-->
संपादकीय पान शुक्रवार दि. २३ मे २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------
गुजरातमध्ये आनंदी-आनंद
--------------------------
देशाच्या पंतप्रधानपदाची सूत्रे येत्या सोमवारी घेणार्‍या नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमत्रीपदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर अपेक्षेनुसार महसूलमंत्री आनंदीबेन पटेल (वय ७३) यांची बुधवारी निवड करण्यात आली. आनंदीबेन यांच्या रूपाने गुजरातमध्ये प्रथमच महिलराज अवतरले आहे. गुजरात भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आनंदीबेन यांच्या नावाचा प्रस्ताव एकमताने मान्य करण्यात आला. यावेळी नरेंद्र मोदी यांच्यासह त्यांचे निकटचे सहकारी अमित शहा आणि भाजपचे सरचिटणीस थावरचंद गेहलोत उपस्थित होते. आनंदीबेन यांना मुख्यमंत्री करण्यास अमित शहा हे फारसे राजी नव्हते. परंतु नरेंद्र मोदी यांनी आनंदीबेन यांचे नाव आपले वारस म्हणून सुचविल्यावर त्यापुढे अमित शहा विरोध करणे शक्य नव्हते. मोदी यांच्या जवळच्या समजल्या जाणार्‍या आनंदीबाई पटेल या केशूभाई पटेल यांच्या सरकारमध्येही मंत्री होत्या. यावेळी उपस्थितांसमोर भाषण करताना आनंदीबाई पटेल यांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. एका शेतकर्‍याच्या मुलीला मुख्यमंत्रिपद दिल्याबद्दल त्यांनी मोदी यांचे आभार मानले. शिस्तबद्ध, धाडसी आदर्श शिक्षिका असलेल्या आनंदीबेन पटेल यांचा गुजरातच्या मुख्यमंत्रिपदापर्यंतचा प्रवास कष्टाचा आणि प्रामाणिकपणाचा एक आलेखच आहे. अमित शहा हे नरेंद्र मोदी यांचे उजवे हात असतील, तर आनंदीबेन या डावा हात आहेत, या जाणकारांच्या मतातूनच त्यांची नियुक्ती का झाली, त्याचे उत्तर मिळते. केवळ नरेंद्र मोदी यांच्या एकनिष्ठ ही काही आनंदीबेन यांची पूर्ण ओळख नव्हे. गुजरातच्या पहिल्या मुख्यमंत्री होणार्‍या आनंदीबेन यांची अनेक पारितोषिके मिळविलेल्या आदर्श शिक्षिका, शिस्तबद्ध प्रशासक, धाडसी महिला, धडाडीच्या मंत्री अशी ख्याती आहे. १९९२मध्ये पक्षाने त्यांना राज्यसभेची खासदारकी दिली. १९९८मध्ये त्या विधानसभेची निवडणूक जिंकून केशुभाई पटेल यांच्या मंत्रिमंडळात मंत्री झाल्या. मोदी आणि आनंदीबेन यांचा यशाचा आलेख बरोबरच वाढला आहे. त्या पक्षात आल्या तेव्हा मोदी संघाचे प्रचारक होते. प्रचारक या नात्याने त्यांचा राज्याचे नेते व कार्यकर्त्यांशी संपर्क होता. मोदी यांच्याशी त्यांचे संबंध दीर्घकाळापासून कायम आहेत. मोदी मुख्यमंत्री झाल्यानंतर, साहजिकच आनंदीबेन यांना अत्यंत महत्त्वाची खाती दिली आणि लवकरच त्या मोदी यांच्या अत्यंत विश्वासू मंत्री बनल्या. मोदी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी महिला साक्षरतेसह अनेक महत्त्वाकांक्षी योजना, शिक्षण मंत्री म्हणून यशस्वी करून दाखविल्या आहेत. १९८७मध्ये सरदार सरोवरात बुडत असलेल्या दोन मुलींना स्वतःच्या जिवाची पर्वा न करता वाचवण्याचे धाडस आनंदीबेन यांनी दाखवले होते. शिक्षकांच्या नियुक्त्या आणि बदल्यांसाठी त्यांनी घालून दिलेली व्यवस्था राज्यात कौतुकास्पद ठरली. अन्यथा बदल्या आणि बढत्या म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरणच होते. मात्र, स्वतः शिक्षिका म्हणून काम केलेल्या आनंदीबेन यांनी प्रशासनाला चांगला धडा घालून दिला. त्या स्वतः काटकसरी असल्याचा गुजरातला त्यांचा परिचय आहे. राज्यभर अविश्रांत प्रवास करून त्या सरकारी योजनांची, प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करतात. नरेंद्र मोदी जेव्हा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय होते, तेव्हा गुजरातची धुरा आनंदीबेन याच सांभाळत होत्या, त्यामुळे त्याच मोदींची जागा घेतील, अशी अटकळ बांधली जात होती. तीच बुधवारी खरी ठरली. नरेंद्र मोदी यांनी गुजरातचा विकास नेमका कोणता केला हा प्रश्‍न वादातीत असला तरी त्यांनी केलेल्या कामांचे योग्य मार्केटिंग मात्र उत्कृष्टरित्या केले. यातून त्यांनी गुजरात मॉडेल म्हणून देशाला दाखविले आहे. आता हे गुजरात मॉडेल विकासाच्या नव्या शिखऱावर नेण्याची जबाबदारी आता आनंदीबेन यांच्यावर येऊन पडली आहे. आनंदीबेन या स्वच्छ मंत्री म्हणून जशा ओळखल्या जातात तसा त्यांच्या कामाचा वेगही जास्त आहे. झटपट निर्णय घेण्याची त्यांची क्षमता आहे. आपल्या शेजारच्या राज्याच्या या नवीन मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा.
------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel