-->
चेनाबमध्ये घोडे न्हाले

चेनाबमध्ये घोडे न्हाले

संपादकीय पान सोमवार दि. २८ मार्च २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
चेनाबमध्ये घोडे न्हाले
जम्मू-काश्मीरमध्ये पी.डी.पी.-भाजपाचे सरकार सत्तेवर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या सरकारच्या मुख्यमंत्रीपदी महबुबा सईद यांची निवड होणार आहे. त्यांच्यावतीने आता सरकार स्थापनेचा दावा राज्यपालांकडे करण्यात आलेला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात त्यांना राज्यपाल सरकार स्थापनेचे आमंत्रण देतील व रितसर शपथविधी होईल. अशाप्रकारे उभयतांचे सत्ता स्थापन करण्याचे घोडे चेनाबमध्ये न्हाले असेच म्हणता येईल. राज्यात गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीनंतर पी.डी.पी.-भाजपाचे सरकार सत्तेत आले होते व मुख्यमंत्रीपदी मुफ्ती महंमद सईद यांची निवड झाली होती. मात्र त्यांच्या निधनानंतर सरकार स्थापनेसाठी सईद यांच्या कन्या मेहबुबा यांनी प्रदीर्घ काळ घेतला. अर्थातच उभयतांमध्ये चर्चा सुरु होती. अफझल गुरुला शहिद म्हणणार्‍यांमध्ये पी.डी.पी. आघाडीवर आहे. अशा प्रकारे भाजपाने देशद्रोह्यांबरोबर सत्ता मिळविण्यासाठी मांडीला मांडी लावली आहे. अर्थात या दोघांची ही युती फार काळ टिकणारी नाही. यापूर्वी सत्तेत असलेल्या नॅशनल कॉन्फरन्स-कॉँग्रेस युतीशी पी.डी.पी.चे वैर आहे. खरे तर नॅशनल कॉन्फरन्सच्या नकर्तेपणामुळेच पी.डी.पी.चा सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे व भाजपाला जम्मूत आपले बस्तान बसविता आले आहे. मुफ्ती महंमद सईद यांच्या निधनानंतर भाजपाने त्यांचे आमदार फोडण्याचा बराच प्रयत्न केला व पी.डी.पी.ला धक्का देऊन पुन्हा सत्तेत सहभागी होण्यासाठी वाटाघाटी केल्या. त्यामुळे मेहबुबा या भाजपावर नाराज आहेत. मात्र सत्ता जाऊ नये यासाठी त्यांनी भाजपासोबत जाण्याचे ठरविले आहे. गेल्या वर्षात निवडणुकांनतर काश्मिरमध्ये अस्थिरता वाढली आहे. फुटीरतावाद्यांना आणखीनच प्रोत्साहन मिळाले आहे. तेथील जनतेला स्थैर्य पाहिजे आहे व तेथील विकास व्हावा असे वाटते. त्याचबरोबर राज्याची प्रगती झाली तर जनतेचे भले होईल असे वाटते. नरेंद्र मोदींनी निवडणुकांच्या प्रचार सभेत याचेच गाजर जनतेला दाखविले होते. परंतु आता जनतेचा भ्रमनिरास होत आहे. विकासाच्या केवळ गप्पाच झाल्या, उलट देशातील फुटीरतावादी शक्ती तेथे सशक्त होत असल्याचे चित्र आहे. आता मेहबुबा यांचे सरकार सत्तेत येणार आहे. परंतु जनता मात्र समाधानी नाही. काश्मिरात जे विकासचक्र रोखले गेले आहे त्याला गती मेहबुबा खरोखरीच देणार काय असा सवाल आहे. जम्मू-काश्मिर हे राज्य देशाच्या दृष्टीने अतिशय संवेदनाक्षम राज्य आहे. येथे घडलेल्या कोणत्याही घटनांचे पडसाद देशभरात उमटतात. तसेच येथील फुटीरतावादी शक्ती संपविणे हे सरकारचे प्रमुख कार्य असले पाहिजे. परंतु याच्या नेमके उलटेच चालले आहे. भाजपा देखील सत्तेच्या मोहात अडकून पी.डी.पी.सारख्या फुटीरतावाद्यांना पाठबळ देणार्‍या शक्तींसोबत सत्तेत आहे. भाजपाचे नेते राम माधव याचे एवढ्या गांभीर्याने समर्थन करतात की ते पाहून हसावे की रडावे ते समजत नाही. सत्तेसाठी भाजपा कोणत्याही थराला जाऊ शकतो हे जम्मू-काश्मिरमध्ये दिसले आहे.

0 Response to "चेनाबमध्ये घोडे न्हाले"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel