-->
अमेरिका भेटीचे फलित

अमेरिका भेटीचे फलित

गुरुवार दि. 29 जून 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
अमेरिका भेटीचे फलित
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेसह तीन देशांच्या दौर्‍यावरुन परतले आहेत. ही त्यांची गेल्या तीन वर्षातली अमेरिकेची पाचवी वारी होती. यावेळच्या भेटीला वेगळे महत्व होते कारण यावेळी ट्रम्प अध्यक्षपदी रुजू झाल्यानंतर भारतीय पंतप्रधांनांना पहिल्यांदाच भेटत होते. ट्रम्प हे बेभरवशाचे आहेत तसेच ते कोणताही निर्णय घेऊ शकतात. मात्र मोदींशी त्यांची तार पहिल्याच भेटीत बर्‍यापैकी जुळली आहे. अमेरिकेच्याबरोबर मोदींनी पोर्तुगाल व नेदरलँड या दोन युरोपातील देशांचा दौरा केला. या देशांना आपल्या दृष्टीने फारसे महत्व नाही. मात्र युरोपातील देश असल्यने आपल्याला मैत्री जपण्याच्या दृष्टीकोनातून या दोन देशांना मोदींनी भेट देणे आवश्यक होते. नरेंद्र मोदींचा एकूण 95 तासांचा दौरा होता व त्यात ते 33 तास विमान प्रवासात होते. एकूण चार दिवसांच्या मुक्कामात त्यांनी दोन रात्री विमानात काढल्या. अर्थात पंतप्रधांनाचे दौरे हे अशाच प्रकारचे गर्दीचेच असतात, ती काही पिकनीक नसते. मात्र आता भाजपाचे प्रवक्ते या दौर्‍यातील मोदींच्या वेळ वाचविण्याच्या त्यांच्या गुणाचे कौतूकही करतील. असो. मोदींच्या या अमेरिका दौर्‍यामुळे भारत अमेरिका मैत्रीचे एक नवे पर्व सुरु झाले आहे, असे म्हणता येऊ शकेल. मात्र अमेरिका हा आपला खरोखरीच चांगला दोस्त आहे असे ठामपणाने म्हणता येणार नाही. कारण आजपर्यंत अमेरिकेने अनेकदा आन्तरराष्ट्रीय व्यसपीठावर भारताला ठोस पाठिंबा दिलेला आहे, असे झालेले नाही. अगदी संयुक्त राष्ट्र संघटनेत कायम सदस्याचा प्रश्‍न असो किंवा काश्मिर प्रश्‍नी अमेरिकेचे धोरण हे भारताच्या फायद्याचे कधीच झालेले नाही. अनेक संदर्भात अमेरिकेने पाकिस्तानला पाठिशी घातले आहे. त्याचबरोबर भारताला काही संदर्भात जवळही केले आहे. ज्यावेळी व्यापार, उद्योगाचा, अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या गुंतवणुकीचा प्रश्‍न निर्माण होतो त्यावेळी त्यांना भारताची आठवण येते. अर्थात पाकिस्तानमधील दहतवादी कृत्यांचा ते केवळ निषेध करतात परंतु पाकविरोधात कारवाई करण्यास ते काही धजावत नाहीत. आता सय्यद सलाउद्दीन याला आन्तरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून जाहीर करण्यात आले आहे. मोदींना यात आपण फार मोठे काही कमविले असे वाटेल किंवा पाकला अमेरिका धडा शिकवायला पहात आहे असे वाटेल. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की, यापूर्वीही तीन वर्षापूर्वी हफिस सईद यालाही अमेरिकेने आन्तरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषीत केले होते. मात्र याचे पुढे काय झाले? सईद पाकिस्तानात सुखाने जगत आहे. त्याला अटक करण्याचे नाटक पाक सरकार कधीतरी करते व पुन्हा त्याची जामीनावर सुटका होते. या अतिरेकी भारतविरोधी कारवाया करण्यात आघाडीवर असतो. त्यामुळे आता सलाउद्दीनला अतिरेकी घोषित करुन त्याचा फारसा भारताला फायदा होईल असे नाही. आपल्यादृष्टीने आणखी एक महत्वाचा विषय होता व तो म्हणजे, एच.1 बी व्हिसा चा प्रश्‍न. या व्हिसावर अनेक भारतीय अभियंते सध्या अमेरिकेत नोकर्‍या करीत आहेत. त्यांची संख्या कमी करण्याचा ट्रम्प प्रशासनाचा इरादा आहे. त्याविषयी पंतप्रधान मोदी फारसे काही बोलले नाहीत. खरे तर हा प्रश्‍न ते आपल्या या दौर्‍यात धसास लावतील अशी अपेक्षा होती. परंतु या संदर्भात मोदींनी मौनच बाळगले आहे. कारण हे अभियंते अमेरिकेत बेकार होऊन भारतात आल्यास त्यांना रोजगार देण्याची वेळ भारतावर येणार आहे. त्यांना रोजगार देण्याची स्थिती सध्यातरी आपली नाही. अमेरिकेबरोबर आपला सध्या एकूण व्यापार 165 कोटी डॉलरचा आहे. हा व्यापार 200 कोटी डॉलरवर नेण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. मात्र हा व्यापार सध्या अमेरिकेच्या फायद्याचा आहे. कारण भारताची निर्यात कमी व आयात जास्त अशी स्थीती आहे. भारताची निर्यात वाढविण्याची आवश्यकता आहे. कारण अमेरिकेशी निर्यात वाढली तर त्याचा आपल्याला खरा फायदा होऊ शकतो. या भेटीत त्यासंदर्भात काहीच पावले टाकण्यात आलेली नाहीत. अमेरिकेशी मैत्री वाढवून आपण आपला शेजारी असलेल्या चीनशी अप्रत्यक्षपणे शत्रुत्व वाढवून घेत आहोत. यातून आपल्या भागात दक्षिण आशियाई भागात अस्थितरता येऊ शकते. आज आपण चीनशी तुलना करुच शकत नाही. कारण आपल्यापेक्षा चीन बराच पुढे गेला आहे, हे वास्तव जगाने देखील मान्य केले आहे. मोदी सरकार मात्र हे मान्य करावयास तयार नाही. चीनशी आपले युध्द झालेले आहे हे मान्य अशले तरी एक उभरती जागतिक शक्ती व आपला शेजारी यादृष्टीने त्याच्याशी चांगले संबंध आपण ठेवले पाहिजेत. अमेरिका भारताला वापर आहे, हे चीनचे म्हणणे काही चुकीचे नाही. याचा वाईट परिणाम असा होणार आहे की, चीनच्या जवळ पाकिस्तान व नेपाळ हे देश जाऊ लागले आहेत व आपल्याला ते धोकादायक ठरणार आहे. ट्रम्प यांनी मोदींवर स्तुतीसुमने उधळल्याने मोदीभक्त आणखी अमेरिकेच्या जवळ जात आहेत. मात्र अमेरिकेवर आपण पूर्णत: विश्‍वास ठेऊ शकत नाही. ट्रम्प हे बेभरवशाचे नेते आहेत. त्यांना कशाचेही देणे घेणे नाही. त्यांच्याकडे कोणतीही ठोस विचारधारा नाही. अशा स्थितीत ते भारताला कधीही एकाकी पाडू शकतात किंवा कधीही मागेही उभे राहू शकतात. भारताने मेड इंडिया अंतर्गत मोठी अमेरिकन गुंतवणूक येईल अशी अपेक्षा व्य्क्त केली होती. परंतु मोदींच्या या दौर्‍यात तरी फारसे काही पदरी पडलेले नाही. सध्या अमेरिकन भांडवलशाही धोक्यात आहे, ती भारताच्या मदतीला कुठे धावून येणार असा प्रश्‍न आहे.
-----------------------------------------------------------

0 Response to "अमेरिका भेटीचे फलित"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel