-->
संपादकीय पान शुक्रवार दि. २३ मे २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------
केजरीवाल नाटक कंपनी
-------------------------
आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांची आप नाटक कंपनी आता निवडणुकांनंतर पुन्हा सक्रिय झाली आहे. निवडणुकांच्या काळात त्यांचा फाजिल आत्मविश्‍वास जनतेने धुडकावून लावला आणि आपने जी ४० जागा मिळविण्याची मस्तीत घोषणा केली होती ती संख्या केवळ चार सदस्यांवर आली. यानंतरही अरविंद केजरीवाल यांचे पाय जमिनीला टेकतील असे वाटले होते. परंतु तसे काही होईल असे दिसत नाही. केजरीवाल हे आपल्याच मस्तीत असेच जगणार असे दिसते आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन लोकसभा निवडणुकीत उतरलेल्या आम आदमी पक्षाचा मोदी लाटेत धुव्वा उडाला. त्यामुळे अस्वस्थ झालेले पक्षाचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा राजकीय डावपेच खेळण्यास प्रारंभ केला. भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या मानहानी प्रकरणात आर्थिक दंड भरून जामीन मिळवण्याऐवजी केजरीवाल यांनी न्यायालयीन कोठडीचा पर्याय निवडला. दोन दिवसांपूर्वी दहा हजार रुपये जातमुचलका भरण्याची तयारी केजरीवाल यांनी दाखवली होती, मात्र बुधवारी ऐन वेळी ही रक्कम भरण्यास नकार दिल्याने महानगर न्यायदंडाधिकार्‍यांनी दोन दिवसांसाठी त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. कोणतेही सबळ पुरावे नसताना नितिन गडकरी यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्याविरोधात गडकरी यांनी न्यायालयात दाद मागितली होती. केजरीवाल यांनी आता या प्रकरणी आपण हिरो कशे होऊ व यातून आपली गेलेली पत कसी पुन्हा येईल हे पाहाण्यासाठीच कोठडीत राहाण्याचा पर्याय स्वीकारला आहे. आजवर केजरीवाल यांनी विविध नाटके करुन जनतेच्या प्रश्‍नावर आपण लढत आहोत असे भासवित लोकांची मने जिकली होती. परंतु त्यांनी ज्या गतीने लोकांची मने जिंकली त्याहून जास्त गतीने त्यांची लोकप्रियता लयाला गेली आहे. याचे कारण ते स्वत: आहेत. गेल्या वर्षी झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत २८ जागांवर दणदणीत विजय मिळवून केजरीवाल यांनी कॉंग्रेसचा सफाया केला होता. त्यानंतर सत्ता स्थापन करून अवघ्या ४९ दिवसांत दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन त्यांनी पळ काढला होता. केजरीवाल यांना आता उपरती झाली आहे. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याच निर्णय चुकीचा होता, अशी कबुली देत केजरीवाल यांनी दिल्लीकरांची माफी मागितली. त्यावेळी देखील आपली घसरती लोकप्रियता टिकविण्यासाठी त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. या राजीनाम्याच्या बळावर आपण देशात लोकप्रिय होऊ व लोकसभेत मोठ्या प्रमाणावर जागा पटकावू असा त्यांचा होरा होता. परंतु हा अंदाज साफ चुकला आणि आता केजरीवाल यांची आपल्या पक्षाचे प्रभुत्व कायम टिकविण्यासाठी केविलवाणी धडपड करावी लागत आहे. दिल्ली लोकसभेच्या सातही जागांवर आम आदमी पक्षाचे उमेदवार दुसर्‍या क्रमांकावर आहेत. केजरीवाल यांच्या धरसोड वृत्तीचा फटका पक्षाला बसल्याचे पक्षनेत्यांचे मत आहे. अर्तात हे काही खोटे नाही. केवळ तीन महिन्यातच केजरीवाल यांना दिल्लीत त्यामुळे सपाटून मार खाला लागला. केजरीवाल यांच्या सागंण्यानुसार, राज्यकारभार मध्येच सोडून दिल्याबद्दल दिल्लीकर व देशवासीयांनी मला माफ करावे; परंतु आता आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागलो आहोत. पुन्हा एकदा आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते दिल्लीकरांना आपली भूमिका समजावून सांगतील. आपवर विश्वास ठेवण्याची विनंतीही त्यांनी दिल्लीकरांना केली. नायब राज्यपाल नजीब जंग यांची भेट घेऊन केजरीवाल यांनी विधानसभा विसर्जित करण्याची विनंती केली होती. आम आदमी पक्ष दुसर्‍यांदा सत्ता स्थापन करण्यासाठी जनतेचे मत आजमावणार असल्याचे केजरीवाल म्हणाले होते. परंतु सध्या तरी सरकार स्थापन करण्याचा आपचा इरादा नाही. आम आदमी पक्षाला पुन्हा पाठिबा देणार नसल्याचे कॉंग्रेसने सांगितले आहे. त्यामुळे केजरीवाल यांची पंचाईत झाली आहे. केजरीवाल हे कॉंग्रेससमर्थक असल्याचा आरोप भाजप सातत्याने करीत आहे. अशा परिस्थिीत पुन्हा कॉंग्रेसशी हातमिळवणी केल्यास त्याचा फटका बसेल, अशी भीती आपच्या अन्य नेत्यांना आहे. आप हा पक्ष भ्रष्टाचार विरोधी चळवळीतून जन्मला. त्यामुळे लोकांच्या प्रामुख्याने तरुण पिढीच्या त्यांच्याबाबतीत अपेक्षा जास्त होत्या. मात्र आपने या अपेक्षांचा भंगच केला. त्यामुळे दिल्लीतील जनतेने लोकसभेच्या निवडणुकीत आपला बाजूला सारुन भाजपाला पुन्हा एकदा हात दिला. यामुळे केजरीवाल यांची पाचावर धारण बसली आहे. कारण हाती आलेली दिल्लीतली सत्ताही गेली आणि लोकसभेतही कामगिरी निराशाजनक झाली. त्यामुळे पुन्हा एकदा मागची गणिते जुळवून दिल्लीतली सत्ता पुन्हा मिळते का ते त्यांनी तपासले. परंतु ही गणिते जुळण्याची शक्यता नसल्याने व यावेळी कॉँग्रेसने स्पष्ट शब्दात पाठिंबा न देण्याचे जाहीर केल्याने दिल्लीत निवडणुका घेण्याचे केजरीवाल सुचवित आहेत. आता पुन्हा निवडणुका झाल्यास जनता केजरीवाल यांच्या नाटक कंपनीवर कितपत विश्‍वास ठेेवील याची शंका वाटते. कारण जनतेने एकदा दिलेली सत्तेची सुवर्णसंधी तुम्ही लाथाडल्याने जनतेच्या कौलाचा तुम्ही अपमान केला आहे. त्यामुळे यावेळी दिल्लीतील जनतेने आपच्या बाजूने कौल न दिल्यास केजरीवाल यांच्यावर पुन्हा आपली एन.जी.ओ. चालविण्याची पाळी येणार आहे. अर्थात भ्रष्टाचार विरोधी चळवळीचे नाटक हे रंगविण्याचे काम ते करतीलच आणि हे नाटक चालविण्यासाठी विदेशातून पैसाही घेतील. परंतु येथील जनतेचा त्यांच्यावरील विश्‍वास पुन्हा संपादन होणे कठीण आहे.
----------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel