-->
भारताच नवा मित्र

भारताच नवा मित्र

सोमवार दि. 10 जुलै 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
भारताच नवा मित्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इस्त्रायलवारीमुळे आपण जागतिक पातळीवर एक नवीन मित्र जोडला आहे. अशा प्रकारे मोदींनी एक नवीन मित्र जोडून आपल्या विदेश नितीची चमक दाखविली आहे. मोदींची ही इस्त्रायल भेट म्हणजे आजवरच्या आपल्या स्वातंत्र्यानंतरच्या विदेशी धोरणाशी आपण 180 डिग्रीमध्ये घेतलेले एक वळण आहे. अर्थात या भेटीचे चांगले वाईट कोणते परिणाम होतात हे भविष्यात तपासावे लागेल. मात्र सध्यातरी मोदींची ही इस्त्रायल भेट यशस्वी ठरली आहे. आपले इस्त्रायलशी तसे राजकीय संबंध हे होतेच. मात्र आपली सलगी नव्हती. कोणत्याही पंतप्रधानाने त्या देशाला भेट दिली नव्हती. आता मात्र मोदींच्या या भेटीमुळे एक नवे वातावरण निर्माण झाले हे मात्र नक्की. आजवर आपण मुस्लिम देशांशी जी जवळीक साधून होतो त्याची पर्वा आता केंद्राच्या नवीन धोरणामुळे राहिलेली नाही. त्यामुळे इस्त्रायल भेटीचा मार्ग मोकळा झाला होता. इस्त्रायलशी आता आपले नव्याने संबंध स्थापन झाल्याने आता आपले परकीय धोरणही स्पष्ट झाले आहे. इस्त्रायल हा देशा तसा कष्टाळू आहे. जेमतेम दहा इंच पाऊस पडूनही तेथे त्यांनी तंत्रज्ञानाच्या जोरावर जी शेती केली आहे ती वाखाणण्याजोगी आहे. दोन हजार वर्षांचा भटकंतीचा इतिहास असून सुद्धा इतरांबद्दल यत्किंचितही कटुता इस्त्रायली जनतेने आपल्या मनात ठेवली नाही. आपली मातृभूमी नसली तरी ज्यूंनी आपल्या वसाहती जिथे स्थापन केल्या त्या मातीशी ते मिळूनमिसळून राहिले. अनेक क्षेत्रे त्यांनी गाजविली. भारतातही अनेक ठिकाणी मराठी बोलणारे ज्यू आहेत. त्यातील काही जण इस्त्रायलला गेले तर काही जण भारतातच राहिले. आपल्या बुध्दीमत्तेच्या जोरावर अनेक ज्यूंनी आपले नाव जगात कमविले. आपल्या पैशाच्या जोरावर अमेरिकन अर्थव्यवस्थेवर अप्रत्यक्षरित्या ताबा मिळविला. संशोधन क्षेत्रातील अल्बर्ट आईन्स्टाईन आणि थॉमस एलवा एडिसन हे देखील ज्यूच होते. कला क्षेत्रात ज्यूरासिक पार्क बनवणार्‍या स्टीव्हन स्पिलबर्ग हेसुद्धा जन्माने ज्यू होते. ज्यू माणसाची जगाला ओळख ही प्रचंड कष्टाळू, हुशार आणि धनवान अशीच आहे. आपल्या संघर्षमय इतिहासातून ते लोक इतकेच शिकले की अपना हाथ जगन्नाथ ! आपली प्रगती ही केवळ आपणच करायची आहे, हे त्यांनी सुत्र ठरविले आणि आपली प्रगती केली.  भारतात 1931 च्या जनगणनेनुसार तेवीस हजार ज्यू होते तर 1991 च्या जनगणनेनुसार तीन हजार ज्यू शिल्लक आहेत. भारतीयांच्या बद्दल इस्त्राएली लोकांच्या मनात प्रचंड प्रेम जाणवते. कारण दोन हजार वर्षांपूर्वी रोमन लोकांच्या हल्ल्यापासून जीव वाचवण्यासाठी ते लोक जे परागंदा झाले ते जिथे जागा मिळेल तिथे राहिले. काही लोक शिडाच्या बोटीतून भरातभूमीवर उतरले. येतायेता त्यांची वाताहत झाली. वादळ, वार्‍याला तोंड देतदेत ते भारतभूमीजवळ आले खरे पण अलिबागजवळील नौगाव या बंदराजवळ त्यांच्या बोटी फुटल्या आणि अनेकांना तिथेच जलसमाधी मिळाली. आजही त्या समुद्रकिनार्‍यावर त्यांची थडगी आहेत. आणि इस्त्राएल ला जाऊन स्थायिक झाले लोक आवर्जून तिथे जाऊन नतमस्तक होतात. फक्त सात जोडपी त्या प्रलयातून जिवंत राहिली. पुढे त्यातूनच निर्माण झाला महाराष्ट्रीयन इस्त्राईल समाज ! त्यांना बेने इस्त्राएल समाज म्हणतात. काही लोक कोचीन बंदरात पोहोचले त्यांना कोचिनी ज्यू म्हणतात. तर जे लोक बगदाद शहरामार्गे भारतात आले त्यांना बगदादी ज्यू म्हणून ओळखले जातात. हजारो वर्षांची सांस्कृतीक, सामाजिक परंपरा असणारा आपला भारत देश आणि दोन हजार वर्षांच्या निर्वासितांची परंपरा असणारा इस्त्राएल देश यांच्यात एक वेगळाच ऋणानुबंध आहे. आता मोदींनी इस्त्रायलसोबत नवीन समिकरणे मांडल्यामुळे उभयतातील व्यापार वाढण्यास मोठी मदत होईल. भारत हा इस्त्रायली शस्त्रास्त्र कंपन्यांचा जगातील सगळ्यात मोठा ग्राहक आहे. इस्त्रायलमधून होणार्‍या शस्त्रास्त्र निर्यातीतील तब्बल 41 टक्के निर्यात ही एकाच देशात म्हणजे भारतात होते. इस्रायल आणि भारत यांच्यातील व्यापारउदीम सध्या 120 कोटी डॉलरच्या घरात आहे. यात हिरे व्यापार गृहीत धरला तर ही उलाढाल 400 कोटी डॉलरवर जाते. आज जे मोदींचे स्वागत जोमात झाले त्यातील अनेक कारणांपैकी हे एक कारण निश्‍चितच आहे. मात्र भारतातून इस्रायलमध्ये होत असलेल्या गुंतवणुकीचा, निर्यातीचा आणि भारतातील इस्रायली गुंतवणुकीचा भाग अगदीच नगण्य आहे. चीनने आतापर्यंत इस्रायलमध्ये तब्बल 1600 कोटी डॉलर इतकी प्रचंड गुंतवणूक केली आहे. आपल्याकडे टी.सी.एस. ही टाटा समूहाची आय.टी. उद्योगातील कंपनी वगळता त्या देशात भारतीय गुंतवणूक अगदीच नगण्य आहे. तसेच इस्रायलकडून भारतातील थेट परकीय गुंतवणुक फार मोठ्या प्रमाणात झालेली नाही. गेल्या वर्षी ही गुंतवणूक जेमतेम 10 कोटी डॉलर इतकी होती. म्हणजे इस्रायलचा आपल्याशी व्यापार मोठा आहे. पण आपल्यात गुंतवणूक नाही. आता उभय देशांचे संबंध वाढण्यास मदत होत असताना भारतात इस्त्रायली गुंतवणूक कशी येईल याकडे लक्ष दिले गेले पाहिजे. इस्रायली गुंतवणूकदार, उद्योगपती हे व्यवहारी असतात व त्यांना तशाच पध्दतीने काम करायला आवडते. पाच वर्षांपूर्वी भारतीय रियल इस्टेट क्षेत्रात अनेक इस्रायली कंपन्यांनी केलेली गुंतवणूक पुढे काढून घेतली. याचे कारण या क्षेत्राचे गेल्या काही वर्षात वाजलेले दिवाळे. अर्थात याला जागतिक कारणे होती. आता मोदींनी जागतिक पटलावर एक नवा देश आपल्या मित्रांच्या यादीत समाविष्ट केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विदेशी धोरणाशी अनुकूल असे हे धोरण आहे. परंतु यातून देशहित साधले जाणार असल्याने त्याचे स्वागतच व्हावे.
---------------------------------------------------------------------------

0 Response to "भारताच नवा मित्र"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel