-->
आरोग्याची एैशी तैशी...

आरोग्याची एैशी तैशी...

शुक्रवार दि. 14 जुलै 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
आरोग्याची एैशी तैशी...
पहिला पाऊस पडल्यावर रोगराईचा मोसम सुरु होतो. डोळे येण्यापासून ते ताप, सर्दी, खोकल्यापर्यंत विविध रोगांची एक मालिकाच सुरु होते. सरकारी दवाखाने, रुग्णालये हाऊसफुल्ल होतात. ज्यांना खासगी डॉक्टरांची फी परवडते ते रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल होतात. यंदा तर मुंबईसारख्या महानगरापासून ते ग्रामीण भागांपर्यंत रोगराई फैलावली आहे. स्वाईन फ्लूने अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. यात मरण पावलेल्यांचा निश्‍चित आकडा काही प्रसिद्द झालेला नाही, मात्र हा आकडा शेकड्यात आहे. गेल्या काही वर्षात स्वाईन फ्लू व चिकनगुन्या या रोगांनी थैमान घातले आहे. मात्र प्रशासनाला त्याला अटकाव करण्यास काही यश आलेले नाही. त्याचबरोबर सध्याच्या दिवसात साधा ताप येण्याचे प्रकार वाढले आहेत. त्याच्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारकडून फारसे प्रयत्न केले जात नाहीत. केवळ आलेल्या रोग्यांना औषध देऊन बरे करणे हा उपाय नव्हे. त्यावर कायमस्वरुपी उपाययोजना करणे जरुरीचे आहे. क्षयरोग हा आपल्या देशातून हद्दपार झाल्याचे चित्र निर्माण करण्यात आले मात्र त्यात काहीच तथ्य् नाही. कारण वस्तुस्थिती काही वेगळी आहे. राज्य सरकारकडून क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी विविध उपक्रम राबविले जात असतानाही मुंबईतील क्षयरुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. क्षयरोग हा केवळ गरीबांपुरता मर्यादीद राहिलेला नाही तर सधन वर्गातही आढळत आहे, हा एक चिंतेचा विषय ठरावा. त्यमुळे केवळ सकस अन्न न खाल्यामुळे हा रोग होतो असे नव्हे तर त्याचा प्रसार झपाट्याने होत असल्यामुळे गरीब-श्रीमंत असा भेदभाव यात राहिलेला नाही. गेल्या वर्षी असलेली 41 हजार 172 क्षयरुग्णांची संख्या एप्रिल 2016 ते मार्च 2017 या काळात 50 हजारांपर्यंत पोहोचली आहे. 2012-13 पासून क्षयरुग्णांची संख्या कमी होत होती, मात्र यावर्षी ही सुमारे साडेआठ हजारांनी वाढली आहे. सामाजिक संस्था प्रजा फाऊंडेशनने केलेल्या एका पाहणीत हे धक्कादायक निकाल हाती आले आहेत. मुंबईत सध्या दरदिवसाला सरासरी 18 रुग्णांचा क्षयरोगाने मृत्यू झाल्याची नोंद होत आहे. क्षयरोग हा हवेतून पसरणारा आजार आहे. त्यामुळे राज्य सरकार क्षयरोगावर नियंत्रण आणण्यासाठी मोठया प्रमाणात जनजागृती मोहीम राबवीत आहे. क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी राज्य सरकारकडून राबविल्या जाणार्‍या वैद्यकीय उपचार (डॉट) घेणार्‍या रुग्णसंख्येत निम्मी घट झाली आहे. 2012 मध्ये 30 हजार 828 रुग्णांनी क्षयरोग निर्मूलनासाठी नोंदणी केली होती. मात्र ही संख्या 2016 मध्ये 15 हजार 767 इतकी कमी झाली आहे. उपचारांचे प्रमाण कमी होत असल्याने क्षयरोगामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षी 5 हजार 400 रुग्णांचा मृत्यू झाला असून यावर्षी ही संख्या 6 हजार 472 पर्यंत पोहोचली आहे. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत यावर्षी 1 हजार 951 लाखांच्या अर्थसंकल्पाची तरतूद करण्यात आली आहे. यातील 76 टक्के निधीचा वापर विविध कारणांसाठी करण्यात आला आहे. असे असले तरी क्षयरोगाचा फैलाव काही कमी होत नाही. त्यासाठी वापरण्यात य्ेणार्‍या औषधांचाही डोस बदलण्यात आला आहे. क्षयरोग आपल्याकडे अजूनही नियंत्रणात आलेला नाही, हे लक्षात घेता त्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. देशातील प्रमुख शहरात डेंग्यूचेही संकट आले आहे. अर्थात दरवर्षी याच काळात डेंग्यू फैलावतो. सध्याच्या वातावरणात पावसाळ्यानंतर डेंग्यूंच्या रोगाची लागण वाढते. यात दरवर्षी डेंग्यूमुळे शेकडो रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. 2015-16 या वर्षी मुंबईत 15 हजार 244 रुग्णांना डेंग्यूची लागण झाली होती, यामध्ये वाढ होऊन यावर्षी ही संख्या 17 हजार 771 पर्यंत पोहोचली आहे. तर मृत्यू झालेल्यांची संख्या अनुक्रमे 147 व 148 पर्यंत पोहोचली आहे. मुंबईसारख्या महानगरात यावर्षी आरोग्यासाठी केवळ 3317 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर झाला, मात्र योजनांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे आजार बळावत आहेे. डेंग्यू, स्वाईन फ्लू व चिकनगुन्या या रोगांवर ताबा मिळविण्यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना हाती घेण्याची आवश्यकता आहे. मात्र सरकारचे काम प्रभावीपणे होत नाही असेच खेदाने म्हणावेसे वाटते. आरोग्य व शिक्षण या दोन मूलभूत बाबींकडे आपण दुर्लक्ष केले आहे. कोणत्याही पक्षाचे सरकार असो या दोन्ही महत्वाच्या बाबी सरकारने खासगी लोकांच्या ताब्यात दिल्याने याचा पूर्णपणे बट्याबोळ झाला आहे. शिक्षणाने शिक्षणसम्राट निर्माण केले तर सरकारनेच सरकारी रुग्णसेवा कमकुवत करुन खासगी डॉक्टरांच्या हवाली ही सेवा अप्रत्यक्षरित्या दिली. यामुळे आरोग्यसेवा ही महाग झाली. त्याचबरोबर आपल्याकडे आरोग्य विमा असलेल्यांची संख्या देशाच्या लोकसंख्येच्या दहा टक्केही नाही. अशा स्थितीत महागडी आरोग्य सेवा ही फक्त मध्यमवर्गीय व उच्चमध्यमवर्गीयांनाच परवडते. तर दुसरीकडे सरकार आपल्या अर्थसंकल्पाच्या जेमतेम चार टक्के सर्रम आरोग्यसेवेवर खर्च करते. त्यामुळे सरकारी आरोग्य सेवेवर अनेक मर्यादा येतात. काही ठिकाणी सुसज्ज रुग्णालयाची इमारत आहे तिकडे डॉक्टर नाहीत. तर जिकडे डॉक्टर आहेत तिकडे रुग्णालयात सुविधा नाहीत. अनेकदा औषधेच रुग्णांना उपलब्ध होत नाहीत. नेमक्या विविवध रोगांच्या साथी आल्या की सरकारी रुग्णालयातून औषधे गायब होतात. यात रुग्णाचे हाल होतात. एखाद्या रोगातून बरे होण्यासाठी त्याच्या डोक्यावर कर्जाचा बोजा निर्माण होती अशी स्थिती आहे. आरोग्य सेवेच्या दुर्दशेचा हा फेरा प्रदीर्घ काळ सुरुच आहे. यातून आम जनतेला कधी दिलासा मिळणार हाच सवाल आहे.
-----------------------------------------------------------------

0 Response to "आरोग्याची एैशी तैशी..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel