-->
दमदार सुरुवात

दमदार सुरुवात

बुधवार दि. 28 जून 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
दमदार सुरुवात
गेल्या चोवीस तासात कोकणात पावसाने जोरदार मुसंडी मारली असून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. खेड, चिपळूण या ठिकाणी सोमवारी आलेला पूर आता ओसरु लागला आहे. मात्र पावसाची दमदार झालेली सुरुवात अजूनही कायम आहे. येत्या चोवीस तासात पावसाचा जोर कायम राहिल असा अंदाज आहे. यंदा हवामानखात्याने जाहीर केलेल्या अंदाजानुसार, जूनच्या अखेरीस पावसाला जोर येईल, हे खरे ठरले आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाने आपले आगमन झाल्याचा इशारा दिल्यावर जवळपास तीन आठवडे विश्रांती घेतली होती. त्यावेळी पेरणी केल्याने शेतकरी चिंतातूर झाला होता. मात्र आता पावसाने दमदार सुरुवात केल्याने शेतीच्या कामाला वेग आला आहे. अनेक ठिकाणी पेरणीची कामे पूर्ण झाली असून पावसाने वेळीच संततधार दिल्याने शेती आता बहरली आहे. अशा स्थितीत काही ठिकाणी पूर तर काही ठिकाणी पुरेसा पाऊस असे चित्र आहे. एकूण जून महिन्याचा कोटा जवळपास पावसाने पूर्ण केला आहे. मात्र हा पाऊस पुरेसा नाही. निदान सध्याची सुरुवात तरी चांगली झाली आहे असे म्हणता येईल. रायगड जिल्ह्यत सोमवारी सरासरी 93 मिलीमिटर पावसाची नोंद झाली होती. मुरुड, अलिबाग, उरण, तळा, माणगाव, रोहा आणि सुधागड तालुक्यांना संततधार पावसाने झोडपुन काढलेे. पावसाच्या पुर्नआगमनाने शेतकर्‍यांना पुरेसा दिलासा मिळाला आहे. जून महिन्यातील अनियमित पावसामुळे भात शेती धोक्यात येईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत होता. मात्र शनिवार संध्याकाळपासून कोकण किनारपट्टीवर पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आणि शेतकर्‍याचा जीव भांड्यात पडला. कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या किनारपट्टीच्या जिल्ह्यात सलग दोन दिवस चांगल्या पावसाची नोंद होत आहे. रविवारपासून सुरु झालेला हा पाऊस मंगळवारी देखील सुरुच होता. त्यामुळे सखल भागात पाणी साचणे, विद्युत पुरवठा खंडीत होणे, वृक्ष उन्मळून पडणे यासारख्या घटना घडल्या. मुंबई-गोवा महामार्गातही काही ठिकाणी किरकोळ प्रमाणात अडथळे निर्माण झाले. ईदची सुट्टी या आठवड्यात जोडून आल्याने कोणात आलेल्या पर्यटकांना पावसाचा आनंद लुटता आला. संततधार पावसामुळे कोकणातील तीन जिल्ह्यात जनजिवन विस्कळीत झाले आहे. मुरुड येथे सर्वाधिक 208 मिमी पावसाची नोंद झाली, तर तळा येथे 140 मिमी आणि अलिबाग येथे 133 मिमी पाऊस पडला. तर महाड येथे सर्वात कमी पावसाची नोंद झाली येथे 43 मिमी पाऊस पडला. रायगड जिल्ह्यात जुन महिन्यात सरासरी 643 मिमी पाऊस पडत असतो. यातुलनेत यावर्षी 471 मिमी पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण जून महिन्याच्या सरासरी पावसाच्या तुलनेत 73 टक्के येवढे आहे. दोन दिवस सुरु असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला. पावसाआभावी रेंगाळलेली शेतीची काम पुन्हा एकदा जोरात सुरु झाली आहते. अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिल की काय असे वाटत होते. मात्र हे संकट आता टळले आहेे. गेल्या आठवड्यात पावसाने अपेक्षित दिलासा न दिल्याने पाण्याआभावी भाताची रोपे करपण्याची भिती व्यक्त केली जात होती. मात्र पावसाच्या दमदार आगमनामुळे या रोपांना जिवदान मिळाले आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीत काही प्रमाणात वाढ झाली होती. मात्र आंबा, कुंडलिका, सावित्री, पाताळगंगा आणि भोगावती या नद्या धोक्याच्या पातळी खालीच वाहत असल्याचे आपत्ती निवारण कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले. येत्या चार दिवसात कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून बहुतांश ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळ्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणाप्रमाणे मुंबईसह ठाणे जिल्ह्यातही सोमवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे मुंबईकरांना चांगलाच दिलासा मिळाला. मात्र मुंबईकरांना एकीकडे पावसामुळे दिलासा मिळाला असताना त्यांच्या आयुष्यातील हाल काही संपत नाहीत. पहिल्याच पावसात उपनगरीय रेल्वे वाहतूक आता मंदावली आहे. पहिल्याच पावसात उपनगरीय वाहतूक कोसळल्याने मुंबईकरांना पुढील तीन महिन्यात फार वाईट परिस्थीचा सामना करावा लागणार असेच दिसत आहे. सोमवारी सार्वजनिक सुट्टी आल्याने फारसा परिणाम झाला नाही. मात्र मंगळवारी पश्‍चिम व मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत असल्याने चाकरमन्यांना वाईट काळाचा सामना करावा लागला आहे. मुंबई, उपनगर, ठाण्यासह राज्यभरात सोमवारी रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसाचा पहिला फटका मध्य रेल्वेला बसला. कुर्ला- सायनदरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने लोकल गाड्या खोळंबल्या. कुर्ला स्थानकाजवळ सीएसटीकडे जाणार्‍या धीम्या मार्गावर गाड्या खोळंबल्याने काही प्रवाशांनी ट्रॅकवरुन चालत स्टेशन गाठले. मुसळधार पावसामुळे रस्त्यांवरही ठिकठिकाणी पाणी साचले होते. दादर, हिंदमाता या भागांमध्ये रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक मंदावली होती. मुंबईच्या अन्य भागांमध्येही पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले. दरम्यान, पावसाच्या आगमनानंतर पुन्हा एकदा मुंबईत ठिकठिकाणी पाणी तुंबल्याने महापालिकेच्या कामावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहेत. मुंबईसारखे महानगर किती नियोजनशून्य आहे व महानगरपालिकेचे प्रशासन किती ढिम्म आहे, याचा अनुभव या निमित्ताने पहावयास मिळाला. गेल्या तीन दिवसातील पावसाने शेतकरी राजा मात्र आता सुखावला आहे. असाच चांगला पाऊस यावेळी पडो अशी इच्छा तो व्यक्त करीत आहे.
-----------------------------------------------------------

0 Response to "दमदार सुरुवात"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel