-->
नवीन वर्षाचे स्वागत

नवीन वर्षाचे स्वागत

गुरुवार दि. 02 जानेवारी 2020 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
नवीन वर्षाचे स्वागत
नवीन वर्षाचे म्हणजे 2020 चे स्वागत दरवर्षी प्रमाणे ययंदाही जगभरात मोठ्या जल्लोषात झाले आहे. गेले वर्षे हे विविध राजकीय, आर्थिक, सामाजिक घटनांनी ठासून भरलेले होते. याच घटना आता चालू वर्षातही आपल्या भोवती पडछायेप्रमाणे राहाणार आहेत. नव्या सहस्रकातील विसाव्या वर्षात आता पदार्पण झाले आहे. जग झपाट्याने बदलत आहे. आपणही बदलत आहोत हे सत्य आहे. स्वातंत्र्यानंतर आपण आता सात दशके पाहिली, या काळात विकास झालाच नाही असे बोलता येणार नाही. परंतु आपल्याकडील लोकसंख्या व आर्थिक विषमतेची दरी पाहता विकासाची फळे सर्वांपर्यंत पोहोचत नाहीत हे वास्तव आहे. गेल्या सहा वर्षापूर्वी सत्तेत आलेले नरेंद्र मोदी असोत की त्यांचे सर्वात विश्‍वासू सहकारी अमित शहा हे दोघे स्वातंत्र्यानंतर जन्मलेले पहिले पंतप्रधान व गृहमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्यावर इतिहासाचे ओझे वाहून नेण्याचे नैतिक बंधन नाही. त्यांचे निर्णय पाहता हे तर स्पष्टपणे जाणवते. देशात बदल झाले पाहिजेत हे खरे असेल तरी आपल्या देशाचा इतिहास, आपली घटना याच्याशी सुसंगत बदल व्हावेत हे फार महत्वाचे आहे. भाजपाच्या राज्यकर्त्यांनी आपला देश 2020 साली जागतिक महासत्ता करण्याची भीष्म प्रतिज्ञा केली होती. अर्थातच मोठी स्वप्ने बघणे केव्हाही चांगले, परंतु सत्यात उतरणारी स्वप्ने पाहणे आवश्यक असते, अन्यथा शेखचिल्लीच्या गोष्टीसारखे आपले होण्याची भीती असते. आज आपण महासत्ता सोडा परंतु त्यांच्या जवळपासही पोहोचलेलो नाही, हे वास्तव आहे. उलट आपली अर्थव्यवस्ता सात टक्क्यांवरुन साडे चार टक्क्यांवर खाली घसरली आहे. आज भारतीय उपखंडावर अमेरिका, रशिया, चीन, जपान अशा महासत्तांचा प्रभाव आहे व तो राहाणार आहे. सूर्य मावळतीला गेलेल्या गेल्या वर्षाने काय दिले आणि यात आपण काय गमावले याचा विचार प्रत्येकाच्या मनात रूंजी घालत असेल. आजच्या चाक रूतून बसलेल्या अवस्थेत तर ती प्रकर्षाने जाणवते आहे. भविष्याकडे आपली नजर जरुर आहे परंतु सध्याच्या युगात आपण अजूनही जाती-धर्माच्या चौकटीत अडून बसलो आहोत. भारताच्या मानगुटीवरून जी भुते उतरणे नव्या सहस्रकात अपेक्षित होते पण, ती नव्याने नाचू लागली आहेत. गेल्या शतकाच्या अंतिम पर्वात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासारख्या द्रष्टया व्यक्तीने भारताला मिशन 2020चा विचार दिला. या ध्येयाच्या भोवती विचारांचे अनेक धागे त्यांनी गुंफले होते. भारत महासत्ता बनणार म्हणजे तो नक्की काय बनणार? याचा एक स्वदेशी विचार त्यांनी भारतीयांसमोर ठेवला होता. परंतु आपल्या राज्यकर्त्यांना हा विचार प्रत्यक्षात उतरविता आला नाही, हे आपले दुर्दैव. कोणावरही आक्रमण करणारी नव्हे तर सर्वांना सामावून घेणारी एक शक्ती म्हणजे महासत्ता म्हणून भारताने पुढे यावे हा त्यांचा  विचार होता. मात्र अजूनही वेळ गेलेली नाही आपण पुढील ध्येय डोळ्यापुडे ठेवून 2030 चा आराखडा आज आखू शकतो व त्यादृष्टीने पुढे जाऊ शकतो. जर आपल्याला आक्रमकपणे पुढे वाटचाल करावयाची असेल तर आपल्याला देशातील तरुणांच्या हाताला काम दिले पाहिजे. केवळ औद्योगिक क्षेत्रावर भरवसा ठेऊन रोजगार निर्मीती करता येणार नाही. तर कृषी क्षेत्रात मोठा रोजगार दडलेला आहे, तो ओळखून त्यादृष्टीने वाटचाल करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक खेडेगाव हा स्वयंपूर्ण झाला पाहिजे, प्रत्येक गावात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. वीज, पाणी, रस्ते, इंटरनेट या सर्व सुविधा गावपातळीपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. कृषी उत्पादन ापण दुपटीने वाढविले पाहिजे. केवळ देशालाच नव्हे तर जगाचे पोट भरण्याची क्षमता आपल्या कृषी क्षेत्रात आहे. एवढी मुबलक जमीन आपल्याकडे आहे, मुबलक रोजगार आहे, सर्वात तरुणांचा देश म्हणून आपली ओळख आहे. फक्त आपल्याला ही तरुणाई जागृत करुन त्यांना योग्य दिशा देऊन नव्याने देश निर्मितीचे स्वप्न उराशी बाळगले पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला शिक्षण, सामाजिक सुरक्षा आणि आरोग्याच्या प्रश्‍नावर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. देशात शंभर टक्के साक्षर व्हावा, त्याची सामाजिक सुरक्षितता धोक्यात येऊ नये आणि स्वास्थ्य उत्तम रहावे, आरोग्यपूर्ण जीवनप्रणाली निर्माण करावी आणि औषधोपचाराअभावी कोणाचा मृत्यू होऊ नये, हे पाहणे आवश्य्क आहे. देशप्रेम म्हणजे केवळ राष्ट्रगीत म्हणणे नसावे तर या देशासाठी आपले काही ना काही तरी योगदान असले पाहिजे. भष्टाचार न करणे हे एक मोठे देशप्रेम ठरु शकते. देशातील भ्रष्टाचार मिटल्यास आपण जगात कितीतरी पुढे जाऊ शकतो. लोकांना सामाजिक सुरक्षितता, चांगले शिक्षण, चांगले आरोग्य व रोजगार मिळल्यास हा देश सुजलाम सुफलाम होण्यास मोठा हातभार लागेल. यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन राष्टप्रेमासाठी व देशसेवेसाठी पक्षहित बाजूला ठेऊन झटले पाहिजे. आपल्याकडे ही राजकीय परिपक्वता राजकीय पक्ष दाखवतील का हा सवाल आहे. गेले ते संपले आता नव्याने नवीन वर्षात आपण नवे पान उलगडूया असा सध्या विचार ठेऊन कामाला लागणे गरजेच आहे.
---------------------------------------------------------

0 Response to "नवीन वर्षाचे स्वागत"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel