-->
एकाधीकारशाहीच्या दिशेने

एकाधीकारशाहीच्या दिशेने

संपादकीय पान गुरुवार दि. ११ जून २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
एकाधीकारशाहीच्या दिशेने
केंद्रातील भाजपा सरकारने दिल्लीतील आपच्या सरकारविरोधात दंड थोपटले आहेत. अर्थात गेल्या तीस वर्षात स्पष्ट बहुमत मिळाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गर्व आणखीनच शिगेला पोहोचला. मात्र दिल्ली विधानसभा निवडणुकीत साम-दाम-दंड-भेद अशा सर्व मार्गांचा अवलंब करुनही भाजपाला दिल्लीत पराभव घिळावा लागला. त्यांचा हा पराभव एवढा दारुण होता की, त्यांनी ७० जागांमध्ये केवळ तीन जागा मिळल्या. या सर्व पार्श्‍वभूमीवर लोकांच्या पाठिंब्यावर निवडून आललेल्या आमच्या सरकारला खिळखिळे करण्याचे काम नरेंद्र मोदी व भाजपाने सुरु केले आहे. दिल्ली आणि केंद्र सरकार यांच्यातील लढाईला मंगळवारी नवे वळण मिळाले. दिल्ली पोलिसांनी बनावट गुणपत्रिका प्रकरणात दिल्लीचे कायदामंत्री जितेंद्रसिंह तोमर यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. कोठडीत रवानगी झाल्यानंतर तोमर यांनी राजीनामा दिला. तोमर पहिल्यांदाच मंत्री झाले आहेत. दिल्ली बार कौन्सिलने त्यांच्या विरोधात ११ मे रोजी तक्रार केली होती. तोमर यांनी अवध विद्यापीठातून बी. एस्ससी केले आणि बिहारमधील मुंगेर इन्स्टिट्यूट ऑफ लीगल स्टडीजमधून एलएलबीची बनावट पदवी मिळवली आहे, असे तक्रारीत म्हटले होते. पोलिसांनी प्राथमिक चौकशीसाठी दोन पथके संबंधित संस्थांमध्ये पाठवली होती. आरोप खरे आहेत, असे आढळल्यानंतर सोमवारी, ८ जूनला हौज खास पोलिस ठाण्यात फसवणूक आणि इतर कलमांन्वये गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी एखाद्या माफियाप्रमाणे तोमर यांना अटक केली. ते पळून जात होते का? त्यांनी बॉम्बस्फोट केला होता का? अशी कोणती आणीबाणी होती? दिल्ली पोलिसांनी संध्याकाळी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, तक्रार ११ मे रोजी आली होती. आठ जूनला गुन्हा दाखल झाला. कोणत्याही प्रकरणाच्या चौकशीसाठी एवढा वेळ पुरेसा आहे. त्यामुळे घाई केली असे म्हणणे चूकच आहे. पोलीस तोमर यांच्याशी एखाद्या माफियासारखे वागले. तोमर यांना ठाण्यात आणण्याआधी अटकेचे कारण न सांगता जबरदस्तीने त्यांना कारमध्ये बसविले आणि त्यांचे वाहनही जप्त केले. दरम्यान, केंद्र सरकार दिल्लीत आणीबाणीसारखी परिस्थिती तयार करत आहे, असा आरोप आपने केला आहे. या आरोपात काही प्रमाणात तथ्य आहे. दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष रामनिवास गोयल यांच्या सांगण्यानुसार, अटकेबाबत योग्य प्रक्रियेचे पालन झाले नाही. मला अटकेची माहितीच देण्यात आली नाही. मात्र, दिल्लीचे पोलिस आयुक्त बी. एस. बस्सी म्हणाले, मंत्र्याला अटक करताना काही प्रक्रियांचे पालन आवश्यक असते. या प्रकरणात ते पालन झाले आहे.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांच्या आरोपानुसार, आप सरकारने घोटाळ्यांची फाइल पुन्हा उघडल्यामुळे मोदींच्या सांगण्यावरून गृह मंत्रालयाने हा कट रचला. पण भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला आम्ही सोडणार नाही. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी देखील गृहमंत्रालय असे काम करत नाही. कायदा आपले काम करेल. परंतु या सर्वांचे हे दावे फसवे आहेत. तोमर यांची अटक ही राजकीय उद्देशाने प्रेरित आहे हे नक्की. तोमर यांनी केलेला गुन्हा जर सिध्द झाला तर त्यांना शिक्षा ही होणारच आहे, याबाबत काही आक्षेप घेण्याचे कारण नाही. तोमर यांनी जर खोटी पदवी घेतली असली तर तो गुन्हा आहे, मग हाच नियम सर्वांना भाजपा लावणार आहे का, असा सवाल आहे. कारण श्रृती इराणी या केंद्रीय मनुष्यबळ मंत्र्यांवर तसेच राज्यातील पाणी स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्यावरही बोगस पदवी सादर केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. मग या मंत्र्यांना सरकार का अटक करीत नाही असा प्रश्‍न पडतो. याचा अर्थ आपच्या मंत्र्यांना एक नियम व भाजपाच्या मंत्र्यांना दुसरा कायदा असाच त्याचा अर्थ आहे. खरे तर सर्वांनाच एक कायदा असेल तर इराणी व लोणीकर या दोघांनाही अटक व्हायला पाहिजे होती. त्यामुळे भाजपा आपवर आपल्या दिल्लीतील पराभवाचे उट्टे काढीत आहे आणि त्यासाठीच काही ना काही करुन आपला हैराण करण्याचा मार्ग अवलंबित आहे. सत्तेत आल्यापासून आपने पाणी, वीज यासंबंधी निवडणूकपूर्व दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता करण्यास सुरुवात केली आहे. तर दुसर्‍या बाजूला नरेंद्र मोदी यांनी जी आश्‍वासने दिली होती त्याची पूर्तता होण्यासाठी कोणतीही पावले पडत नाहीत असे दिसते. त्यामुळे भाजपाचे नेते व स्वत: नरेंद्र मोदी हे हैराण झाले आहेत. दिवसेंदिवस केंद्रातील सरकारची लोकप्रियता ढासळत चालली आहे. नरेंद्र मोदी हे स्वत:च्या स्तुतीत ऐवढे मग्न आहेत की त्यांना त्यापुढे काहीच दिसत नाही. म्हणूनच त्यांनी विदेशात जाऊनही देशाचे आपण पंतप्रधान आहोत हे विसरुन यापूर्वीच्या सरकारवर टीका केली. याचा परिणाम असा झाला की परदेशातही त्यांचठी प्रतिमा मलिन झाली. पंतप्रधानांनी विदेशात किंवा देशातही काही संकेत पाळावयाचे असतात, त्याची आठवण मोदींना राहत नाही हे दुदैव आहे. त्यामुळे विरोधकांना चिरडण्याचे काम त्यांनी आता सुरु केले आहे. आणीबाणीचही इंदिरा गांधींनी हेच केले होते. आपल्या विरोधकांना कसलेही किरकोळ आरोप ठेवून त्यांनी जेलमध्ये टाकले होते. आता नरेंद्र मोदींची पावेल त्याचदृष्टीने पडत आहेत. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश आता एकाधिकारशाहीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तोमार यांची अटक हे त्याचे ताजे उदाहरण ठरावे.
-------------------------------------------------  

0 Response to "एकाधीकारशाहीच्या दिशेने"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel