-->
होलिकोत्सव साजरा करताना...

होलिकोत्सव साजरा करताना...

संपादकीय पान बुधवार दि. २३ मार्च २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
होलिकोत्सव साजरा करताना...
होळीच्या दुसर्‍या दिवशी धुलिवंदनात पाण्याचा जो गैरवापर होतो व पाणी वाया घालविले जाते ते यंदा तरी टाळले पाहिजे. राज्यात विदर्भ, मराठवाड्यात या वर्षी मोठा दुष्काळ आहे. विदर्भ, मराठवाडाच नव्हे तर उत्तर महाराष्ट्र, तसेच संपन्न मानल्या जाणार्‍या पश्‍चिम महाराष्ट्रातील काही जिल्हेही या दुष्काळातून सुटलेले नाहीत. विदर्भ, मराठवाड्यातील अनेक गावांमध्ये तर माणसांना प्यायलाही पाणी नाही. जनावरांची हालत तर त्याहून वाईट आहे. शेतकर्‍यांनी आपले पशुधन नाईलाजास्तव कवडीमोल भावाने विकायला काढले आहेत. मात्र, ते घ्यायलाही कोणी पुढे येत नाही. यावर्षीचा दुष्काळ हा १९७२ पेक्षाही मोठा असल्याची चर्चा आहे. अनेक शेतकरी देशोधडीला लागले आहेत. ग्रामीण महाराष्ट्रात पाण्यासाठी महिलांना डोक्यावर हांडे घेऊन मैलोन मैल चालावे लागते आहे. गेल्या दोन वर्षात आपल्याकडे सरासरीपेक्षा कमीच पाऊस पडला. त्याहून आपण पाण्याचे योग्य नियोजन गेल्या दोन दशकात केलेले नाही. त्याचे परिणाम आपण आता भोगीत आहोत. परंतु यातून धडा घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे. शहराला पाणी पुरवठा करणार्‍या तलावांनी देकील आत्ताच तळ गाठला आहे. अजून पाऊस पडायला तब्बल तीन महिने बाकी आहेत. अशा वेळी आपण असलेला पाण्याच थेंबन थेंब जपून वापरला पाहिजे. प्रामुख्याने धुलिवंदनात आपण जे पाणी वाया घालविण्याची व रेन डान्स करण्याची चैन करतो ती यंदा परवडणारी नाही. याबाबत सरकारने अधिकृतच फतवा काढून लोकांना अगोदरच जागृत केले आहे. परंतु त्यातूनही काही जण सण साजरा करण्याच्या उत्साहात पाणी वाया घालविण्याचा धोका आहे. अशांना वेळीच वठणीवर आणण्याची गरज आहे. होळीच्या दुसर्‍या दिवशी धुळवड तर पाचव्या दिवशी रंगपंचमी खेळली जाते. या दोन दिवसांत पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. तलावात डुंबत रंग खेळणे, फवारे उडवत रेन डान्स करणे असे प्रकार गेल्या काही वर्षांत सुरु झाले आहेत. यात मोठ्या प्रमाणात पाण्याच अपव्य फारच होतो. दुष्काळाच्या झळा असह्य होत असताना होळीसाठी पाणी आणायचे कुठून? लोकांना प्यायला पाणी नसताना होळीत होणारी पाण्याची नासाडी टाळण्यासाठी सरकारनेच आता पुढाकार घेतला आहे. होळीच्या काळात स्विमिंग पूल बंद ठेवण्याचे तसेच रेन डान्सचे आयोजन करण्यावर बंदी आणणार असल्याचे ठरवले आहे. तसे आदेशच महानगर पालिका आणि पालिकेला देण्यात आले आहेत. होळीच्या एक दिवस आधीच २२ मार्चला जागतिक जलदिन साजरा झाला. जलदिनानिमित्त महाराष्ट्र सरकारने जलजागृती सप्ताह पाळला होता. सध्या आपल्याला जनतेला जलविषयक जागृती करण्याची गरज आहे. कारण आपल्याकडे पाणी मुबलक होते त्यावेळी आपण त्याचे महत्व जाणले नाही व प्रचंड प्रमाणात उपसा केला. त्यामुळे आज अनेक भाग उजाड झाला आहे. याला येथील जनता जशी जबाबदार आहे तसे शासनाच्या नियोजनाचा अभावही कारणीभूत आहे. राज्यातील दुष्काळावर कायमस्वरुपी तोडगा काढणे गरजेचे आहे. वाळवंटाने वेढलेल्या इस्त्राईलमध्ये शेती बहरत असताना महाराष्ट्रच नव्हे, तर देशाच्या अनेक भागात उजाड माळरान नव्याने तयार होत आहे. कोकणासारख्या मुबलक पाणी असलेल्या भागातील आता जलस्त्रोत्र खोलवर जात आहे, ही धोक्याची घंटा ठरावी. कोकणातील पाण्याचे नियोजन व समुद्रात वाहून जाणारे पाणी न अडविल्यास कोकणाचा कॅलिफोर्निया नव्हे तर उजाड वाळवंट होण्यास वेळ लागणार नाही. हे थांबविण्यासाठी नियोजन हवे. जलपुरुष म्हणून ओळखले जाणारे राजेंद्रसिंह यांनी यासाठी पुढाकार घेतलाच आहे. नदी परिक्रमासारखे उपक्रम राबविले जात आहेत. पाचवीला पूजलेल्या पाणीटंचाईवर नक्कीच मात करता येणार आहे. यंदा तर मार्च महिन्यातच राज्याच्या अनेक भागात पाणीटंचाईचे सावट उभे ठाकले आहे. मराठवाड्यात केवळ पाच टक्के, तर उर्वरित महाराष्ट्रात केवळ ४० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पाणीटंचाईची समस्या केवळ मराठवाडा, विदर्भातच आहे असे नाही, तर सर्वच राज्यात आहे. डोक्यावर हंडा घेऊन पाण्याचा शोध घेत महिला, पुरुषच नव्हे, तर लहान मुलेही रानोवनी फिरत आहेत. कोणताही सण, उत्सव आपसात प्रेम वाढविण्यासाठी साजरा केला जातो. होळी साजरी करताना स्वत:च्या आनंदाबरोबरच इतरांचाही विचार केला, तर खर्‍या अर्थाने होळीचा आनंद सर्वांनाच लुटता येणार आहे.
--------------------------------------------------------------

0 Response to "होलिकोत्सव साजरा करताना..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel