-->
संपादकीय पान--चिंतन--१७ ऑक्टोबर २०१३साठी-
-------------------------
फलिन नंतरच्या आव्हानाचे चक्रीवादळ 
-----------------------
ओडिशा व आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवर आलेल्या फलिन या चक्रीवादळाचा आपण यशस्वी मुकाबला केला. याबद्दल संयुक्तराष्ट्र संघानेही आपले कौतुक केले. हे वादळ येणार याची आपल्याला हवामान खात्याने आगावू सूचना दिली. अर्थात अशाप्रकारे आपल्याला अनेकदा आगावू सूचना मिळतात. परंतु यावेळच्या वादळाचे गांभीर्य ओळखून तातडीने उपाययोजना सुरु करणे हे एक मोठे आव्हान होते. ओडिशा सरकारने ते फार मोठ्या प्रमाणात पेलले. सुमारे दहा लाख लोकांचे स्थलांतर केवळ ४८ तासात करण्याचे आव्हान होते आणि ते यशस्वी करुन दाखविले. वादळासारख्या परिस्थितीत स्थलांतर करावयाचे आहे हे लोकांना पटवून द्यावे लागते. अनेकदा लोकांना याचे गांभीर्य पटलेले नसते. अनेकदा हवामानखात्याची टिंगल करण्याकडे त्यांचा कल असतो. असा स्थितीत सुमारे दहा लाख लोकांचे स्थलांतर करण्यात आले ही एक विक्रमी आणि कौतुकास्पद बाब होती. हे चक्रीवादळ धडकले त्यावेळी त्याचे अक्राळविक्राळ स्वरुप पाहून स्थलांतर करण्याचा निर्णय किती योग्य होता हे पटले. अशा प्रकारचे गेल्या १४ वर्षातले हे सर्वात महाभयंकर असे वादळ होते. या वादळाची सूचना जर गंभीरपणे घेतली गेली नसतो तर लाखो लोकांचे प्राण गेले असते. सुमारे पाच लाख हेक्टर भागातील भाताच्या पिकाची पूर्णपणे हानी झाली आहे. त्यामुळे गरीबांच्या तोंडातला घास निर्सगाने हिसकावून घेतला आहे. अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीचा सामना आपल्याला वर्षातून एखादा तरी करावाच लागतो. कारण आपल्याला साडे सात हजार कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. त्याशिवाय भूकंप, पूर, दुष्काळ अशी येणारी संकटे ही वेगळी. मुंबईत २६ जुलै २००६ साली भयानक पाऊस पडला होता आणि त्यातून मुंबई संपूर्णपणे जलमय झाली होती. त्यावेळी मुंबईचे जनजीवन तीन दिवस ठप्प झाले होते. त्यावेळी मुंबईच्या संरक्षणासाठी व एखादी आपत्ती आल्यास त्याला कसे तोंड द्यायचे याचा आराखडा तयार करण्यात आला. परंतु तो कागदावरच राहिला. ओडिसाने दहा वर्षांपूर्वी असेच वादळ पाहिले होते. मात्र त्यातून धडा घेऊन आपल्यात बदल केले आहेत. त्यामुळेच लाखो लोकांचे प्राण वाचले. आता आपण ओडिसातील चक्रीवादळाचा यशस्वी मुकाबला केला खरा परंतु आता पुढील आव्हानेही मोठी गंभीर आहेत. यातील सर्वात महत्वाचे आव्हान म्हणजे लोकांचे पुनर्वसन करणे. सुमारे अडीज लाख लोकांची घरे त्यांचा संसार रस्त्यावर आला आहे. त्याची पुर्नउभारणी लवकरच करुन देण्याचे आव्हान राज्य सरकारपुढे आहे. त्याचबरोबर सध्या जे नागरिक पूर्णपणे बेघर झाले आहेत त्यांच्या निवासाची व खाण्या-पिण्याची व्यवस्था काही काळासाठी करुन द्यावी लागणार आहे. त्यानंतर त्यांच्या पक्क्या निवासाची व्यवस्था करावी लागेल. तुफान पावसामुळे अनेक भागात रोगराईचे जे साम्राज्य पसरले आहे त्याला अटकाव करावा लागणार आहे. त्यामुळे ठिकठिकाणी आरोग्याची व्यवस्था पहावी लागेल. ओडिसा हे राज्य मागास असल्याने तेथील फार कमी जनतेकडे विमा संरक्षण असेल. त्यामुळे बहुतांशी खर्च हा सरकारलाच उचलावा लागणार आहे. केंद्रानेही सढळ हाताने राज्य सरकारला मदत करण्याची आवश्यकता आहे. अशा कामात पक्षीय राजकारण आणता कामा नये. या वादळामुळे सुमारे तीन हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यातून ओडिसातील सीमावर्ती भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मनुष्यहानी होण्यापासून आपण थांबविली असली तरीही मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुले या भागाचे पुर्नवसन करणे हे एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. चक्रिवादळापे७ा हे आव्हान मोठे आहे.
------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel