-->
संपादकीय पानासाठी --चिंतन--२८ ऑक्टोबर २०१३साठी-
--------------------------
राजकारणी आणि क्रिकेटचे नेमके नाते काय? 
---------------------------------
यंदाची मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक गाजली ती शरद पवारांच्या विरोधात गोपीनाथ मुंडे यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरल्याने.
गोपीनाथ मुंडे बीडचे आणि शरद पवार बारामतीचे. महाराष्ट्राच्या या तीन वेगवेगळ्या भागांतून आलेल्या राजकारणी व्यक्तींना मुंबई क्रिकेट असोसिएशनच्याच अध्यक्षपदामध्ये एवढा रस का, असा प्रश्‍न कुणालाही पडेल. अशी कोणती जादू मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीत आहे?की ज्यामुळे हे राजकारणी याकडे आकर्षित होतात?
या प्रश्नाचे योग्य, अचूक आणि उत्तम उत्तर राजकारणीच देऊ शकतात. पक्ष कोणताही असो, सर्व राजकारणी एमसीएच्या अध्यक्षपदाची खुर्ची आपल्याच बिरादरीकडे राहील याची गेली कित्येक वर्षे खबरदारी घेत आहेत. मनोहर जोशींनी अध्यक्षपदाची ८ वर्षे उपभोगल्यानंतर ती खुर्ची अजित वाडेकर या क्रिकेटपटूकडे जाऊ नये यासाठी शरद पवार यांना सर्वतोपरी मदत केली. शरद पवारांनीही दोन वर्षांपूर्वी कायद्याच्या कोंडीत सापडल्यानंतर ही खुर्ची आपले राजकीय प्रतिस्पर्धी विलासराव देशमुख यांना देणे पसंत केले. त्यांनी क्रिकेटपटू व त्यांच्यासोबत ८ वर्षे उपाध्यक्ष म्हणून काम केलेल्या दिलीप वेंगसरकर यांना मदत केली नाही. यापूर्वीच्या अनुभवावरून दिलीप वेंगसरकर निवडणुकीला उभेच राहिले नाहीत. मात्र मुंबई क्रिकेटबाबत फारशी माहिती नसलेले गोपीनाथ मुंडे यांनी त्यांच्याविरुद्ध अध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केली आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
मुंबईच्या क्रिकेटची फारशी कल्पना नसलेल्या मुंबईबाहेरच्या व्यक्ती अध्यक्षपदाची आस धरून असतात. शिवसेना किंवा मनसेसारख्या स्थानिकांच्या हक्कासाठी भांडणार्‍या पक्षांपैकी कुणालाही या संघटनेत रस नसावा याचेच आश्चर्य वाटते. शिवसेनेशी संबंधित असणार्‍या औद्योगिक, शैक्षणिक संस्थांचे मतदार एमसीएमध्ये आहेत. या पक्षाची वैयक्तिक विचारधारा मानणारेही मतदार आहेत. याचाच अर्थ या पक्षांना काही मतांचा पाया आहे, तरीही त्यांनी आतापर्यंत बघ्याची भूमिका घेतली. बारामतीच्या पवारांनी तब्बल १२ वर्षे अध्यक्षपद भूषवले. त्यापैकी दशकाचा कालावधी तरी ते मुंबईचे रहिवासी नव्हते.
एखादा क्रिकेट सामना, खेळाडूची निवृत्ती, क्रिकेट मैदानावरचे वादविवाद, क्रिकेट प्रशासन व्यवस्थेतील उणीदुणी काढण्याचे प्रकार वाढले की या व्यक्तींच्या विधानांना, मतांना महत्त्व प्राप्त होते. वर्तमानपत्रात दररोज नाव छापून येते, वेळप्रसंगी क्रिकेटपटूच्या साथीने छबीही वृत्तपत्रांमध्ये झळकते. टेलिव्हिजन वाहिन्यांवर मुद्रादर्शन होते. विनासायास, बिनखर्चात मिळणारी ही शुद्ध प्रसिद्धी आहे. ते ज्यांना ज्यांना उमगले त्यांनी अशा खुर्च्यांवर विराजमान होण्याचे प्रयत्न केले. क्रिकेट या खेळात जसे आकर्षण आहे, प्रसिद्धी आहे तसाच प्रचंड पैसाही आहे. त्यामुळे अन्य खेळांच्या खुर्च्यांमध्ये फार कुणाला रस नाही. क्रिकेट सामन्यांच्या निमित्ताने सर्व सरकारी अधिकारी, मित्रमंडळी, आप्तस्वकीय यांना खुश करता येते. समाजातील सर्वसामान्यांना दुर्मिळ असणारी तिकिटे तुम्ही असोसिएशनचे उच्चपदस्थ अधिकारी असल्यास सहज मिळू शकतात. त्यामुळे क्रिकेटमधल्या पैशापेक्षाही क्रिकेटच्या ग्लॅमरचेच अधिक आकर्षण राजकारण्यांना असावे असे वाटते. क्रिकेटशी संबंधित मोठमोठ्या योजना, संकल्पना राबवताना मिळणारी प्रसिद्धी अन्य राजकारण्यांपेक्षा अधिक उजवी प्रसिद्धी देऊन जाते.
क्रिकेट प्रशासक किंवा क्रिकेटपटूंच्या कारकीर्दीपेक्षाही राजकारणी व्यक्ती उच्च पदावर असताना त्या संघटनेच्या कार्याचा अधिक उदोउदो झाल्याचे लक्षात येते. क्रिकेटमध्ये पैशाचा महापूर येत असतानाच अनेक घोटाळ्यांची प्रकरणेदेखील घडल्याचे लक्षात येईल. अशा वेळी राजकारणी व्यक्तीचा वरदहस्त असल्यास अनेक घोटाळे पचवण्याची ताकदही या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभी राहू शकते. त्याचबरोबर मुंबईत रस घेणार्‍या राजकारण्यांना आपल्या गावाचाही क्रीडा विकास करण्याची संधी असते. तेथे मोठे स्टेडियम किंवा क्रीडा संकुल किंवा क्रीडा विकासाच्या योजना का राबवल्या जात नाहीत ? आपले कार्यक्षेत्र आणि गाव सोडून अन्यत्र येणार्‍यांना महत्त्व देणारे त्या संस्थांचे मतदारही तेवढेच दोषी आहेत. त्यांनी अशा प्रवृत्तींना खतपाणी घातले आहे.
--------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel