-->
संपादकीय पान बुधवार दि. ०३ डिसेंबर २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
कोकणचे भाग्यविधाते
कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांच्या निधनाने केवळ कोकणानेच नव्हे तर राज्याने एक धडाडीचा नेता गमावला आहे. गेले काही दिवस ते मुंबईच्या ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल होते. मात्र मंगळवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. वृध्दापकाळामुळे गेले काही वर्षेे ते राजकारणात सक्रिय नव्हते. मात्र त्यांचे प्रत्येक राजकीय घडामोडींकडे बारकाईने लक्ष असे. कॉँग्रेस पक्ष जिकडे चुकत असेल त्यावेळी ते आपुलकीने व वडिलकीच्या नात्याने ती चूक स्पष्टपणे दाखवून देत असत. यातून अनेकदा त्यांच्यावर पक्ष नेतृत्वाकडून रोषही व्यक्त केला जात असे. मात्र अंतुलेंवर कारवाई करणे पक्षास कठीण जाई. त्यांचा मुळातच स्पष्टवक्ता असलेला स्वभाव त्यांनी शेवटपर्यंत सोडला नाही. यामुळे त्यांचे अनेकदा नुकसानही झाले परंतु त्यांनी त्याची कधीच पर्वा केली नाही. १९६२ साली त्यांचा विधानसभेत पहिल्यांदा विजय झाला. त्यानंतर त्यांनी अनेक वेळा विजय आणि पराभव चाखला. पराभवानंतर ते कधी खचलेले दिसले नाहीत. लंडनमध्ये बॅरिस्टरची पदवी घेण्यासाठी ते गेले असताना त्यावेळी तिकडे इंग्लंडच्या राणीचा राज्याभिषेकाला उपस्थित राहाण्यासाठी जवाहरलाल नेहरु व इंदिरा गांधी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी इंदिराजींना पत्र लिहून इंग्लंडमध्ये भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. इंदिराजींनी त्यांच्या विनंतीला मान देऊन भेट दिली आणि अंतुलेंनी त्या भेटीतच त्यांना आपण बॅररिस्टर झाल्यावर राजकारणात पडणार असल्याचे सांगितले. इंदिराजींच्या डोक्यात ही बाब पूर्णपणे बसली. त्यानंतर खरोखरीच अंतुले मायदेशी परतल्यावर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. पहिलीच निवडणूक ते हरले. मात्र त्यांनी राजकारणात स्थिर होण्याची जिद्द काही सोडली नाही. इंदिरा गांधीवर पूर्ण विश्‍वास व्यक्त केलेला असल्याने व त्यांच्या चरणी आपली निष्ठा वाहिलेली असल्याने इंदिरा गांधींच्या चांगल्या काळात व त्यांच्या पडत्या काळातही ते त्यांच्या बरोबरच राहिले. कॉँग्रेसच्या फुटीनंतर इंदिरा गांधींच्या बाजुने ठामपणे उभे राहिले. त्यांचे त्यांना फळ पुढे मिळाले आणि मुख्यमंत्रीपदी त्यांची वर्णी लागली. त्याकाळी राज्यात कॉँग्रेसला स्पष्ट बहुमत असे व इंदिरा गांधी सांगतील तोच मुख्यमंत्री असे. त्याकाळी कॉँग्रेस पक्षात मराठा समाजाचे वर्चस्व होते. इंदिरा गांधींनी मात्र एका मुस्लिम समाजातील माणूस अंतुलेंच्या रुपाने मुख्यमंत्री करुन या मराठा लॉबिला दणका दिला. त्याकाळी इंदिरा गांधींनी घेतलेल्या निर्णयाला आव्हान देण्याची कोणाची हिंमत नव्हती. अंतुलेंच्या रुपाने कोकणाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपद मिळाले त्यामुळे कोकणाचे आता दिवस चांगले येणार असे वाटू लागले. अंतुलेंनी झपाट्याने काम करण्यास सुरुवात केली. आंबेत खाडीवरचा रत्नागिरी व रायगड जिल्हा जोडणारा व धरमतर खाडीवरील पूल त्यांनी पहिल्यांदा बांधला. त्यामुळे रायगड जिल्हा मुंबईशी सहजरित्या जोडला गेला. दळणवळणाचा एक मोठा मार्ग उपलब्ध झाला. केवळ कोकणाच्याच भल्याचे नव्हे तर संपूर्ण राज्याच्या हिताचे अनेक निर्णय अंतुलेंनी घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगडाची आठवण म्हणून त्यांनी कुलाबा जिल्ह्याचेे नाव बदलून रायगड हे केले. एवढेच कशाला त्यांनी शिवाजी महाराजांची भवानी तलवार इंग्लडच्या म्युझियममधून आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यात त्यांना काही यश लाभले नाही. सचिवालयाचे नाव बदलून मंत्रालय हे देखील त्यांनीच केले. शिवाजी महाराजांचे मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशव्दारापाशी भव्य तैलचित्र त्यांनीच प्रथम लावले. संजय गांधी निराधार योजना त्यांनी सुरु केली. त्यांनर ही योजना देशभर अन्य राज्यांनी स्वीकारली. दिघी जेटीचे बांधकाम त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात केले. कोकणातील अनेक गावे त्यांनी रस्त्यांनी जोडली आणि कोकणी माणसाचे दळणवळण सुलभ केले. गोरगरीबांची कामे झपाट्याने झाली पाहिजेत असे त्यांना वाटे आणि त्यासाठी ते नोकरशाहीला चांगलेच धारेवर धरीत. झटपट निर्णय घेणे हा त्यांचा आणखी एक चांगला गूण. मात्र त्यामुळे त्यांनी अनेकांचे आशिर्वाद जरुर घेतले मात्र शत्रूही उभेे केले. कोकणात त्यांनी अनेक जनहिताची कामे केली. पोलिसांनी त्यांनी सर्वात प्रथम खाकी पूर्ण पॅन्ट दिली. त्यापूर्वी पोलिसांना निळी अर्धी चड्डी होती. कोकणाच्या भल्यासाठी त्यांनी भरपूर कामे केली. त्यातूनच त्यांना कोकणचे भाग्यविधाते अशी उपाधी जनतेने दिली. झपाट्याने निर्णय घेणारे अंतुले मात्र प्रतिभा प्रतिष्ठानला देणग्या देेण्याच्या प्रकरणात अडकले आणि त्यातून त्यांना पक्षश्रेष्ठींनी राजीनामा देण्यास सांगितले. अर्थात भ्रष्टाचाराचा हा डाग फुसण्यास त्यांना तब्बल एक तपाहून जास्त काळ वाट पहावी लागली. आजही या प्रतिष्ठानच्या पैशातून अनेक वृध्द कलाकारांना निवृत्ती वेतन दिले जात आहे. अंतुलेंची यामागची कल्पना काही चुकीची नव्हती परंतु निधी जमविण्यासाठी त्यांनी जो मार्ग अवलंबिला त्यात ते फसले. त्यातून बाहेर पडल्यावर त्यांचे पक्षाने मंत्रिपद बहाल करुन पुर्नवसन केले. त्यादरम्यानच्या काळात एकदा त्यांनी कॉँग्रेस पक्ष सोडून आपला नवा पक्ष स्थापन केला. मात्र कॉँग्रेसमधून बाहेर पडलेल्या नेत्यातील शरद पवार वगळता कुणीही नेता यशस्वी झालेला नाही, त्याच सुत्रावर आधारित अंतुलेंचा नवा पक्ष फ्लॉप गेला. शेवटी त्यांना आपला पक्ष कॉँग्रेसमध्ये विलीन करुन पुन्हा कॉँग्रेसच्या प्रवाहात यावे लागले. त्यांनी औरंगाबादमधून लढविलेली लोकसभेची एक निवडणूक वगळता त्यांनी प्रत्येक निवडणूक ही कोकणातून लढविली. त्यात त्यांना कधी यश आले तर अपयश. मात्र त्यांच्या मागे कोकणी माणूस बहुतांशी वेळा ठामपणे उभा राहिला. चार वेळा रायगडचे खासदार म्हणून त्यांनी प्रतिनिधीत्व केले. तसेच दोन वेळा ते राज्यसभेवर होते. केंद्रात मंत्री झाले. ते केंद्रात आरोग्यमंत्री असतानाच पोलियो पल्सची मोहीम राबविली गेली, त्यातूनच आपला देश पुढील दशकात पोलियोमुक्त झाला. प्रशासनावर त्यांचा जबरदस्त पगडा असे. नोकरशहांकडून कामे करुन घेत्याच त्यांचा हातखंडा होता. त्यांचे एकदा फर्मान सुटले की काम हे झालेच पाहिजे अन्यथा कुणाची खैर नाही याचा सगळ्यांनाच चांगलाच अनुभव होता. अंतुले जसे निर्भीड आणि झपाटून काम करणारे होते तसेच त्यांच्यासारखा संवेदनाक्षम माणूस आढळणे कठीण. विकासाच्या कामाबाबतही त्यांचा नेहमीच आग्रह असे. विकास काम कोणतेही असो ते कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याने आणलेले असो ते करण्याची त्यांची तयारी असे. तसेच सार्वजनिक कामांच्या बाबतीत त्यांनी जर एखाद्याला शब्द दिला तर तो पूर्ण केल्याशिवाय गप्प बसत नसत. त्यामुळेच त्यांना अन्य पक्षातील नेते, कार्यकर्ते मान देत असत. त्यामुळेच अंतुलेंना मुख्यमंत्रीपदाची संपूर्ण पाच वर्षे मिळाली असती तर कोकणाचे चित्रच पालटले असते असे कोकणी माणूस म्हणत असे व ते योग्यच होते. त्यांनी सीमा प्रश्‍नी स्थापन केलेल्या महाजन आयोगाची चिरफाड करणारे जोरदार भाषण विधानसभेत केले होते. आपल्या बॅरिस्टरथाटातल्या या भाषणामुळे सीमा भागातील मराठी बांधवांना भरते आले होते. त्यांचे हे भाषण खूपच गाजले होते. अशा प्रकारे राज्याच्या हिताचे अनेक प्रश्‍न त्यांनी जोरदारपणे मांडले. त्यांनी राज्याच्या हिताचा नेहमीच विचार केला तरी त्यांचे कोकणावरती विशेष प्रेम होते. सर्वधर्मसमभावाचे ते कट्टर समर्थक होते. त्यांच्या जाण्याने कोकणी माणूस पोरका झाला आहे असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही.
--------------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel