-->
नाथाभाऊ संकटात

नाथाभाऊ संकटात

संपादकीय पान बुधवार दि. २५ मे २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
नाथाभाऊ संकटात
राज्याचे महसूलमंत्री एकनाथ उर्फ नाथाभाऊ खडसे हे त्यांच्यावरील नवीन आरोपामुळे संकटात आले आहेत. भोसरी गाव येथील एक लाख ३० हजार चौरस फूटाइतकी एम.आय.डी.सी.ची जमीन खडसे यांच्या पत्नी व जावई गिरीष चौधरी यांच्या नावे परस्पर मालकांकडून करण्यात आली. एम.आय.डी.सी.ने संपादीत केलेली व त्यांच्याच ताब्यात असलेली ही जमीन मूळ मालक विकू शकत नाही. अशा वेळी नाथाभाऊंना ही जमीन कशी विकली गेली, असा प्रश्‍न उद्दभवतो. याचा अर्थच स्पष्ट आहे की, सरकारी अधिकाराचा गैरवापर करुन ही जमीन खरेदी केली गेली आहे. महत्वाचा मुद्दा म्हणजे, सुमारे ४० कोटी रुपयांचा बाजारभाव असलेली ही जागा केवळ ३ कोटी ७५ लाख रुपयांना विकत घेण्यात आली. २८ एप्रिलला हे खरेदीखत करण्यात आले. थोडक्यात सांगावयाचे झाल्यास एम.आय.डी.सी.ची जमीन त्यांच्या ताब्यात आलेली होती. म्हणजे सरकारी उपक्रमाची ही जमीन खडसेंनी लाटली आहे. या जमीनीचे मूळ मालक हे कोलकात्याला रहाणारे आहेत व त्यांनी ही जमीन आपल्याला परत मिळावी यासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. अशा प्रकारे हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना जमीनीचा सौदा झालाच कसा व सात बार्‍यात त्याच्या बदलाची नोंद झालीच कशी? याचा अर्थ खडसेंनी आपल्या अधिकारचा वापर करुन हे सर्व करवून घेतले हे स्पष्टच आहे. गेले काही महिने खडसे हे सतत अनेक प्रकरणात प्रकाशझोतात येत आहेत. गेल्याच आठवड्यात दाऊद इब्राहीमच्या घरातून त्यांना फोन आल्याचे प्रकरण गाजले होते. परंतु त्यानंतर लगेचच दुसर्‍या दिवशी असे कॉल्स आले नसल्याचे घाईघाईने सरकारने सांगून हे प्रकरण मिटवून टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु खरे तर याची सखोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे. मात्र सरकारने हे प्रकरण कसलीही चौकशी न करता झुरळ झटकून टाकावे तसे झटकले आहे. त्याअगोदर खडसेंचे एक निटकवर्ती असलेले गजानन पाटील यांनी लाच मागितल्या प्रकरणी अटक झाली होती. त्यांनी तर चक्क आपण गंमत म्हणून हे पैसे मागितले होते असे धक्कादायक विधान केले होते. ही सर्व प्रकरण पाहता खडसेंच्या या सर्व प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने दखल घेण्याची आवश्यकता आहे. त्यापूर्वी या सर्व चौकशी करण्याअगोदर त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. परंतु तसे न करता मुख्यमंत्री त्यांचा पाठीशी गालत आहेत. आज मुख्यमंत्र्यांवर कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. त्यांचा कारभार स्वच्छ चालू आहे. मात्र त्यांचे खडसे यांच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्यांवर जे आरोप होतात त्यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे. कारण अशा आरोपांमुळे खडसेंच्याच नव्हे तर संपूर्ण सरकारची विश्‍वासार्हता धोक्यात येते. त्यामुळे खडसे यांचा राजीनामा घेऊन या सर्व प्रकरणाची चौकशी करावी व त्यात ते निर्दोश सापडले तर त्यांना पुन्हा मंत्रीपदी बसवावे.
------------------------------------------------------------

0 Response to "नाथाभाऊ संकटात"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel