-->
संपादकीय पान सोमवार दि. २६ मे २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------
क्रिकेटचे पितामह काळाच्या तंबूत परतले
----------------------------------
क्रिकेटचे पितामह माधव मंत्री यांचे वयाच्या ९२व्या वर्षी निधन झाले. या वयात देखील शेवटपर्यंत ते क्रिकेटच्या खेळात सक्रिय होते. अजूनही मुंबईत कोणताही सामना असला तरी ते चुकवत नसत. याची जाणीव त्यांचा भाचा असलेल्या सुनिल गावस्करांनाच नव्हती तर तमाम क्रिकेटपटूंना होती. त्यांची ओळख आम जनतेला आहे ती क्रिकेटमुळे. मात्र क्रिकेटच्या जोडीने ते बँकिंग प्रामुख्याने सहकारी बँकिंगमध्ये ते प्रदीर्घ काळ सक्रिय होते. देशाची आघाडीच्या सहकारी क्षेत्रातील असलेल्या सारस्वत सहकारी बँकेची खरी झपाट्याने वाटचाल ही त्यांच्या अध्यक्षपदाची कारकिर्दीत झाली. त्याचबरोबर त्यांनी इंडियन एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेचे काम सचोटीने केले. त्यांचे एक वैशिष्ट्य असे की ते ज्या सामाजिक संस्थांशी निगडीत राहिले ती संस्था त्यांनी आपुलकिनी वाढविली आणि तिला एक नवे परिमाण आखून दिले. क्रिकेटमधील कसोटीतील पदापर्णही एक मोठे नाट्यमय होते. इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण करणार्‍या या अष्टपैलू खेळाडूच्या काळात सलामीच्या जागेसाठी आणि यष्टिरक्षकाच्या जागेसाठीही प्रचंड स्पर्धा होती. त्यामुळे लॉर्ड्स कसोटीत ३ झेल व ३ यष्टिचीत असे ६ बळी एका डावात नावावर लागल्यानंतरही त्यांच्या वाट्याला अवघे चारच कसोटी सामने आले. मात्र स्थानिक क्रिकेट हंगाम त्यांनी सतत गाजवला. मुंबईच्या ४० रणजी विजेतेपदांपैकी तीन विजेतेपदे त्यांनी आपल्या नेतृत्वात मिळवून दिली आहेत. क्रिकेटमधील मैदानावरची त्यांची पहिली इनिंग फारशी गाजली नाही. मात्र निवृत्तीनंतरच्या क्रिकेटच्या दुसर्‍या इनिंगमध्ये त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. शिस्तप्रिय असलेल्या माधवरावांनी प्रशिक्षक, प्रशासक, क्रिकेट व्यवस्थापक म्हणून आपली वेगळीच छाप पाडली. वक्तशीरपणासाठी ते प्रसिद्ध होते. शिस्तीचा बडगा प्रत्येक क्रिकेटपटूने अनुभवला आहे. १९६४ ते १९६८ या चार वर्षांच्या कालावधीत त्यांनी राष्ट्रीय निवड समितीवर काम केले. त्यांनी त्या वेळी स्थानिक क्रिकेटच्या चौकटीबाहेरून आलेल्या अजित वाडेकरांना भारतीय संघात प्रवेश मिळवून दिला होता. त्याकरिता त्यांनी कर्णधार पतौडींचे वाडेकर यांना संघात घेण्याबाबत मन वळवले होते. भारतीय संघात अजित वाडेकरांचा अगदी अखेरच्या क्षणी समावेश होऊ शकला होता. आपला दावा मांडताना प्रत्येक खेळाडूची कुंडली त्यांच्याकडे तयार असायची. त्या काळात संगणकही नव्हते व क्रिकेटचे आकडेशास्त्रीही नव्हते. अशा वेळी केवळ स्मरणशक्ती आणि आकलनशक्तीच्या बळावर निवड समितीमध्ये ते मुंबईच्या अनेक खेळाडूंची बाजू समर्थपणे मांडायचे. त्यामुळेच त्या काळात भारतीय संघात मुंबईकर खेळाडूंची गर्दी कायम दिसायची. माधवरावांचा दरारा मोठा होता आणि त्याला शिस्तीची जोड होती. स्वत: शिस्त पाळायचे आणि इतरांनाही पाळायचा आग्रह धरायचे. त्यांच्या सरावाला उशिरा येण्याचे धाडस कुणीही करायचे नाही. संघ व्यवस्थापक असताना कुणीही उशीर करायचा नाही.  एक कप्तान म्हणून ते खडूस म्हणून ओळखले गेले होतेे. प्रतिस्पर्धी खेळाडूंचे कच्चे दुवे, चुका ते चटकन ओळखायचे. त्यामुळे डावपेचही पटकन लढवता यायचे. त्यांच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या भारताच्या महान कसोटीपटूंनीही त्यांच्यासारखा कप्तान झाला नाही, होणार नाही असे म्हटले होते. मुंबई क्रिकेटच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसलेले ते अखेरचे क्रिकेटपटू. त्यानंतर ही खुर्ची राजकारण्यांनीच बळकाविली. प्रशासन व्यवस्था व यंत्रणा राबवण्यातही ते वाक बगार होते. आज क्रि केटमध्ये बोकाळलेला भ्रष्टाचार पाहून त्यांना वाईट वाटायचे. त्यांच्या काळात मुंबई क्रिकेट असोसिएशनचा कारभारदेखील पारदर्शी, साफ-स्वच्छ असा होता. त्यांच्या निधनामुळे एक सच्चा, प्रामाणिक, कठोर शिस्तीचा क्रिकेट प्रशासकही हरपला आहे. त्याच बरोबर विविध सामाजिक संस्थांना हातभार लावणारा व सहकारी बँकिंग क्षेत्रातील एक नामवंत व्यक्ती त्यांच्या निधनामुळे काळाच्या अखेरच्या तंबूत परतली आहे.
-------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel