-->
नियतीचा अजब न्याय!

नियतीचा अजब न्याय!

शुक्रवार दि. 30 जून 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
नियतीचा अजब न्याय!
सुमारे दोनशेहून जास्त लोकांचा जीव घेणार्‍या 1993 सालच्या मुंबई बॉम्बस्फोेटाच्या कटातील प्रमुख आरोपी मुस्तफा डोसा याला दोषी ठरविल्यानंतर 12 दिवसांनी हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू यावा हे काही मनाला पटणारे नाही. परंतु हे खरे आहे. दुसर्‍याचा जीव घेणारा हा एकेकाळचा कुख्यात तस्कर व दाऊद इब्राहीमचा साथीदार डोसा आपल्याला आता बहुदा फाशी होणार या दडपणाने मरावा हा नियतीचा अजब न्याय म्हटला पाहिजे. छातीत दुखत असल्याच्या कारणामुळे मंगळवारी रात्री उशीरा त्याला जे.जे. हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी अतितणाव आणि छातीतील संसर्गामुळे डोसाला हा त्रास होत असल्याचं डॉक्टरांनी दिली होती. यानंतर हृदयविकाराच्या झटक्यानं मुस्तफा डोसाचा मृत्यू झाला. दरम्यान, 1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरविण्यात आलेले मुस्तफा डोसा व फिरोज खान यांना याच प्रकरणी फाशी चढविण्यात आलेल्या याकुब मेमनप्रमाणे फाशीची शिक्षा ठोठवावी, अशी मागणी मंगळवारी सीबीआयने विशेष टाडा न्यायालयाला केली होती. या बॉम्बस्फोटात या दोघांची भूमिका मेमनप्रमाणे महत्त्वाची आहे, असा युक्तिवाद सीबीआयने केला होता. 1993 बॉम्बस्फोट प्रकरणी केस बी मध्ये विशेष न्यायालयाने मुस्तफा डोसा व फिरोज खानला मंगळवारी दोषी ठरवले होते. त्याचदिवशी त्याच्यावर दडपण आले व रात्री त्याला जे.जे.मध्ये दाखल करावे लागले. डोसावर यापूर्वी जे.जे.मध्येच बायपास झालेली होती. त्यानंतर काही काळ त्याची प्रकृती बरी होती. मात्र पुन्हा त्याला काही काळाने त्रास झाल्यावर त्याच्यावर अँजिओप्लास्टी केली होती. अशा प्रकारे तस्करीपासून सुरुवात केलेला हा एकेकाळचा दाऊदचा साथीदार झटपट पैसे कमविण्याच्या नादात अतिरेकी कारवायांकडे वळला. दाऊदशी त्याचे संबंध अतिशय घट्ट असल्याने आपण देशविघातक कृत्ये करीत आहोत व त्याच्या बदल्यात आपल्याला फाशी होऊ शकते याची कल्पना त्यांना नव्हती. अर्थात हा त्यांचा दोषच आहे. कारण देशविघातक कृत्यात त्यांचा सहभाग तर होताच तसेच त्याची आखणी देखील त्यांच्या टोळक्याने केली होती. संजय दत्तने देखील आपल्याला ही शस्त्रे कुठून आली व त्यांच्या उद्देश काय होता याची कल्पना नव्हती असे सांगितले होते. मात्र हा काही बचाव होऊ शकत नाही. त्यामुळे संजय दत्तला शिक्षा भोगावीच लागली होती. साखळी बॉम्बस्फोटासाठी तयार केलेल्या चार पथकांपैकी एका पथकाचा मुस्तफा डोसा म्होरक्या असल्याचा सीबीआयचा दावा विशेष न्यायालयाने मान्य केला. तसेच फिरोज खाननेही या बॉम्बस्फोटात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. याचाच आधार घेत सीबीआयने या दोघांचीही बॉम्बस्फोटातील भूमिका याच प्रकरणी फाशी सुनावलेल्या याकूब मेमन इतकीच महत्त्वाची असल्याचा दावा विशेष न्यायालयात केला. 12 मार्च 1993 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 257 जण मृत्युमुखी पडली होती. तर 713 जण जखमी झाले होते. एकूण 27 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले होते. तर बॉम्बस्फोट घडवण्यासाठी तीन हजार किलो आरडीएक्स पाकिस्तानातून आणले गेले होते. त्यापैकी फक्त 10 टक्के आरडीएक्सचा वापर केला गेला. 1992 साली अयोध्येत बाबरी मशिद पाडल्यानंतर डोसाने दुबईत एक बैठक बोलावली होती. या बैठकीला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, अनीस इब्राहिम आणि इजाज पठाण हजर होते. सरकारने टाडा कोर्टासमोर ही बैठक झाल्याचे सिद्ध केले. मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी मुस्तफा डोसाने दुबई/पाकिस्तानातून स्फोटके, एके-47 रायफल्स असा शस्त्रसाठा रायगडच्या दिघी बंदरात उतरवला होता. 9 जानेवारी 1993 साली ही सामग्री दिघी बंदरात पोहोचली. हा माल उतरवताना कोणीही आठकाडी करु नये यासाठी त्याने त्यावेळच्या कस्टम अधिकार्‍यांनाही लाच दिली होती.  देशात प्रथमच या बॉम्बस्फोटात आरडीएक्स स्फोटकांचा वापर झाला. दुसर्‍या महायुद्धानंतर पहिल्यांदाच कुठल्या दहशतवादी हल्ल्यात इतक्या मोठया प्रमाणावर स्फोटकांचा वापर झाल्याचा सीबीआयचे म्हणणे होते. या प्रकरणी मुस्तफा डोसाला फाशीची शिक्षा होऊ शकली असती. सध्या या प्रकरणात दोषी ठरलेल्या आरोपींच्या शिक्षेवर सुनावणी सुरु आहे. विशेष टाडा न्यायालयाने 16 जून शुक्रवारी अबू सालेम, मुस्तफा डोसा, ताहीर मर्चंट, करीमुल्ला खान, फिरोझ अब्दुल राशिद खान यांना दोषी ठरवले. गुन्हेगारी कट रचणे आणि दहशतवादी कारवायांसाठी सालेमला न्यायालयाने दोषी ठरवले. शस्त्रास्त्र कायद्याखालीही न्यायालयाने त्याला दोषी ठरवले. सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने अब्दुल कय्यूमची सुटका केली. त्याची तात्काळ मुक्ततता करण्याचे न्यायालयाने आदेश दिले. मुंबईतील या सारखळी बॉम्बस्फोटाला 24 वर्षे उलटली आहेत. मात्र अजूनही आपल्याकडे खटले चालूच आहेत. यतून आपल्याकडील न्यायव्यवस्था न्याय किती संथ गतीने देते याचा अंदाज येतो. आता या खटल्यातील दोषींपैकी सहा जण मरण पावले आहेत. अनेक जण त्यातील वृध्द झाले आहेत. अशा स्थितीत त्यांना फाशी देण्यास एवढा विलंब का असा सवाल सर्वसामान्य जनतेत उपस्थित होणे स्वाभाविक आहे. हा खटला सरकारने फास्ट ट्रॅकवर चालविला जाणे आवश्यक होते. तसेच यातील जबाबदार व्यक्तींना किमान पहिल्या पाच वर्षातच शिक्षा सुनावली जाणे गरजेचे होते. तसे झाल असते तर आपल्या देशातील अतिरेकी कारवायांना आळा बसू शकतो. परंतु तसे होत नाही व अनेक आरोपी तुरुगातच मरत आहेत. मग त्यांना शिक्षा ठोठावणार कशी? या निमित्ताने आपल्याकडील न्यायव्यवस्थेतील विलंबाची कारणे शोधून झटपट न्याय देण्याची प्रक्रिया सुरु झाली पाहिजे.
-------------------------------------------------------

0 Response to "नियतीचा अजब न्याय!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel