अमेरिका व जपान यांच्या संयुक्त कवायती मलबार कवायती या नावाने सुरू होत आहेत. चीनच्या विरोधात एकत्रितपणे ताकद दाखवण्याचा हा मार्ग आहे. या त्रिपक्षीय युद्धाभ्यासामध्ये 15 मोठ्या युद्धनौका, दोन पाणबुड्या, अनेक विमाने तसेच टेहळणी करणारी हेलिकॉप्टर्स सहभागी होणार आहेत. यामुळे चीनशी संबंध आणखी बिघडण्यास हातभार लागणार आहे. जपान व अमेरिका या चीनच्या दोघा दुश्मनांना आपण जवळ केल्याने चीनचा थटथयाट होणे आपण समजू शकतो. दक्षिण चिनी समुद्रात चीनची मुजोरी वाढत असून, त्याचा त्रास जपानलाही होत आहे. त्या भागावरही चीन ताबा सांगत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वाहतुकीतही अडथळे येत असल्याने चीनने ते थांबवावेत, असा अमेरिकेचा आग्रह आहे. अमेरिकेच्या गस्ती नौकांनाही चीनचा त्रास होत आहे. जर भूतानला मध्ये ओढाल तर आम्ही सिक्कीमच्या स्वातंत्र्याच्या मागणीला पाठिंबा देऊ अशी धमकी चीनने भारताला दिली आहे. भारत सीमाभागामध्ये आगळिक करत असून त्याची भारी किंमत भारताला मोजावी लागेल अशी दर्पोक्तीही चीनने केली आहे. या पार्श्‍वभूमीवर सिक्कीम सीमेवर भारत चीनमध्ये असलेला वाद चिघळत असल्याचे दिसून येत आहे. सिक्कीममधील जनतेने याआधी 1960 व 1970 मध्ये स्वतंत्र होण्यासाठी आंदोलने केली परंतु ती निर्दयीपणे चिरडण्यात आल्याचा दावाही चीनने केला आहे. भारताने 1975 मध्ये सिक्कीमच्या राजाला पदच्यूत केले आणि सिक्कीमला भारतात जोडले असा दाखला चीनी दैनिकाच्या संपादकीयात देण्यात आला आहे. चीन आता चिडल्यासारखा वागत आहे व त्याला आपण सुरुवात केली आहे. कोणत्याही लहान गोष्टीचा पर्वत होतो व त्यातून अनेक नवीन प्रश्‍न उद्भवतात. चीनच्या संदर्भात असेच होत आहे. आपली पाकिस्तानकडची एक सीमा नेहमीच अशांत असताना चीनकडील दुसरी बाजू तरी शांत असणे ही आपल्या देशाच्या हिताची बाब आहे. परंतु तेथे चीनला डिचवून आपण आणखी चूक करीत आहोत. आपल्या सौर्वभौमत्वाशी कुणी समझोता करण्यास सांगणार नाही. मात्र असलेली शांतता भंग होणार नाही, याकडे आपण पाहाण्याची गरज आहे. आपल्याला विकासावर लक्ष केद्रीत करण्याची आवश्यकता आहे. एखादे युध्द करुन आपल्या शेजारच्या देशाला धडा शिकविण्यापेक्षा त्यातील होणारा खर्च आपण विकासावर खर्च केल्यास आपला देश चीनच्या पुढे जाऊ शकतो. कारण कोणतेही युध्द हे आपल्या भूमीवर लढले जाणार आहे. यात होणारे मन्युबळाचे नुकसान व त्याहून होणारी आर्थिक नुकसानी ही आपल्या देशाला किमान 50 वर्षे मागे लोटेल, याचा विचार व्हावा.
----------------------------------------------------

0 Response to "जास्त ताणू नये..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel