-->
विरोधकांचा फुसका बार

विरोधकांचा फुसका बार

संपादकीय पान शुक्रवार दि. २५ मार्च २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
विरोधकांचा फुसका बार
रायगड जिल्हा परिषदेची मुदत संपून पुन्हा निवडणूक होण्याकरीता आता जेनतेम आठ महिने शिल्लक असताना विरोधकांनी सत्ताधार्‍यांमध्ये फूट पाडणार असल्याची आवाई उठविली होती. केंद्रात व राज्यात सत्ता आली म्हणजे आपण पैशाच्या जोरावर जिल्ह्यातील सत्ता खेचून घेऊ शकतो असे विरोधकांचे स्वप्नरंजन होते. खरे तर आता शेवटच्या वर्षात थोडा धीर धरुन निवडणुकांना सामोरे जाऊन लोकांचा कल पाहणे महत्वाचे असते. अशा वेळी सत्तेच्या बोहल्यावर चढण्याची घाई झालेल्या विरोधकांना धडा शिकविण्याची रणनिती सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी-शेकाप यांनी आखली होती. त्यानुसार अध्यक्षांसह, उपाध्यक्ष, स्थायी व विषय समित्यांच्या सभापतींवर अविश्‍वास ठराव मांडून विरोधकांची हवाच काढून घेतली. या ठरावाला कुणीच सदस्य उपस्थित न राहिल्याने हा ठराव अखेर बारगळला व सत्ताधार्‍यांचाच विजय झाला. विरोधकांकडे जर बहुमताची ताकद असती तर त्यांनी सभागृहात उपस्थित राहून प्रत्यक्ष मतदान करुन आपली ताकद दाखविली असती. परंतु तसे करण्याची त्यांची हिंमत झाली नाही. याचा अर्थ त्यांच्या केवळ घोषणाच होत्या. यातून राष्ट्रवादी-शेकाप यांची ताकद वाढली आहे. आगामी काळात आता ते समर्थपणे निवडणुकांना सामोरे जातील, यात काही शंका नाही. तसेच अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील यांनी सादर केलेला जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प पाहता जिल्ह्याचा विकास योग्य नियोजनबद्ध करुन जमा असलेल्या निधीचा कशा उत्तम प्रकारे वापर करता येईल याचेे उत्तम उदाहरण ठरेल. या अर्थसंकल्पात समाजातील प्रत्येक घटकांचा अभ्यास करुन त्यांच्या विकासासाठी उत्तम प्रकारे निधी कसा उपलब्ध करुन देता येईल याचा विचार करण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, महिला, शेतकरी, अपंग, आदिवासी, मागासलेल्या समाजाच्या उन्नतीसाठी योजना, ऐतिहासिक वास्तूंचे जतन असा अनेक महत्वांच्या मुद्यांचा यात विचार करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेकडून बिनशेती ना हरकत दाखला देताना आकारण्यात येणार्‍या शुल्कात सुधारणा करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर बिनशेती ना हरकत दाखला देतानाच शुल्क हे पूर्णपणे वसूल करण्याचे नियोजित करण्यात आले आहे. तसेच बिनशेतीच्या परवानगीचे प्रस्ताव हे वाणिज्य प्रकारात गृहीत धरुन त्यावर स्वतंत्र दर निश्‍चित करण्यात येणार आहेत. त्यामुळे भविष्यात जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. अपंग कल्याणाच्या व त्यांच्या निवासी घरकूल योजनेसारखी एक महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर सध्या मुलींचे घटते प्रमाण पाहता ज्या पालकांना फक्त मुलीच आहेत त्यांचा सत्कार करुन त्यांना अनुदान देणे, दुर्गम भागातील रुग्णांसाठी सोय व्हावी यासाठी चार-पाच गावांसाठी एक रुग्णवाहिला पुरविणे, योगाच्या प्रसारासाठी योग प्रशिक्षकांना मानधन देणे, मागासवर्गीयांना कृषी अवजारे पुरविणे, मागासवर्गीय महिलांना तांत्रिक, व्यवसायिक प्रशिक्षण देणे, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना टॅब पुरविणे, ग्रामवृत्त सेवा पुरविणे या योजना लक्षणिय आहेच शिवाय ताळागाळातील जनतेच्या गरजा लक्षात घेऊन आखण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर दररोज पुजा करण्यासाठी खास २५ लाखाचा निधी ठेवण्यात आला आहे. रायगड हा किल्ला राज्याची अस्मिता आहे व जिल्ह्यात हा किल्ला असल्याने आपले मोठे भाग्य आहे. अशा या रायगडावर शिवाजी महाराजांचे स्मरण दररोज या निमित्ताने करणे ही एक प्रकारची गरजच आहे. शिवाय ५० टक्के अनुदानाने शेती अवजारे पुरविणे, स्ट्रॉबेरी, पुलपिके, कंदपिके  यांच्या उत्पादनांसाठी पीक प्रोतिसाहन योजना लागू करण्यात आली आहे. ७५ टक्के अनुदानाने शेतकर्‍याला सौर दिपसंच देणे, सौर कंदील पुरविणे, ७५ टक्के अनुदानाने फळबाग प्रोत्साहन योजना राबविणे या योजना शेतकर्‍यांना फायदेशीर ठरणार्‍या आहेत. शिवाय ५ ते १२ वी पर्यंत शाळेत जाणार्‍या मुलींना सायकली पुरविणे ही सामाजिकदृष्ट्या महत्वाची योजना आहे. कारण अनेकदा मुलींचे शिक्षण अनेकदा खंडीत होते. परंतु त्यांना सायकल मिळणार असेल तर त्या शाळेत जाऊ शकतात. शिवाजी महाराजांच्या पदस्पस्पर्शाने पावन झालेला हा जिल्हा विकासाच्या मार्गावर आहे. मुंबईपासून जवळ असल्यामुळे तसेच मुंबई बोटीच्या मार्गाने हाकेच्या अंतरावर असल्यामुळे रायगड जिल्हा पर्यटनाच्यादृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनार्‍याच्या भागात प्रामुख्याने रोजगार हा पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मिळाला आहे.     तसेच औद्योगिक वसायहतीही आहेत. काही सरकारी मालकीचे मोठे कारखाने आल्यामुळे जिल्ह्याच्या वैभवात निश्‍चितच भर पडली आहे. अशा या जिल्ह्यातील काही मागास भागांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात तरतूद आहे. या अर्थसंकल्पामुळे जिल्ह्याच्या विकासात भर पडेल.
---------------------------------------------------------------------

0 Response to "विरोधकांचा फुसका बार"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel