-->
अणेंच्या तोंडी संघाची भाषा

अणेंच्या तोंडी संघाची भाषा

संपादकीय पान शनिवार दि. २६ मार्च २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
अणेंच्या तोंडी संघाची भाषा
महाराष्ट्राचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांना अखेर अपेक्षेप्रमाणे राजीनामा देणे भाग पडले आहे. अर्थात त्यांनी अधिवेशन सुरु होण्याच्या पार्श्‍वभूमीवर मराठवाडा वेगळा करुन त्याचे स्वतंत्र राज्य करण्याची भाषा केली होती. त्यामुळे विरोधकांनी या प्रश्‍नी सभागृह तब्बल दोन दिवस दणाणून सोडले व मुख्यमंत्र्यांना त्यांचा राजीनामा घेण्यास भाग पाडले. त्यांचा हा राजीनामा जाहीर होताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा.गो. वैद्य यांनी राज्याचे चार तुकडे पाडण्याची भाषा केली आहे. अर्थातच संघाने व भाजपानेही देशात लहान राज्ये स्थापन करावीत अशी वारंवार भाषा केली आहे. आज जे अणे बोलत आहेत ती खरे संघाचीच भाषा आहे. कारण संघाची ती अधिकृत भूमिका आहे. भाजपा मात्र आपल्या राजकीय स्वार्थासाठी ही भूमिका अधिकृतपणे मांडत नसला तरी त्यांची छुपी भूमिका याहून काही वेगळी नाही. यासाठी भाजपाची वेळोवेळी तारेवरची कसरत होत असते. अर्थात ही अणे यांची वैयक्तीक भूमिका आहे असे म्हणून चालणार नाही. कारण ते राज्य सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे त्यांच्या विधानाला विशेष महत्व आहे. याची कल्पना अणे यांना नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल. यापूर्वी देखील त्यांनी विदर्भ वेगळा करण्याची भाषा केली होती. गेल्या डिसेंबरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच अणे यांचा तोल गेला होता आणि त्यांनी वेगळ्या विदर्भाच्या मागणीचा जोरदार पुरस्कार केला होता. परंतु गेल्या वेळी त्यांना मुख्यमंत्र्यांनी वाचविले होते. यावेळी विरोधक या प्रश्‍नी ऐवढे आक्रमक होते की, मुख्यमंत्र्यांना त्यांचा वाचविणे अशक्य होते. सर्वच विरोधी पक्ष अगदी सत्तेत असलेली शिवसेनाही अणेंच्या विरोधात उभी ठाकली होती. भाजपा या प्रश्‍नी एकाकी पडला. त्यातून अणेंची हकालपट्टी करण्याशिवाय त्यांच्यापुढे काही पर्याय राहिला नव्हता. अशा प्रकारे अणे असोत किंवा कुणीही या राज्याचे तुकडे पाडण्याचा कुणीही विचार केल्यास तो विचार सहन केला जाणार नाही हे यातून सर्व पक्षांनी दाखवून दिले आहे. संघाची हीच भूमिका असल्याने व मुख्यमंत्री हे अणेंना पुढे करुन संघाचे राजकारण पुढे रेटू पाहात होते. परंतु त्यांचा हा डाव पूर्णपणे फसला आणि महाराष्ट्र एकसंघच राहाणार याबाबत कुणाचे यापुढे तरी दुमत नाही हे दाखवून देण्यात आले आहे. देशाचा झपाट्याने विकास करावयाचा असेल तर आपल्याकडे पन्नास राज्ये आवश्यक आहेत असे मत वेळोवेळी भाजपा मांडत आला आहे. संघाचेही हेच मत आहे. असा प्रकारे छोटी राज्ये करुन देशाचा विकास झपाट्याने होतो असे मत भाजपा व संघाचे असले तरीही ते त्यांनी आकडेवारीनिशी कधीच सिध्द करुन दाखविलेले नाही. गेल्या निवडणूकीत भाजपाने विदर्भात याच मुद्यावरुन आपल्या पदरी मते पाडून घेतली आहेत. परंतु आता ते प्रत्यक्षात उतरविणे त्यांना शक्य होत नाही. कारण राज्याचे तुकडे पाडणे हे काही शक्य नाही. आता तर विदर्भापाठोपाठ वेगळ्या मराठवाड्याची भूमिकाही अणे यांनी मांडली आहे. अर्थातच ही मागणी संघाची व भाजपाचाही आहे. परंतु भाजपा आपले राजकीय नुकसान होईल या भीती पोटी ही भूमिका अधिकृतपणे मांडू शकत नाही. म्हणूनच श्रीहरी अणे यांना राज्याचे लचके तोडू पाहाणार्‍या शक्ती उचकावित आहेत. निदान त्याची चर्चा यानिमित्ताने व्हावी व यातूनच आपले हे धोरण पुढे रेटता येईल, असे संघास वाटत असावे. वेगळ्या विदर्भाची मागणी ही तेथील काही मोजक्या धनिक लोकांची आहे. या मागणीस कॉँग्रेसमधील एका गटाने निवडणुका आल्यावर राजकारण म्हणून पाठिंबा दिला आहे. परंतु वेगळ्या मराठवाडा म्हणजे संघाच्या भाषेतील देवगिरी राज्याची मागणी कधीच नव्हती. परंतु अशा प्रकारे राज्याचे लचके तोडण्याचे प्रश्‍न उपस्थित करुन लोकांच्या मूळ प्रश्‍नांकडे बगलही देता येते. तसेच संघांच्या विचारांची पेरणी अशाच प्रकारे करुन शेवटी लोकांच्या पचनी पाडता येते. विदर्भ व मराठवाड्यातील लोकांवर आता हे बिंबविले जाईल की, बघा तुमचे स्वतंत्र राज्य नसल्यामुळे तुमच्यावर अन्याय होतोय. यातून प्रदीर्घ काळाने का होईना लोकांना या बाबींवर विश्‍वास वाटू लागतो, अशी संघाची विचारधारा आहे. परंतु संघाने असा राज्याच्या फुटीरतेचा विचार कितीही पेरला तरी त्याचा उपयोग होणार नाही. महाराष्ट्र हे राज्य संघर्षातून मिळविलेले आहे. १०८ हुतात्म्यांना त्यासाठी आपले रक्त सांडावे लागले आहे. जो राजकीय पक्ष या राज्याचे लचके तोडण्याचा प्रयत्न करील त्यांना या राज्यातील जनता कदापी माफ करणार नाही. अर्थात हे अणे व संघाच्या लक्षात आता तरी आले असेल.
------------------------------------------------------------------------

0 Response to "अणेंच्या तोंडी संघाची भाषा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel