-->
संपादकीय पान गुरुवार दि. ९ ऑक्टोबर २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
मतांचा मोदींकडून जोगवा
------------------------------------------
सध्याच्या निवडणुकीत भाजपा एकाकी पडू लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले दिल्लीतील काम बाजूला ठेवून सक्रियपणे राज्याच्या प्रचारात उडी घेतली आहे. सध्या पाकिस्तानच्या सीमेवर तुफानी गोळीबार सुरु आहे व निष्पाप नागरिक मारले जात आहेत. अशा वेळी पंतप्रधानांनी राजधानी दिल्लीत राहावे व देशातील हालाचालींवर बारीक नजर ठेवावी अशी अपेक्षा असते. परंतु मोदी मात्र पक्षाच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे उंबरठे झिजवत आहेत. विरोधात असताना हाच भाजपा तत्कालीन सरकारवर पाकच्या हल्यासंबंधी लक्ष्य करीत असे. आमचे सरकार असते तर आमच्या ५ नागरिकांना मारले तर आम्ही ५० मारुन बदला घेतला असता अशी भाषा त्यावेळी भाजपा व मोदींची होती. आता सत्ता आल्यावर पाकिस्तान हल्ले करीत असताना भाजपा व मोदी गप्प का. केवळ गप्प नव्हे तर पंतप्रधान आपल्या पक्षासाठी मतांचा जोगवा मागताना हिंडत आहेत. भाजपने ज्या पद्धतीने युती तोडली ती पाहता शिवसेनेचा राग उफाळून येणार हे सांगण्यासाठी ज्योतिष्याची गरज नव्हती. गेली काही वर्षे सेना थंड पडली होती. सामनातून वाघाच्या डरकाळ्या अधूनमधून उठत. या डरकाळीने १८ टक्क्यांहून अधिक मते कधीही मिळवली नसली, तरी ही डरकाळी लोकप्रिय होती व मराठी मनाला त्याचा आधार वाटे. शिवसेनेचे मतदार कमी असले, तरी सेनेबद्दल आस्था असणारे बहुसंख्य आहेत. या आस्थेपोटीच मोदी लाटेमध्ये शिवसेनेचीही मते वाढली. मात्र दोन्ही पक्षांच्या कर्मदरिद्री हटवादीपणामुळे युती तुटली. युती तुटण्याचा लगोलग झालेला परिणाम म्हणजे शिवसेनेमध्ये पुन्हा त्वेष आला. पक्षातील मरगळ गेली. उद्धव ठाकरेंना जे जमले नव्हते ते परिस्थितीने घडवून आणले व सेना ही सेना आक्रमक पणे बोलू लागली. ही निवडणूक म्हणजे महाराष्ट्राच्या अस्तित्वावर घाला असल्याची हाळी दिली. हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास हिरावून घेणारा भारतीय जनता पक्ष सेनेच्या निशाण्यावर आला. सेनेच्या हल्ल्‌यातून कॉंग्रेस व राष्ट्रवादीची सुटका झाली व प्रत्येक सभेत ठाकरे आता मोदींना टार्गेट करीत आहेत. भाजपला अडचणीत आणण्यासाठी सेनेने ठेवणीतील हत्यार उपसले. मुंबई हातातून जाणार अशी नुसती आवई उठली, तरी मराठी माणूस कासावीस होतो. शिवसेनेने आवईचे रूपांतर घोषणेत केले. अशीच आवई उठवून कॉंग्रेसने एकेकाळी शिवसेनेला मुंबईत जीवदान दिले होते. ती आठवण ठेवून कॉंग्रेस व राष्ट्रवादीने त्यामध्ये सूर मिळवला. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे जेरीस आलेल्या या दोन पक्षांसमोर मतदारांचे लक्ष दुसरीकडे नेण्याची सुवर्णसंधीच चालून आली. आवईचे रूपांतर हळूहळू लाटेत होत भाजप त्यामध्ये सापडला. भाजपचे राज्यातील नेतेही इतके शामळू की वेगळा सूर लावण्याची हिंमत त्यांनी दाखवली नाही. अमित शहांना नमवण्याची ताकद यांच्यात आहे, हे स्थानिक नेत्यांच्या वागण्या-बोलण्यातून जाणवले नाही. शेवटी या प्रचाराला उत्तर देण्याची वेळ स्वत: मोदींवर आली. मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची हिंमत कोणी दाखवू शकत नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली; पण त्यामुळे वातावरणात बदल होणार नाही. राज्यातून मुंबई वेगळी काढणार नाही असे आश्‍वासन दिले असले तरी भाजपा मात्र विदर्भ वेगळे राजय करण्यावर ठाम आहे. त्यामुळे भाजपा सत्तेत आल्यास राज्याचे तुकडे पडणार हे नक्की. सध्या निवडणुकीतून राज्याचा विकास, आर्थिक गुंतवणूक, रोजगार असे महत्त्वाचे विषय मागे पडले आहेत. अस्मिता हे कित्येक अश्वशक्तीचे इंजिन असते; पण ते कोणत्या मार्गाने चालवायचे हे माहीत नसले, तर ही शक्ती फुकट जाते. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रात वारंवार असे घडले आहे. मुंबई जाणार म्हणताच कासावीस होण्याची वेळ मराठी माणसावर येते. कारण मुंबईसारखी आणखी दहा शहरे राज्यात उभारण्यात मराठी राज्यकर्त्यांना अपयश आले. अस्मितेची ताकद योग्यरीतीने वापरली असती, तर अशी शहरे उभी राहिली असती. मग रोजगार, विकास हे प्रश्नही वेगळ्या पातळीवर हाताळले गेले असते. अस्मितेची ऊर्जा निर्मितीसाठी वापरली गेली नाही. त्यातून केवळ अहंकार जोपासला गेला. याला सर्व पक्ष जबाबदार आहेत. महाराष्ट्राला अशा अस्मितेची परंपरा होती. परकीय राजवटींना झुगारण्याची हिंमत फक्त याच मातीने दाखवली. मग तो शिवकाल असो वा स्वातंत्र्यलढा असो. देशातील प्रमुख राजकीय व सामाजिक विचारधारांची गंगोत्री हाच प्रदेश आहे. नरेंद्र मोदी एकीकडे मतांचा जोगवा मागीत सध्या राज्यात २५ सभा घेणार आहेत. पंतप्रधानांना राज्यात स्वबळावर भाजपाचे सरकार आणावयाचे आहे. मोदींना महाराष्ट्र का हावा? मुंबई ही देशाची राजधानी आहे आणि मुंबई ज्याच्या ताब्यात तो देशातील खरा राज्यकर्ता असे म्हटले जाते. भाजपाने दिल्लीचे तख्त जरुर जिंकले असले तरी त्यांना आर्थिक नाड्या हातात ठेवण्यासाठी मुंबई पाहिजे आहे. शिवसेनेसोबत युती ठेवली असती तर भाजपाला आपल्या हातात मुंबईची सूत्रे ठेवता आली नसती. मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला असता, अशा स्थितीत भाजपा हा दोन नंबरचा खिलाडी ठरला असता. देशातील भांडवलदारांना आता भाजपा जवळचा वाटू लागला आहे. त्यासाठी त्यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपासाठी थैल्या सोडल्या होत्या. आता विधानसभेला अशाच थैल्या सोडून सत्ता काबीज करावयाची असा डाव आहे. भांडवलदारांचे मुखंड असलेले नरेंद्र मोदी यांना पुढे करुन मुंबईसह महाराष्ट्रात सत्ता काबीज करायला याच उद्योगपतींनी पाठविले आहे. त्यामुळे सध्याची राजसत्तेच्या जबाबदार्‍या बाजूला ठेवून मोदी मतांचा जोगवा मागण्यासाठी दारोदारी हिंडत आहेत.
----------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel