-->
कोंडी कधी सुटणार?

कोंडी कधी सुटणार?

संपादकीय पान मंगळवार दि. ३१ मे २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
कोंडी कधी सुटणार?
मुंबई-गोवा महामार्गावरील माणगावजवळ रविवारी झालेली वाहानांची अभूतपूर्व गर्दी पाहता आता तरी सरकारला जाग येऊन या रस्त्याचे दुपदरी काम लवकर सुरु होईल अशी अपेक्षा करावयास हरकत नाही. मुंबई-गोवा महामार्गावर खरे तर सकाळपासूनच वाहतुकीची कोंडी झाली होती. माणगाव ते लोणेरे या १० कि.मी. अंतरात वाहनाच्या रांगाच रागा लागल्या होत्या. याचा वाहतूक कोंडीचा फटका जसा सर्वसामान्य लोकांना जसा बसला तसाच केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनाही बसला. मंत्रिमहोदयांना आता तरी या कोंडीची कल्पना आली असेल असे म्हणावयास हरकत नाही. सध्या मे महिन्याची सुट्टी अखेरच्या टप्प्यात आलेली आहे. त्यामुळे शाळा सुरु होण्या अगोदर कुटुंबांचे जथ्थे घेऊन सध्या लोक कोकणाच्या वारीवर निघणे हे नेहमीचेच आहे. अशा वेळी माणगाव येथे रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्याने या गर्दीत भर पडली. मे महिन्याची सुट्टी व त्यातच शनिवार व रविवार असल्यामुळे महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी झाली. माणगाव हे मुंबई-गोवा महामार्गामधील महत्त्वाचे ठिकाण समजले जातेे. मुुंबई तसेच पश्‍चिम महाराष्ट्रातून पर्यटक माणगाववरुन दिवेआगर, श्रीवर्धन, श्रीक्षेत्र हरिहरेश्‍वर तसेच मुरुड, अलिबाग मार्गावरील समुद्र चौपाटीवर आनंद घेण्यासाठी येत असतात. श्रीवर्धन, हरिहरेश्‍वर, दिवेआगर, बाणकोट पर्यटन स्थळी जाण्यासाठी वाहक चालक मोर्बा-म्हसळा मार्गाचा किंवा माणगावपासून पुढे १० कि.मी. अंतरावर असणार्‍या लोणेरे फाट्यापासून गोरेगावमार्गे म्हसळा, श्रीवर्धन, बीचकडे जाणे पसंत करतात. त्यामुळे माणगाव-लोणेरे दरम्यान विशेषत: सुट्टीत वाहनांची प्रचंड गर्दी होऊन मुंबई-गोवा मार्गावर ट्राफिकची कोंडी होते. रविवारी अशीच कोंडी झाल्याने वाहनचालक त्रस्त होऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांची दमछाक झाली. या मार्गाचे दुपरीकरण ही आता काळाची गरज ठरली आहे. केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी या मार्गाच्या दुपरीकरणाची घोषणा यापूर्वीच केली असून त्यादृष्टीने पावले देखील टाकावयास सुरुवात केली आहे. रायगड जिल्ह्यातील जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया बर्‍यापैकी पूर्ण झाली आहे असे सांगितले जाते. मात्र आता प्रत्यक्ष निवीदा काढून कामास प्रारंभ करण्याची आवश्यकता आहे. निदान पनवेलपासून ते माणगाव-इंदापूर पर्यंत जरी पहिल्या टप्प्यातील कामास प्रारंभ करण्याची आवश्यकता आहे. यावेळच्या गणपतीला देखील चाकरमन्यांना अशाच गर्दीतून वाट काढावी लागेल की काय असे दिसते. कारण येत्या गणपतीपर्यंत या कामास प्रारंभ होईल असे काही दिसत नाही. मुंबई-गोवा महामार्गाचे दुपरीकरण झाल्यास सध्या या मार्गावर होणारे अपघात मोठ्या प्रमाणात टाळता येतील. तसेच वेळेची त्यामुळे इंधनाचाही बचत करता येणार आहे. सध्या हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळाच झाला आहे. या महामार्गावर गेल्या पाच वर्षात झालेल्या अपघातात एक हजार ३३ बळी गेले आहेत. त्यावरुन या रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण लक्षात येते. एकीकडे मुंबई-गोवा महामार्गाचे दुपदरीकरण केले जात असताना मुंबई-गोवा या मार्गावर पुन्हा प्रवासी बोट सुरु करण्याची आवश्यकता येईल. त्यामुळे रस्त्यावरील ताण कमी होईल. अर्थात या दीर्घकालीन उपाययोजना झाल्या. सध्या तरी सरकारने या रस्तायवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीने उपाय योजण्याची आवश्यकता आहे.

0 Response to "कोंडी कधी सुटणार?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel