-->
कारागृह की छळछावणी?

कारागृह की छळछावणी?

रविवार दि. 2 जुलै 2017 च्या मोहोरसाठी लेख -- 
------------------------------------------------
कारागृह की छळछावणी?
------------------------------------------
एन्ट्रो- आमदार अनिल गोटे हे तेलगी प्रकरणी चार वर्षे कारागृहात होते, त्यांनी अनेकदा कारागृहात काय धंदे चालतात हे उघडपणे सांगितले आहे. मात्र त्यावर कधीच कुणावर कारवाई झाली नाही किंवा कारगृहातील कारभार सुधारण्यासाठी विचार झाला नाही. प्रश्‍न आहे तो मानसिकतेचा. गुन्हेगार हा जन्मजात नसतो. समाजातील घटनांमुळे किंवा त्याच्यावर घडलेल्या संस्कारातून तसेच त्याला मिळालेल्या वाईट वागणुकीतून गुन्हेगार घडतो. अनेकदा त्याच्या हातून नकळत गुन्हा होतो. अशा वेळी अनेकदा त्याला केलेल्या गुन्ह्यांचा पश्ताप होते व त्यातून तो बाहेर येण्याचा प्रयत्नही करीत असतो. मात्र शिक्षा भोगीत असताना कारागृहातील अधिकारी वा नंतर बाहेर आल्यावर समाज त्याला गुन्हेगार म्हणूनच पाहतो. त्याच्यावर तोच शिक्का बसतो तो कायमचाच. यातून वाल्याचा वाल्मिकी होण्याची प्रक्रियाच थांबते. नुकतीच घडलेली भायखाळा कारगृहातील ही घटना असेच काही आपल्याला सांगून जाते...
-----------------------------------------
भायखळा कारागृहात शुक्रवारी कैदी महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर इतर कैद्यांनी शनिवारी तोडफोड करीत तब्बल पाच ते सहा तास गोंधळ घातला. यात काही पोलीस जखमी झाले. त्यामुळे कारागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हत्येच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगणारी मंजुळा गोविंद शेट्ट्ये (32) ही शुक्रवारी रात्री बराकीमध्ये चक्कर येऊन कोसळली. तिला तत्काळ जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. जेलरने मारहाण केल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप अन्य महिला कैद्यांनी केला आहे. त्यानिषेधार्थ संतप्त महिला कैद्यांनी कारागृहातच धरणे आंदोलन केले. दोषी जेलरवर कारवाईची मागणी करत, त्यांनी कारागृहातील टेबल, खुर्चीची तोडफोड केली, तसेच तेथील कर्मचार्‍यांवर भांडी फेकून मारल्याने प्रकरण चिघळले. त्यानंतर, 25 ते 30 महिला कैद्यांनी कारागृहाच्या छतावर चढून कपडे जाळून निषेध व्यक्त केला. यामध्ये पाच ते सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले. प्रशासनाने या महिलेच्या मारहाणीची चौकशी करून कारवाईचे आश्‍वासन दिल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. मंजुळा हिच्या मृत्यूची अपमृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके कारण समजलेले नाही. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती कारागृह प्रशासनाने दिली आहे. कामात निष्काळजी दाखविल्याप्रकरणी एका अधिकार्‍यासह पाच सुरक्षारक्षकांना निलंबित करण्यात आले आहे.मंजुळा शेट्ट्ये हिच्या शरीरावर मोठ्या प्रमाणावर जखमा आढळून आल्या असून, यामध्ये पाठीसह डोक्यावरील जखमांचा समावेश आहे. जखमांमुळे तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष असून, तिच्या शरीरातील नमुने वैद्यकीय तपासासाठी पाठविण्यात आले आहेत. शीना बोरा हत्याकांडातील आरोपी इंद्राणी मुखर्जीने मंजुळावर लैंगीक अत्याचार झाले आहेत व त्याची वाच्यता केल्यास माझ्यावरही तसेच अत्याचार करण्याची धमकी दिल्याचे धक्कदायक विधान केले आहे. यामुळे या कारागृहातील अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. भायखळा कारागृहात जवळपास दोनशे ते अडीचशे महिला कैदी आहेत. याच कैद्यांमध्ये इंद्राणी मुखर्जीही कैद आहे. भांडुपमधील रहिवासी असलेली मंजुळा ही भांडुपच्या एका शाळेत शिक्षिका होती. 1996 मध्ये तिने आई गोदावरीच्या मदतीने तिच्या भावजयीची जाळून हत्या केली. या गुन्ह्यात दोघींनाही दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. दोघींचीही रवानगी पुण्याच्या येरवडा कारागृहात करण्यात आली होती. सहा महिन्यांपूर्वी तिच्या आईचा आजारपणामुळे कारागृहातच मृत्यू झाला. त्यामुळे तिने तेथे करमत नसून भायखळा कारागृहात बदली करून देण्याची मागणी केली. गेल्या पाच महिन्यांपासून ती भायखळा कारागृहात होती. अखेर तिचा येथे दुदैवी मृत्यू झाला. महत्वाचे म्हणजे ती साधी कैदी नव्हती तर ती मेट्रेन म्हणजे कैद्यांवर नजर ठेवणारी होती. या मृत्यूच्या निमित्ताने आपल्याकडील कारागृहांची दैनावस्था जनतेपुढे आली आहे. आपल्याकडील कारागृहे हा एक मोठा संशोधनाचा विषय ठरेल. खरे तर येथे रवानगी करुन कैदी सुधारतील व त्यांना नव्याने आयुष्य जगण्याची एक संधी प्राप्त होईल अशी अपेक्षा असते. मात्र आपल्याकडील कारगृहे पाहता येथे आलेला कैदी हा सुधारणे तर दूरच परंतु तो आणखी अट्टल गुन्हेगार होण्यास मदत होत असते. यासंबंधी कारागृहातील अधिकार्‍यांपासून कैद्यांकडे पाहाण्याचा दृष्टीकोन नकारात्मक असतो. आलेला प्रत्येक कैदी हा सुधारण्यासाठी आलेला नाही तर त्याच्यावर एकदा का गुन्हेगारीचा शिक्का लागला की, त्याच्याकडे त्याच नजरेने हे अधिकारी पाहातात. त्यामुळे आपल्या अधिकाराचा वापर करुन अनेकदा मारहाण करणे ही बाब तर नित्याची झालेली असते. आता या भायखाळ्यातील महिलांनी ही बाब उघडपणे बोलून दाखविलेली आहे. अनेकदा या महिला कैद्यांचे लैगिक शोषणही होत असते. अनेक महिला कैदी ते सहन करतात तर कधी कुणी नकार दिल्यास त्यांना मारहाण होते. या अनेक बाबी कारागृहात सर्रासपणे घडत असतात व अनेकदा या गृहीतही धरल्या जातात. अनेक कुप्रसिध्द गुन्हेगार कारागृहात एैषोअरामात जीवन जगत असतात, असे बोलले जाते. अनेकांना त्यांच्या तंबाखूपासून ते मद्यापर्यंत व अगदी बायकांचाही पुरवठा केला जातो, ही बाब काही लपून राहिलेली नाही. अलिकडेच नाशिकमधील जेलमध्ये कशा प्रकारे मोबाईल पुरविले जातात याचा पोलखोल उघड झाला होता. कारगृहात मोबाईल जॅमर असूनही अनेक गुंड आपल्या मोबाईलचा वापर करुन आपले बेकायदेशीर धंदे तेथून चालवितात हे काही लपून राहिलेले नाही. जागतिक पातळीवरील कुख्यात गुंड अबू सालेमला चौकशीच्या निमित्ताने बाहेर काढले जाते आणि त्यात रेल्वे प्रवासात त्याचे लग्न होते ही एखाद्या चित्रपटात शोभणारी कथा वाटते, मात्र हे घडले होते. तसेच अबू सालेम ज्या प्रकारचे कपडे वापरतो ते पाहता त्याची जेलमध्ये कोणत्या प्रकारची एैश चालू असेल त्याच अंदाज येतो. अर्थात हे जेलरपासून ते खालच्या हवालदारापर्यंत यात मलिदा खाऊन सामिल असल्याशिवाय हे सर्व खपवून घेतले जाणार नाही हे स्पष्टच आहे. आमदार अनिल गोटे हे तेलगी प्रकरणी चार वर्षे कारागृहात होते, त्यांनी अनेकदा कारागृहात काय धंदे चालतात हे उघडपणे सांगितले आहे. मात्र त्यावर कधीच कुणावर कारवाई झाली नाही किंवा कारगृहातील कारभार सुधारण्यासाठी विचार झाला नाही. प्रश्‍न आहे तो मानसिकतेचा. गुन्हेगार हा जन्मजात नसतो. समाजातील घटनांमुळे किंवा त्याच्यावर घडलेल्या संस्कारातून तसेच त्याला मिळालेल्या वाईट वागणुकीतून गुन्हेगार घडतो. अनेकदा त्याच्या हातून नकळत गुन्हा होतो. अशा वेळी अनेकदा त्याला केलेल्या गुन्ह्यांचा पश्ताप होते व त्यातून तो बाहेर येण्याचा प्रयत्नही करीत असतो. मात्र शिक्षा भोगीत असताना कारागृहातील अधिकारी वा नंतर बाहेर आल्यावर समाज त्याला गुन्हेगार म्हणूनच पाहतो. त्याच्यावर तोच शिक्का बसतो तो कायमचाच. यातून वाल्याचा वाल्मिकी होण्याची प्रक्रियाच थांबते. नुकतीच घडलेली भायखाळा कारगृहातील ही घटना असेच काही आपल्याला सांगून जाते.
-------------------------------------------------------------

0 Response to "कारागृह की छळछावणी?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel