-->
हेलकावणारे हवामानखाते

हेलकावणारे हवामानखाते

संपादकीय पान बुधवार दि. २५ मे २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
हेलकावणारे हवामानखाते
आपल्याकडे हवामानखाते हे सतत हेलकावे खात असते. यंदा सुरुवातीपासून चांगला पाऊस पडेल असे भाकित व्यक्त झाले होते. त्यापाठोपाठ पाऊस जूनच्या पहिल्या आठवड्यातच येणार असा अंदाज हवामानखात्याचा होता. त्यामुळे दुष्काशग्रस्त जनतेला मोठा दिलासा मिळाला होता. आता मात्र हवामानखात्याने आपला अंदाज बदलला आहे व पाऊस आठवडाभर विलंबाने दाखल होईल असे म्हटले आहे. त्यामुळे उष्म्यामुळे हैराण झालेल्या जनतेला आणखी एक आठवडा पावसाला विलंब होणार ही चिता भेडसावित आहे. अशा प्रकारे हवामानखाते सतत आपले अंदाज बदलत असते व त्यात त्यांचे उखळ पांढले होते. त्यामुळे आपल्याकडे हवामानखात्याने पाऊस पडणार म्हणून सांगितलेय ना, मग छत्री घेऊन जाऊच नकोस असे विनोदाने बोलले जाते. परंतु ही वस्तुस्थिती आहे. हवामान खात्याचा आपल्याकडील अंदाज फारसा कधी खरा होताना दिसत नाही, ही दुदैवाची बाब आहे. पावसाळ्यात पाऊस किती पडतो हे जितके महत्त्वाचे असते, तितकेच तो कधी पडतो हेही महत्त्वाचे असते. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना शेतात काय पेरायचे आणि ते कधी पेरायचे हे ठरवण्यासाठी मॉन्सूनचे वेळापत्रक जाणून घेणे गरजेचे असते. सामान्य परिस्थितीत मॉन्सूनचे केरळवर आगमन झाल्यावर त्याला महाराष्ट्रावर पोचायला आठ-दहा दिवस लागतात; आणि आता तो मुळात केरळवरच उशिरा आला, तर राज्यात पाऊस यायला विलंब होणार म्हणजे १५ जूनच्या पुढेच असा अंदाज व्यक्त होतो. जगात हवामान खात्याचा अंदाज हा अचूक व्यक्त केला जातो. मग आपल्याकडेच कुठे चुकते याचा विचार कोणच करताना दिसत नाही. यासाठी भारतीय हावामान खाते हे अध्युनिक तंत्रज्ञानाचे सज्ज होण्याची गरज आहे. सध्या ज्या ठोकताळ्यावर हे अंदाज व्यक्त होतात ते आता जुने झाले असून त्यासाठी अन्य देशातील तज्ञांची आपण मदत घेणे आवश्यक ठरते आहे. मध्यंतरी ऑस्टे्रलिया व अन्य काही देश त्यासाठी मदत करण्यास पुढे सरसावले आहेत असे वृत्त होते. परंतु सरकारी लाल फितीच्या कारभारात असा प्रस्ताव अडकला गेला असण्याची शक्यता जास्त आहे. हवामानशास्त्राची सर्वच दिशा आता बदलली आहे. प्रशांत महासागरावर अल नियोचा जबरदस्त प्रभाव आहे व त्याच्या वर्चस्वानुसार पावसाचे तंत्र बदलत जाते. अवकाळी पाऊस पडतो त्याची जर आगावू सुचना दिली गेली तर आपण देशातील पिकांचे बरेचसे नुकसान भरुन काढू शकतो. मात्र आपल्याकडे अवकाळी पाऊस पडून गेल्यावर सर्वांना जाग येते. त्याची आगावू सूचना देणारी यंत्रणा जगात उपलब्ध आहे, मग ती आपल्याकडे उपलब्ध होऊ नये?
याचा सत्ताधारी पक्षाने व मंत्र्यांनी गांभीर्याने विचार करण्याची हीच योग्य वेळ आहे. आपल्याकडे जर त्यासंबंधी तंत्रज्ञान उपलब्ध नसेल तर जगाकडून आत्मसात करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

0 Response to "हेलकावणारे हवामानखाते"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel