-->
उतीर्णतेचा विक्रम!

उतीर्णतेचा विक्रम!

संपादकीय पान बुधवार दि. १० जून २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
उतीर्णतेचा विक्रम!
यंदा दहावीचा राज्याचा निकाल ९१.४६ टक्के लागल्याने एक उतीर्णतेचा एक नवा विक्रम झाला आहे. रायगड जिल्ह्याचा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ४.७१ टक्क्यांनी वाढला असून ९३.५० टक्क्यांवर पोहोचला आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही सर्वच बोर्डांमध्ये मुलींनी आघाडी घेतली आहे. रायगड जिल्ह्यात ९४.५६ टक्के मुली पास झाल्या आहेत. जिल्ह्यात पहिली आलेली देखील मुलगीच आहे. त्यामुळे मुलींचे हे यश यंदाही लक्षणीयच म्हटले पाहिजे. केवळ रायगड जिल्ह्यातच नव्हे तर प्रत्येक जिल्ह्यात मुली आघाडीवर असल्याचे चित्र आहे. यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा व त्यापूर्वी बारावीचा निकाल लागल्याबद्दल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे अभिनंदन केले पाहिजे. तसेच त्यांनी नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एका महिन्यात परीक्षा घेऊन लगेचच निकाल जाहीर करण्याची महत्वाची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेचे स्वागत व्हावे. त्यांच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे एक शैक्षणिक वर्ष वाचणार आहे. त्याहून सर्वात महत्वाचे म्हणजे नापास झाल्यावर मुलांना आपले आता सर्व काही संपले व आपले भविष्य अंधारात असल्याची भावना निर्माण होते. यातूनच अनेकांची आत्महत्या झाल्याच्या घटना दुदैवाने पहावयास मिळतात. या निर्णयामुळे नापास झालेल्या विद्यार्थ्यांना कमी वेळात एत पुन्हा यशस्वी होण्याची संधी चालून येणार आहे. अनेकदा काही ना काही अडचणींमुळे मुलांना परिक्षेला बसणे शक्य होत नाही, त्यांचेही वर्ष वाया जाणार नाही. शिक्षणमंत्र्यांच्या हा निर्णय म्हणजे मुलांच्या दृष्टीकोनातून अत्यंत स्वागतार्ह ठरावा. गेल्या काही वर्षात दहावी व बारावीच्या शिक्षणात झपाट्याने बदल झाले. प्रामुख्याने आय.सी.एस.ई.चा पॅटर्न आल्यावर एस.एस.सी.कडे शहरी पालकांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलला. त्यामुळे या स्पर्धेत टिकाव धरण्यासाठी एस.एस.सी.ला देखील आपला निकालाचा पॅटर्न बदलावा लागला. त्यातूनच बेस्ट ऑफ फाईव्हचा जन्म झाला. बेस्ट ऑफ फाईव्हमुळे गुणांची कशी बरसात होते, याचे उत्तम उदाहरण म्हणून यंदाच्या दहावीच्या निकालाकडे पाहता येईल. पूर्वीचे सगळे निकाल यंदा मोडीत निघाले.राज्यातील हजारो शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. २००७ पासून बेस्ट ऑफ फाईव्हचे सूत्र लागू झाले तशी निकालाच्या टक्केवारीत वाढ होत गेली. सहापैकी पाच विषय असे की ज्यांना सर्वाधिक गुण आहेत, अशांचा विचार अंतिम टक्केवारी काढताना होतो. ज्या विषयाला कमी गुण आहेत त्याचा विचारही सूत्रात केला जात नाही. वीस गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा शाळांच्या हाती आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला वीसपैकी किमान अठरा गुण दिले जातात. उर्वरित सतरा गुण लेखी परीक्षेत पडले की उत्तीर्ण होण्याचा मार्ग मोकळा होतो. ज्याची सत्तर टक्के गुणांची क्षमता असते असे विद्यार्थी ८५ ते ९० टक्क्यांच्या घरात जातात. ज्यांची ८० टक्क्यांची क्षमता आहे. ते नव्वद टक्क्यांवर पोहोचतात. कागदोपत्री टक्केवारी वाढल्याने पालकांचा कल साहजिकच विज्ञान शाखेकडे जातो. येथे एकेका गुणांसाठी इतकी चुरस होते की सगळे विद्यार्थी विज्ञान शाखेकडे वळतात. कॉमर्स व आर्टस या शाखेत जाणे म्हणजे यात काहीच करिअर नाही अशी एक समजूत करुन घेण्यात आली आहे. त्यामुळे प्रवेशाचा प्रश्‍न गंभीर होतो. दुसरी पसंती वाणिज्य शाखेला असली तर विज्ञानला प्रवेश न मिळाला तरच इकडे विद्यार्थी वळतात. कला शाखेला नेहमीची पन्नास टकक्यांपर्यतचे विद्यार्थी जातात. त्यातच दहावी एस.एस.सी.चे निकाल जुन्याच पध्तीने लावले जात असल्याने हे विद्यार्थी गुण मिळविण्यात मागे पडू लागले होते. शेवटी सीबीएसई, आयसीएसई अशा केंद्रीय बोर्डाच्या तुलनेत राज्य मंडळाचे विद्यार्थी मागे पडू नयेत यासाठी बेस्ट ऑफ फाईव्हचे सूत्र लागू झाले. एकवेळ अनुत्तीर्ण होणे अवघड पण उत्तीर्ण होणे किती सोपे हेच अलीकडच्या काही वर्षातील निकालाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. कोल्हापूर विभागातील २१५४ शाळांपैकी ७२२ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. १०८४ शाळांचा निकाल ९९ टक्के लागला. ८० ते ९० टक्के दरम्यान ३५४, ७० ते ८० पर्यत ६३ ६० ते ७० पर्यंत १४, ५० ते ६० टक्क्यांपर्यंत ११ शाळा आहेत. १०८४ शाळा अशा आहेत की ज्यांचा निकाल ९० ते ९९ टक्क्यांच्या घरात आहे. शून्य टक्के निकालात एकाही शाळेचा समावेश नाही. राज्यातील ४ हजार ७३१ शाळांचा निकाल शंभर टक्के आहे. गुण नुसतेच बेस्ट ऑफ फाईव्हमुळे असे नाही विद्यार्थ्यांची मेहनत त्यामागे असली तरी कुणीच अनुर्त्तीर्ण होऊ नये, असे मंडळाचे धोरण असल्याने टक्केवारीत दरवर्षी वाढ होत गेली. पुढील वर्षी बेस्ट ऑफ फाईव्हचे सूत्र कायम असले तरी यापुढे लेखी परीक्षेला ८० पैकी किमान सोळा गुण मिळविणे बंधनकारक असणार आहे. ७० गुणांचा पेपर असेल तर १४ आणि ८० गुणांचा असेल तर १६ गुण आवश्यक आहेत. पुढील वर्षापासून दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षांना नवा नियम लागू होत आहे. यामुळे तरी निकालाची टक्केवारी काही प्रमाणात खाली यावी, असा मंडळाचा उद्देश आहे. निकालाचे हे प्रमाण पहाता या मुलांना महाविद्यालयात प्रवेश मिळणे जिकरीचे होणार आहे. तसेच शिक्षण घेतलेल्या या हातांना नोकर्‍या वा रोजगार देण्याचे आव्हान सरकारपुढे उभे राहाणार आहे. उतीर्णतेचा हा विक्रम स्वागतार्ह असला तरीही भविष्यात अनेक आव्हाने उभी राहाणार आहेत. त्याची तयारी सरकारने आत्तापासून तयारी करण्याची गरज आहे. अन्यथा विद्यार्थी पास झाले तरी सरकार मात्र नापास होईल.
-----------------------------------------------------

0 Response to "उतीर्णतेचा विक्रम!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel