-->
...आणि क्युबाचे दरवाजे खुले झाले!

...आणि क्युबाचे दरवाजे खुले झाले!

रविवार दि. २७ मार्च २०१६ च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
...आणि क्युबाचे दरवाजे खुले झाले!
आजपासून बरोबर ७५ वर्षापूर्वी क्युबामध्ये फ्रिडेल कॅस्ट्रो यांनी साम्यवादी क्रांती केली आणि साम्यवादी देश वगळता अन्य देशांसाठी या देशाचे दरवाजे बंद झाले. एका बंदिस्थ वातावरणात क्युबाने आपली वाटचाल सुरु केली. अमेरिकेच्या कुशीत म्हणजे जेमतेम दीडशे कि.मी. लांब असूनही तेथे अमेरिकेच्या अध्यक्षांना प्रवेश नव्हता. अमेरिकेचे अध्यक्ष केल्व्हिन कूलिज यांनी १९२८मध्ये क्युबाचा दौरा केला होता तोच शेवटचा. त्यानंतर आजवर अमेरिकेच्या अध्यक्षांना क्युबाच्या भूमीवर पाय ठेवता आला नव्हता. कट्टर कम्युनिस्ट असलेल्या कॅस्ट्रो यांनी समाजसत्तावादाची कास धरली आणि देशाला त्याच दिशेने नेले. कट्टर भांडवलशाही देश अमेरिका शेजारी असूनही आपल्या देशाला भांडवलशाहीचे वारे कधी लागणार नाहीत याची दखल घेतली. अर्थातच यात ते यशस्वी झाले. क्युबाला त्यांनी प्रगतीपथावर नेले. जेमतेम एक कोटी लोकसंख्या नसलेल्या या देशात एकेककाळी दारिद्य होते. मात्र सोव्हिएत युनियनच्या सहकार्याने देशात विकासगंगा कशी वाहील हे पाहिले. तीन तपांपूर्वी सोव्हिएत युनियनमधील साम्यवाद कोसळला, भांडवलशाहीचा पुरस्कार करणारी अमेरिका ही जगात एकमेव महासत्ता राहिली तसेच पश्चिम आणि पूर्व जर्मनीला वेगळे करणारी बर्लिनची भिंत कोसळली. त्यापाठोपाठ साम्यवादी देशांच्या सत्ता धडाधड कोसळल्या. भांडवलशाहीचे समर्थक यामुळे खूष झाले असले तरी समाजवादाचा कॅस्ट्रो यांनी खांद्यावर घेतलेला झेंडा कधीच खाली ठेवला नाही. आता प्रकृती बरी नसल्यामुळे कॅस्ट्रो हे क्युबाचे राष्ट्राध्यक्ष नाहीत. त्यांच्या जागी त्यांचे बंधू राऊल कॅस्ट्रो यांच्याकडे पक्षाची व देशाची सुत्रे आली आहेत. फ्रिडेल कॅस्ट्रो हे अलिप्त राष्ट्र चळवळीचे एक आघाडीचे नेतृत्व होते. भांडवलशाही अमेरिकेपासून चार हात दूरच राहून त्यांनी समाजसत्तावादी देश व तिसर्‍या जगाभोवती चांगले वलय निर्माण केले. अमेरिकेशिवाय अन्य कोणत्याही देशाचे चालू शकते हे त्यांनी दाखवून दिले. भारताशी त्यांनी अतिशय उत्तम संबंध ठेवले होते. इंदिरा गांधी यांच्याकडे अलिप्त राष्ट्र चळवळीचे नेतृत्व असताना क्युबा-भारत यांचे संबंध आणखी वृध्दींगत झाले. भांडवलशाही आणि साम्यवाद या किती टोकाच्या विचारसरणी आहेत, हे जगाला दाखवून देण्याचे काम क्युबाच्या फिडेल कॅस्ट्रो यांनी केले. साम्यवादाची चौकट कायम ठेवून त्यात बरेच प्रयोग केले. सर्वसामान्यांना कसे सुखाने जीवन जगता येईल व लोकांच्या किमान गरजा कशा भागविल्या जातील याकडे त्यांनी लक्ष केंद्रीत केले. कॅस्ट्रो यांचे वारसदार राउल कॅस्ट्रो यांनी ही चौकट कायम ठेवली होती. अर्थात तिला आधुनिक जग धक्के मारते आहे आणि त्यामुळे नागरिक देशात राहायलाही तयार नाहीत, प्रामुख्याने गेल्या पाच वर्षात जगातील परिस्थिती झपाट्याने बदलत चालली होती. यात आपण आपली अर्थव्यवस्था बंदिस्थपणे रएाहून फार काळ चालवू शकत नाही, हे राऊल कॅस्ट्रो यांना पटले. अखेर कालानुरुप बदलण्याचा त्यांनी निर्णय घेतला. यातूनच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा क्युबा दौरा आयोजित केले गेला. यांच्या दौर्‍यात लोकशाही, वैयक्तिक स्वातंत्र्य असे वादग्रस्त विषय अजेंड्यावर नसले तरी क्युबातील नागरिक अमेरिका नावाच्या संधीकडे ज्या आतुरतेने पाहत होते, तिची दारे किलकिली होणार आहेत. स्पेनपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा अमेरिका हा क्युबाचा मित्रदेश व्हायला पाहिजे होता. पण नियतीला काही वेगळे पहायचे होते. राजवटी उलथवण्यासाठी हेरगिरी, सशस्त्र कारवाया, नागरिकांना उभय देशांत प्रवेश करण्यावर बंदी, व्यापारावर बंदी, मित्रदेशाच्या मदतीने हल्ल्‌याची तयारी असे सर्व काही या दोन्ही देशांनी केले. अगदी तीन-चार वर्षांपूर्वी कार्डिनल जेम ओर्टेगो नावाच्या पाद्—याच्या माध्यमातून गुप्तपणे चर्चा सुरू झाली. ओबामा यांची क्युबाला भेट हा त्याचा परिणाम आहे. अखेर क्युबाला चर्चेच्या टेबलावर आणण्यात ओबामा यशस्वी झाले. इंटरनेट, सार्वजनिक वाहतूक आणि काही व्यापाराच्या गोष्टीच या भेटीत केल्या गेल्या. अमेरिका बाजारपेठेच्या शोधात आहे आणि क्युबाला अमेरिकेची एक खिडकी उघडायची आहे, सध्यातरी या दौर्‍याचे फलित ऐवढेच आहे. क्युबाचे नागरिक जमेल त्या मार्गाने अमेरिकेत जाण्याचा प्रयत्न करत आहेत. क्युबाची बंदिस्थ असलेली आजवरची चौकट ढिली करण्याचे काम हा दौरा करणार असल्याने एक ऐतिहासिक घटना म्हणून तो जगाच्या कायम लक्षात राहील. क्युबाने अजूनही अधिकृतरित्या समाजवादी बंध तोडलेले नाहीत व खुलेपणाने भांडवलशाहीचा पुकारा केलेला नाही. परंतु सध्याच्या दुनियेत राऊल कॅस्ट्रो यांना फार काळ अलिप्तता पाळता येणार नाही. क्युबाची पावले हळूहळू भांडवलशाहीच्या दिशेने गेल्यास त्यात फारसे आश्‍चर्य वाटणार नाही.
----------------------------------------------------------------

0 Response to "...आणि क्युबाचे दरवाजे खुले झाले!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel